आठवणी लोकगायक प्रल्हाद शिंदे

आणि त्यांच्या विठ्ठलाच्या गाण्यांच्या

श्री विठ्ठल, वारी, एकादशी, पंढरपूर असं निमित्त काहीही असो, ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘चल गं सखे पंढरीला’… ही गाणी कानावर किंवा ओठावर आली नाहीत, असा एक मराठी माणूस सापडायचा नाही. संतांच्या अभंगांएवढीच जादू या गाण्यांनी महाराष्ट्रावर केली आहे. या गाण्यांनी इतिहास घडवला. हा इतिहास सांगत आहेत, ही गाणी गाणारे लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे नातू डॉ. उत्कर्ष शिंदे…

आम्ही संत चोखा मेळाचे वंशज

शिंदे कुटुंबाचा, श्री विठ्ठलाचा, पंढरीचा आणि वारीचा ऋणानुबंध फार जुना आहे. आम्ही शिंदे थेट संत चोखा मेळा यांचे वंशज आहोत. पंढरपूरपासून वीसेक किलोमीटरवरील मंगळवेढा हे आमचं गाव. ही पवित्र भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. कारण या भूमीत अनेक संतांनी जन्म घेतला आणि मानवतेच्या प्रसाराचं काम केलं. आम्ही शिंदे कुटुंब संत चोखा मेळा यांचे वंशज असल्यानं वारी, भक्तीची परंपरा आमच्या रक्तातच आहे. माझी आजी म्हणजे आजोबांची आई सोनाबाई आणि आजोबा भगवान शिंदे हे वारकरी होते. आजी सोनाबाई उत्कृष्ट म्हणजे अगदी शास्त्रीय तबला वाजवायची.

आजोबा भजन, कीर्तन करायचे. दुष्काळाला कंटाळून ते उदरनिर्वाहासाठी मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतरही त्यांनी भजन सोडलं नाही. मुंबईत आल्यानंतर आमचं आडनाव शिंदे झालं. आजोबा भगवान शिंदे आणि आजी सोनाबाई मुंबईत सगळीकडं भजन करत फिरायचे. मुलगा प्रल्हाद शिंदे त्यांच्या सोबत असायचा. प्रल्हाद शिंदे यांच्या कानावर ही सगळी भजनं पडत असत. माझे वडील आनंद शिंदे यांचे प्रल्हाद शिंदे वडील. म्हणजे माझे आजोबा. सोनाबाई तबला वाजवायच्या आणि भगवान शिंदे गायचे. सोनाबाईंनी मुलगा प्रल्हाद शिंदेंनाही तबला शिकवला. प्रल्हाद शिंदे यांच्या पत्नी म्हणजे माझी आजी मंगळवेढ्याच्याच.

तबला वादनानंतर गायन

मुंबईत बीडीडी चाळ, भायखळा, दगडी चाळ, ग्रँट रोड या भागांत सुरुवातीला सोनाबाई आणि भगवान शिंदे राहिले. प्रल्हाद शिंदे यांच्या जन्मानंतर ते वडाळ्याला राहू लागले. प्रल्हाद शिंदे यांना तीन भाऊ. ते सर्वात धाकटे होते. ते तेराव्या वर्षी इस्माईल आझाद यांच्याकडे तबला शिकू लागले. त्यांच्या अल हिलाल या १९५८मधील सिनेमातील ‘हमे तो लूट लिया मिलके हुस्न वालोंने’ या सुप्रसिद्ध कव्वालीमध्ये प्रल्हाद शिंदे यांनी १३ व्या वर्षी तबला वाजवला. तिथून त्यांचा तबला वादक म्हणून प्रवास सुरू झाला. तबल्यासोबत ते ढोलक, हार्मोनियम अशी सगळी वाद्यं वाजवायचे. त्यावेळी हातवर पोट असणाऱ्या प्रल्हाद शिंदे यांना गायक म्हणून प्रस्थापित होणं अवघड होतं.

वादक म्हणून त्यांना अनेक गायकांचा सहवास लाभला. त्यामुळं त्यांच्यावर उर्दू भाषेचेही संस्कार झाले. म्हणूनच त्यांनी कव्वाली गायनातून गाण्याची सुरुवात केली. ‘हैदर की तलवार’ या गाण्यातील काही भाग त्यांनी गायला आहे. पण प्रल्हाद शिंदेचं पहिलं गाणं रेकॉर्ड झालं ते ‘उडतो डोळा, डोळा बाई डावा…’ हे गाणं संगीतबद्ध केलं होतं, मधुकर पाठक यांनी. हे पहिलंच गाण हिट झालं. मग त्यांच्या वाट्याला अनेक भक्तीगीतं झाली. ‘कधी लागेल वेड्या गोडी अभंगा’ची हे त्यांनी सुरुवातीच्या काळात गायलेल्या गाण्याला मोठी लोकप्रियता लाभली.

मंगळवेढे भूमी संताची

त्या काळात मंगळवेढ्यात अनेक लेखक होते. मंगळवेढा ही संताची भूमी असल्यानं सगळ्यांवर ते संस्कार होते. आपल्या भागातील एक मुलगा गातोय, म्हटल्यावर ही लेखक मंडळी मग ‘प्रल्हाद एवढं गाणं गा बरं, कुठल्यातरी कार्यक्रमात’, असं सांगायची. त्यातूनच प्रल्हाद शिंदेंनी मधुकर पाठकांना ‘कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची’ हे गाणं दाखवलं. पाठक यांनी ते गाणं प्रल्हाद शिंदे यांना गायला सांगून संगीतबद्ध केलं. मग ‘एचएमव्ही’नं त्यांच्या गाण्यांची कॅसेट काढली.

त्यातलं ‘चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पाहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी’, हे गाणं खूप गाजलं. मग ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, त्यानंतर ‘आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात दावशील का’, ही गाणी हिट झाली. भक्तीगीतं आणि प्रल्हाद शिंदे असं समीकरणच जुळलं. त्यानंतर जमाना आला भक्तिगीतं देणाऱ्या ‘टी सिरीज’चा. त्यातही आजोबांनी बरीचशी भक्तिगीतं गायली. ‘पंढरीच्या नाथा तू पाहू नको अंत’ हे त्यांचं भक्तीगीत आणि कॅसेट अखेरची ठरली. त्यामध्ये त्यांची मुलं, नातू अशा तीन पिढ्या गायल्या आहेत.

प्रल्हाद शिंदेंसोबत गायले वारकरी

मंगळवेढ्यामध्ये अनेक संत होऊन गेले, हे अनेकांना माहिती नव्हतं. ‘पाहा मंगळवेढा हे माझं गाव आहे लई सुंदर’, ‘चला मंगळवेढे पाहू नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ’, ‘मंगळवेढे भूमी संताची’ अशी मंगळवेढ्याची महती सांगणारी गाणी त्यांनी गायली. या गाण्यांमुळं अनेकांना मंगळवेढे नावाचं गाव आहे. तिथं अनेक संत होऊन गेले, हे माहिती झालं. या गाण्यांमध्ये मंगळवेढ्यातील संताचं वर्णन केलं आहे. त्यावेळी ज्या डिस्क रेकॉर्ड येत, त्यात भक्तिगीतांच्या ‘एव्हरग्रीन’च्या यादीत पहिलं नाव होतं, प्रल्हाद शिंदे! ते प्रत्येक वारीला पंढरपूरला जायचे आणि तिथं गायचे. सोबत माईक, वाद्यवृंद असो किंवा नसो.

एकदा आषाढी वारीच्या सांगतेच्या वेळी आजोबा पंढरपुरात गेले, तेव्हा वारकऱ्यांनी त्यांना व्यासपीठावर बोलावून सन्मान केला. मग गाण्याचा आग्रह केला. परंतु, आजोबांसोबत वादक वगैरे नव्हते. मग वाकरीच आले त्यांच्या साथीला. त्यांच्यासोबत सर्व वारकरी समूहाने गाऊ लागले. वारकऱ्यांमुळंच प्रल्हाद शिंदे सदैव जिवंत राहतील, असं मला वाटतं. त्यामुळं मीही वारकऱ्यांशी नातं कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कोरोनाच्या काळात ‘यंदा माझी वारी चुकली विठूराया’ हे गाणं मी केलं होतं. प्रल्हाद शिंदे यांची सगळीच गाणी आज जिवंत आहेत.

सत्यनारायणाची पूजा असेल तर, ‘ऐका सत्य नारायणाची कथा’ हे गाणं वाजलं नाही, असं होतच नाही. वारी सुरू झाली की, पहिलं गाणं लागतं, ‘पाऊले चालती पंढरीची वाट’. हे गाणं संगीतबद्ध केलंय, त्यांचा पुतण्या विठ्ठल शिंदे यांनी. विठ्ठल शिंदे हे संगीत जगतामध्ये चांगले स्थिरस्थावर झाले होते. आजोबांची जी गाजलेली गाणी आहेत, ती लिहिलीत सामान्य माणसांनी. गीतकार दत्ता पाटील, बुवा जगताप, दीक्षा मंगळवेढेकर यांना गाणी लिहिण्याचा छंद होता. या गाण्यांमध्ये कोरोस माझे वडील आणि काका आनंद-मिलिंद यांनी गायलेला आहे. आजोबांनी जसा तबला वादन करून करिअरची सुरुवात केली, तशीच माझे वडील आनंद शिंदे यांनी देखील १३व्या वर्षापासून तबला वादन सुरू केलं. पणजीनं आजोबांना तबला शिकवला आणि आजोबांनी वडिलांना. वडील आजोबांच्या शोमध्येही तबला वाजवायचे.

आम्ही सर्वांचे आहोत

शिंदे कुटुंबानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावीत होऊन १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळं समाजातील अनेक लोकांनी ‘आता देवाची गाणी कशाला गाता?’ असा प्रश्न उपस्थित केला. पण आम्ही सर्व शिंदे कुटुंब कलाकार आहोत, म्हणजेच जातीधर्माच्या पलिकडं गेलेलो आहोत. गाण्याला कोणतीही जात, धर्म नसतो. त्यामुळं उर्दू कव्वाली, गुजराती गाणी, मराठी भक्तिगीतं, आंबेडकरी गाणी आम्ही सर्वजण तेवढ्याच तन्मयतेनं गातो. एखादा डॉक्टर जसा उपचार करताना जातपात बघत नाही, तसंच आमचं आहे. आमच्यावर प्रेम करणारे एका जातीधर्माचे किंवा समाजाचे लोक नाहीत. मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात आम्ही गायलेल्या ‘उड जाएगा एक दिन पंछी’ या कव्वालीला जेवढा प्रतिसाद मिळतो, तेवढाच ब्राह्मण समाजात ‘ऐका सत्य नारायणाची ही कथा’ या गाण्याला मिळतो, तर आंबेडकरी चळवळीची गाणी गाताना आंबेडकर अनुयायी आम्हाला डोक्यावर घेतात.

आपला देव, धर्म हा घरातला आणि वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. बाहेर पडल्यावर आम्ही केवळ कलाकार आणि माणूस असतो. वारकऱ्यांनी जसं आजोबांवर प्रेम केलं, तसंच ते आमच्यावरही करतात. माझा भाऊ आदर्शचं ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही’ हे पहिलं गाणं खूप हिट झालं. ते देवाचंच गाणं होतं. आपण त्याला देवाचं गाणं म्हणून पाहतो. पण ते निव्वळ गाणं आहे, सात सुरांच्या बाहेर नाही. त्याला वेगळे स्वर नाहीत. बाबासाहेबांचं गीतं गायचं, तर त्याच स्वरामध्ये, उर्दू कव्वाली गायची तरी तीही त्याच सात स्वरांमध्ये गावी लागतात. म्हणजेच स्वर तेच आहेत, ऐकणारा वर्ग वेगवेगळा आहे.

आम्ही कलाकार म्हणून सर्वांचे, सर्वांसाठी आहोत. शिंदे’शाही’ला सर्व रसिकांमुळं ‘शाही’पणा आला आहे. काही दिवसांपूर्वी मी अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी या जन्मगावी गेलो होतो. तिथं जमलेल्या धनगर समाजाच्या लोकांना हा प्रल्हाद शिंदे यांचा नातू आहे, असं समजलं. मग त्यांनी ‘खंडोबारायाचं याड बया लागलं मुरळीला’ हे गाणं गायला एकमुखानं सांगितलं. हे महाराष्ट्राचं आमच्यावर असलेलं प्रेम आहे. आख्खा महाराष्ट्र आमच्या पाठीमागं आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरानं दिलं प्रेम

मंगळवेढा गावाच्या शेजारीच असल्यानं आमचं पंढरपूरला वरचेवर जाणं होतं. सुरिवातीला प्रल्हादचे नातू, नंतर आनंदची मुलं अशी आमची ओळख होती. आत आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे या नावांनीच लोक आम्हाला ओळखतात. कुठल्याही मंदिरात आम्हाला बोलावलं, तर आम्ही जातो. कारण आमचं मूळच तिथून आहे. एकदा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आम्हाला पाहुणे म्हणून बोलावलं होतं. तिथं गेलो तर सर्व वारकरी जेवण करत होते. त्यांना समजलं की, हे प्रल्हाद शिंदे यांचे नातू आहेत. ते सर्व वारकरी जेवत असताना उठले. त्यांनी टाळ, पखवाज घेतले. आमचा तिथंच भजनाचा कार्यक्रम सुरू झाला!

टीव्हीवरील ‘बिग बॉस’ कार्यक्रमात मी सहभागी झाल्यानंतर विठ्ठल मंदिरातील पुजाऱ्यांनी मला पहिल्यांदा व्हिडीओ कॉल केला होता. असेच आशीर्वाद महालक्ष्मी, भवानीमाता, काळूबाईचे पुजारी देतात. आम्ही त्यांना त्यांचे, आपले वाटतो. देवीच्या सर्व उत्सवांमध्ये ‘करुयो उदो उदो अंबाबाईचा’ हे प्रल्हाद शिंदेंचं गाणं हमखास लावलं जातं. संत चोखा मेळा यांची अभंगरचना अजरामर राहणार आहे. आम्ही त्यांचा वारसा उंचावण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची चौथी पिढी आता गाण्यात आली आहे. हर्षद हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगादेखील आता गातो. तो वेस्टर्न गाणी गातो. त्याचं नाव आल्हाद. त्याचा आवाज सेम प्रल्हाद शिंदे यांच्यासारखा आहे. त्यामुळं आम्ही ‘प्रल्हाद ते आल्हाद’ असा ‘शिंदेशाही’मध्ये कार्यक्रम करतो.

‘शिंदेशाही’चं सामाजिक काम

स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे नावाचा ट्रस्ट आम्ही सुरू केला आहे. कोल्हापूरमध्ये जेव्हा पूरस्स्थिती होती, तेव्हा माझ्या डॉक्टर मित्रांना घेऊन मी तिथं पोहोचलो. नागरिकांना मदत केली. या समाजानं आपल्याला एवढं दिलं आहे, त्याची परतफेड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून आजोबांच्या नावाच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही विविध सामाजिक कामं करत असतो. मंगळवेढ्यामध्ये आम्ही प्रवेश कमान उभारली आहे. त्या कमानीला आणि बाजारपेठेला प्रल्हाद शिंदे यांचं नाव दिलं गेलं आहे. पालखी सोहळा निघाल्यानंतर मी ट्रस्टच्या मार्फत पुण्यात वारकऱ्यांना औषधं, खाद्यपदार्थ देतो. दरवर्षी वाढदिवसानिमित्त जानेवारी महिन्यात भोसरीमध्ये एका ट्रस्टला मदत करतो. ही प्रेरणा मला आजोबा प्रल्हाद शिंदेंकडूनच मिळाली. कारण ते देखील तळेगावमध्ये जाऊन अंध मुलांसाठी गाणे गायचे. त्यामुळं त्यांच्या नावाच्या ट्रस्टच्या माध्यमातून अंध, कॅन्सरग्रस्त आणि बांधकाम कामगारांना आम्ही वैद्यकीय मदत करत आहोत.

सामान्य माणसाचं गाणं

आजचा सोशल मीडिया प्रल्हाद शिंदे यांच्या काळात नव्हता. पण त्यांची गाणी आजही जिवंत आहेत, कारण त्या गाण्यांमध्ये कस, निर्मळपणा आहे. ती गाणी परंपरेशी जोडलेली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ती सर्वसामान्य माणसांनी लिहिली आहेत. प्रल्हाद शिंदे शास्त्रीय गाणं शिकले नव्हते. सर्वसामान्य माणसांसाठी ते गायले. त्यामुळं त्यांचं गाणं सामान्यांचं गाणं झालं. ‘तूच सुखकर्ता तूच दुःख हर्ता, अवघा दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे’ हे गाणं मुंबईत मिल कामगारांचा संप सुरू होता तेव्हा आलं. संपावरील मिल कामगारांची यातना या गाण्यातून मांडली गेली.

गरीब परिस्थितीमुळं मी मोदक लाल गव्हाचे केले आहेत, ते गोड मानून घे, असं भक्त या गाण्यातून श्रीगणेशाला प्रार्थना करतो आहे. आपल्या बहुतेक गाण्यांतून सर्व सामान्यांचं दुखणं मांडण्याचा प्रयत्न प्रल्हाद शिंदेंनी केला. तोच प्रयत्न आम्ही त्यांची पुढची पिढी करत आहोत. त्यामुळंच आजही महाराष्ट्र आमच्यावर आजोबांप्रमाणंच प्रेम करतो आहे. कोरोनाचा काळात मी एक गाणं केलं होतं. कोल्हापूरला पूर आला तेव्हाही ‘हाक मारतंय कोल्हापूर’ हे गाणं केलं होते. लातूरचा भूंकप झाला तेव्हा वडिलांनी गाणं केलं होतं. मी हुंडा बळीचं गाणं केलं आहे. गाण्यांमधून सामाजिक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत.


प्रल्हाद शिंदे हे खूप हळवे होते. स्नेही विजय सरतापे यांनी मला एक किस्सा सांगितला होता. प्रल्हाद शिंदे जिथं रेकार्डिंग करत होते, तिथं एक माणूस मदत मागण्यासाठी आला. त्याची पत्नी खूप आजारी होती. रेकॉर्डिंगमधून जे पैसे मिळाले होते, ते आजोबांनी त्याला देऊ केले. पण एवढ्या पैशांत काहीच होणार नाही, असं तो माणूस म्हणाला. शेजारीच हरिनाम सप्ताह सुरू होता. त्या माणसाला घेऊन आजोबा त्या सप्ताहात गेले आणि तिथं गायले. तिथं जेवढे पैसे मिळाले ते सर्व त्या माणसाला दिले! आजोबांचा अर्थात लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचा गाण्याचा आणि अशा सामाजिक कार्याचा वसा आम्हाला पुढं न्यायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *