मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून

आठ मंदिरासाठी निधी मंजूर

मुंबई : राज्यातील आठ पुरातन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच संमती दिली आहे. त्यामुळे शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या ही मंदिरे त्यांच्या मूळ रुपात जतन करण्यास मदत होणार आहे.

या मंदिरांमध्ये रत्नागिरीतील धूतपापेश्वर मंदिर, कोल्हापुरातील कोपेश्वर मंदिर, पुणे जिल्ह्यातील एकवीरादेवी मंदिर, नाशिकमधील गोंदेश्वर मंदिर, औरंगाबादचे खंडोबा मंदिर, बीडमधील पुरुषोत्तम भगवान मंदिर, अमरावतीमधील आनंदेश्वर मंदिर आणि गडचिरोलीतील महादेवाचे मार्कंडा मंदिर आदी मंदिरांचा समावेश आहे. जीर्णोद्धाराच्या कामात या मंदिरांचे मूळ स्वरुप आणि रचना कायम ठेवण्यात येणार आहे. तसेच मंदिरांना भेट देण्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

या मंदिराची ही थोडक्यात माहिती –

१. धूतपापेश्वर मंदिर, धोपेश्वर, रत्नागिरी
धूतपापेश्वर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील प्रसिद्ध शिवमंदिर आहे. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे मंदिर राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून मंदिरही प्राचीन आहे. प्रशस्त असा सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. प्रवेशद्वारावर नगारखाना आणि आवारात दीपमाळा आहेत. मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली कोसळणारी देणारा मृडानी नदी आहे. पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासारखा असतो. धबधब्याचे पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे. त्याला कोटितीर्थ म्हणतात. मंदिराच्या सभामंडप आणि गर्भगृहावरील छतावर, खाबांवर, तुळयांवर परिसरात आढळणारे प्राणी, वनस्पती, फुलांची चित्रे कोरलेली आहे. शंकराला वाहिल्या जाणाऱ्या कैलासचाफा या आकर्षक फुलांचे दुर्मिळ झाड येथे आहे. राजापूरची गंगा ज्यावेळी प्रकट होते त्यावेळी लोक प्रथम उन्हाळे येथे जाऊन गरम पाण्याच्या प्रवाहात आंघोळ करतात. नंतर राजापूरच्या गंगेत स्नान करतात आणि राजापूरच्या अर्जुना नदीपात्रातील पुंडलिकाचे दर्शन घेऊन धूतपापेश्वरला अभिषेक करतात.

२. कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे हे दगडी मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णू यांनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर.

चालुक्य राजवटीत बांधकाम
साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. देवळाबाहेर ४८ नक्षीदार दगडी खांबांवर एक मंडप आहे. त्याला स्वर्गमंडप म्हणतात. या मंडपाला पूर्ण छत नसून त्या जागी एक वर्तुळाकार जागा आहे. मंडपात होणाऱ्या वापर होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे. हा मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी कोपेश्वर मंदिराची रचना आहे. आतून आणि बाहेरून शिल्पसौंदर्याने नटलेले असे हे मंदिर आहे. प्रदक्षिणा मार्गावर विविध भावमुद्रांमधील रेखीव मूर्ती दिसतात. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरले आहेत.

मंदिराला पुराचा तडाखा
भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या विध्वंसक महापुरांचा तडाखा या मंदिराला बसला आहे. पुरामुळे या मंदिराला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. या मंदिराच्या दुरुस्तीसाठी ११० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी नुकतीच केली आहे.

३. एकवीरा देवी मंदिर, लोणावळा, पुणे
महाराष्ट्रात देवींची साडेतीन पीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी! लोणावळ्याजवळील वेहेरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही एक आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकवीरा देवस्थानचा समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी! ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून, १६० ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात आहेत.

कोळी, आगरी समाजाची कुलस्वामिनी
देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. १८६६ ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. महाराष्ट्रातील विशेषत: मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी आहे. चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते. या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवांसह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास येतात. गडावर विजेची सेवा, भाविकांच्या निवासासाठी धर्मशाळा, मुबलक पाणी, परिसराचे सुशोभीकरण, पायथा ते गडापर्यंत पायऱ्यांना संरक्षक लोखंडी रेलिंगची व्यवस्था अशा विविध सुविधा आहेत. प्रस्थानद्वाराच्या जागी नव्याने सागवान लाकडाचे सुंदर नक्षीदार प्रवेश आणि प्रस्थानद्वार बसविण्यात आले आहे.

४. गोंदेश्वर मंदिर, सिन्नर, नाशिक
गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ४ मार्च १९०९ रोजी घोषित केलेले आहे.
हे मंदिर पुरातन भूमिज स्थापत्यशैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट बाय ९५ फुटांचे आहे. हे मंदिर म्हणजे पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप आणि गाभारा आहे.

त्रिमिती शिल्पकाम
गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते. रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.

गुलाबी दगडाचे बांधकाम
दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात. पण आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी व्हेसिक्युलर खडकांपासून बनवलेले आहे. या मुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. या दगडावर कोरीव काम करणे अवघड असते, तरीही यावर अप्रतिम केलेली कलाकुसर पाहत राहावी अशी आहे. या मंदिराचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. बऱ्याच मंदिरात आपल्याला गाईचे तोंड (गोमुख) शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते. मगर हे गंगेचे वाहन आहे. त्याच्या तोंडातून येणारे जल ते गंगाजल हे सांगण्यासाठी हे मकरमुख कोरलेले दिसते.

५. खंडोबा मंदिर, सातारा, औरंगाबाद
औरंगाबादच्या सातारा गावात डोंगर पायथ्याशी असलेले खंडोबाचे हेमाडपंथी मंदिर हे एकाच दगडात निर्माण केलेले मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून १७६६ मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिराचा गाभाऱ्यापर्यंतचा भाग दगडी आणि त्यावरील कळसापर्यंतचा भाग वीटांनी बांधला. मंदिराची ही वास्तु पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून संरक्षित केली आहे. शहराच्या मुख्य बसस्थानकापासून दक्षिणेला सुमारे ११ किलोमीटरवर हे स्थान आहे. अगदी डोंगरात एका टोकावर भव्य काळ्या दगडावर कोरीव काम केलेले हेमाडपंथी पूर्वाभिमुख श्री खंडोबाचे मंदिर उभारलेले आहे. हे मंदीर एका चौथऱ्यावर चोहोबाजूंनी दगडीकाम केलेल्या स्वरुपाचे आहे.
त्याच ठिकाणी निवासी खोल्या जमीनदोस्त झालेल्या दिसतात. फक्त मूर्तीवरील कळसाचा भाग तेवढा शिल्लक आहे. हे ऐतिहासिक मंदिर औरंगाबाद जवळील बोरसर येथील कुलकर्णी यांनी बांधल्याचे सांगतात. तर १७६६ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते.

अकरा देवस्थानांपैकी चौथे स्थान
खंडोबाच्या जागृत अकरा देवस्थानापैकी चौथे स्थान म्हणून हे मंदिर ओळखले जाते. खंडोबा मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे. पेशवे काळात मराठा वास्तूशैलीत या मंदिराचे बांधकाम केल्याचे सांगण्यात येते. मंदिर परिसर हा गर्भग्रह, सभा मंडप आणि भव्य प्रवेशव्दार यामध्ये विभागलेला असून एका उंच चौथऱ्यावर मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्याखाली एक पुरातन बारव आहे तिच्याकडे जाण्यासाठीचा रस्ता आता बंद करण्यात आला आहे. आवाराचा पूर्व दरवाजा मोठा असून दरवाज्यावर नगरखाना आहे. उत्तर बाजूला दिपमाळ तर मंदिराच्या पूर्वेस मंडपाचा चौथरा दिसतो. या चौथऱ्याच्या चारही बाजूच्या भिंतीचा तळ आणि मंडपाचे १९ खांबाचे तळ नजरेस पडतात. मंदिराचे बांधकाम अर्धवट झाल्याचे दिसते. मंदिर गाभारा बाहेरून ताराकाकृती दिसतो.

सुंदर कोरीव शिल्पे
मंदिरातील अर्धमंडपात वरच्या भागात गजलक्ष्मी, विष्णू, आणि कृष्णाची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. मुख्य गर्भागृहात जाण्यापूर्वी अंतराळ भागात दक्षिण दिशेला ब्रम्हाची उत्पत्त्ती आणि शिल्प मालिका कोरलेली आहे. त्याखालील अलंकार पट्टीमध्ये पोपटाची अलंकृत असलेली शिल्पपट्टी आहे. गर्भगृहाच्या आत मच्छ, कच्छ, वराह, नरसिंह, वामन असे १० विष्णू अवतार कोरलेले आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशव्दाराच्या लगाड बिंबावर गणेशमूर्ती कोरलेली आहे. त्यावर नंदीवर बसलेल्या शिवपार्वतीची मूर्ती कोरलेली आहे. त्याच प्रमाणे राम-लक्ष्मण-जानकी, श्री महाविष्णू, श्रीकृष्ण, श्री पांडुरंग आणि कल्की कोरले आहेत. उत्त्तर दिशेला श्रीकृष्ण, गायी, गौळणी यांची शिल्पे कोरलेली आहेत. खंडोबाची मूर्ती मध्यम उंचीच्या दगडावर विराजमान झालेली आहे. ती मूर्ती पाषाणाची असून त्याची उंची साधारण ३ फूट आहे. दुसऱ्या बाजूला अभिषेकाची मूर्ती आणि महादेवाची पिंड आहे. शेजारी घोड्यावर स्वार झालेल्या मूर्तीसमोर उंचीचा खंडा अर्थात तलवार आहे. खंडोबाचा गड चढल्यावर पठाराच्या मध्यभागी सासू-सुनेचे एकत्रित तळे आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी पुरण पोळी, खोबरे, रेवडी, भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो. पौष पौर्णिमा, सोमवती अमावस्या, चंपाषष्ठी, माघ पौर्णिमा, याला येथे जत्रा भरते.

६. पुरुषोत्तम मंदिर, माजलगाव, बीड
माजलगावपासून २२ किलोमीटरवर गोदावरीच्या काठावर असलेल्या पुरुषोत्तमपुरीला पुरुषोत्तमाचे भारतातील एकमेव मंदिर आहे. या मंदिराचे स्थापत्य कलेतील वेगळेपण असे, की मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या वीटा चक्क पाण्यावर तरंगतात. हे मंदिर १३१० मध्ये रामचंद्र देव यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने उभारले. यामुळेच या गावाला पुरुषोत्तमपुरी हे नाव पडले. मंदिरातील मुख्य देवतेलाही याच नावाने ओळखले जाते. इतिहासाच्या दृष्टीने पुरुषोत्तमपुरीस मोठे महत्त्व असून रामचंद्र देव यादवांचा शेवटचा ज्ञात ताम्रपट इथेच सापडला आहे. आजपर्यंत उपलब्ध सर्व ताम्रपटात हा ताम्रपट वजनाने आणि आकारानेही मोठा मानला जातो. यात रामचंद्र देव यादवाने मंदिर उभारणीसाठी आणि मंदिराच्या देखरेखीसाठी आजूबाजूची गावे दान दिल्याचा उल्लेख आहे. अधिक मासात या ठिकाणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गोदावरीच्या पात्रात मंदिराचे अनेक अवशेष सापडले आहेत. नदीपात्रात एका प्राचीन घाटही दुष्काळात उघडा सापडला असून हा घाट यादवांच्याही अगोदरच्या काळातील असल्याचे अंदाज आहे. या मंदिराचा कळस आणि बांधणी हे उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिर पध्दतीचे आहे. शेजारीच वरदविनायक, सहलक्षेश्वर महादेव, पार्वती पादुका मंदिर ही जुनी मंदिरे दिसतात. वरदविनायक मंदीर हे वृंदावनातील कृष्णमंदीराची प्रतिकृती असल्याचे दिसते. मुख्य पुरूषोत्तम मंदीरातील पुरूषोत्तमाची मुर्ती ही गंडकी शिलेची आहे. चतुर्भुज पुरुषोत्तमाच्या हातात शंख, चक्र, पद्म असून ही मूर्ती मनमोहक आहे.

धोंड्याच्या महिन्याचा मानकरी
‘भारतीय संस्कृतीत धोंड्याच्या महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. या महिन्यात पुरुषोत्तमाला सोन्याचे, चांदीचे, पुरणाचे, पेठ्याचे धोंडे अर्पण करण्याची प्रथा आहे. दर तीन वर्षांनी हा अधिकमास अर्थात पुरुषोत्तम मास येतो. त्या तेराव्या महिन्याचा स्वामी पुरुषोत्तम आहे.या महिन्यात जावयांना पुरणाचे धोंडे खावू घालण्याची प्रथा ही महाराष्ट्रातील घराघरात जोपासली जाते. अधिकमासात सौभाग्यवती स्त्रिया येथे गोदावरीत स्नान करून पतीच्या समृध्दी आणि दीर्घायुष्यासाठी पुरूषोत्तमाला ३३ धोंडे अर्पण करतात.
निजाम राजवटीत या स्थळाला मोठा मान होता. निजामाने या देवस्थानच्या देखरेखीसाठी शेकडो एकर जमिनी दिल्या होत्या. याबाबत ताम्रपट देऊन त्यावर या जमिनी कोणाकडे वहितीसाठी द्याव्यात याचा उल्लेख होता. हे ताम्रपट आणि तांब्याचा गरुड हैद्राबाद येथील पुराणवस्तू संग्रहालयात संग्रहीत आहे.

७. आनंदेश्वर मंदिर, अमरावती
वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले लासूरचे आनंदेश्वेर मंदिर अमरावती जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव आहे. दर्यापूर तालुका मुख्यालयापासून अकोला मार्गावर १२ किलोमीटरवर पूर्णा नदीच्या काठावर लासूर नावाचे एक छोटेसे गाव आहे. गावाच्या दक्षिण दिशेला हेमाडपंथी प्राचीनकलेचा अप्रितम नमुना असलेले हे शिवमंदिर आहे. १२ व्या शतकात बांधलेले हे शिवमंदिर आनंदेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते. हे दगडी बांधकाम असलेले मंदिर ३५०० चौरस फुटांचे आहे. वरून स्वस्तिक आकार असणाऱ्या या मंदिराला कळस नाही. हे मंदिर अष्टकोनी असून समोरच्या भागाकडून एखाद्या भल्यामोठ्या रथाला हत्ती जुंपल्यासारखे दिसते. या मंदिराचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून दारे आणि खिडक्या पूर्व, पश्चिम, उत्तर दिशेला आहेत. संपूर्ण मंदिराचे बांधकाम एकावर एक दगडी शिळा रचून नंतर त्यावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या आतील भागात १२ खुले आणि भिंतीमधील ६ असे एकूण १८ खांब आहेत. उत्तरायण काळात दुपारी बाराला सूर्य माथ्यावर असताना इथे पडणारा प्रकाश आणि सावल्या पाहताना गणित आणि खगोलाचे वापरलेल्या तंत्राचे आश्चर्य वाटते. मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीमध्ये आहे.

८. मार्कंडा मंदिर, गडचिरोली
मार्कंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूरपासून २१६ किलोमीटर गडचिरोलीतील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले मार्कंडा हे गाव आहे. या गावातील मंदिरांना विदर्भातील खजुराहो मानतात. ती मंदिरे चंद्रपूर-मूल-चामोर्शी रस्त्यावर आहेत. या गावी सुमारे २३ मंदिरांचा समूह आहे. १८७३ मध्ये कनिंगहॅम यांनी या मंदिरांकडे जगातील लोकांचे लक्ष वेधले. त्यांनी नोंदल्याप्रमाणे येथे २४ मंदिरे होती. १७७७ च्या सुमारास येथे वीज पडून देवळांचे बरेच नुकसान झाले अशी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात नोंद आहे. १९२४-१९२५ चे सुमारास आणखी काही मंदिरे कोसळली. सध्या येथे दखल घेण्यासारखी १८ मंदिरे आहेत. यात मार्कंडऋषी,(ज्यांच्यावरून या गावास ‘मार्कंडा’ हे नाव पडले) मृकंडुऋषी, यम, शंकर आदि मंदिरे प्रमुख आहेत. या मंदिरांचा उभारणीकाळ ११ वे शतक वा त्यानंतरचा असावा असे संशोधकांचे मत आहे. येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सूरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात.

उत्कृष्ट शिल्पकृतींचे नमुने
मार्कंडा येथील देवालये दक्षिणोत्तर १९६ फूट लांब आणि पूर्व-पश्चिम १६८ फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहेत. सभोवती ९ फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकारामध्ये एकूण १८ देवळे आहेत. या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. या प्रकारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इ. मंदिरे आहेत. या मंदिराकडे बघतांना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो.
अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाच्या विविध छटा, आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. मानवी आकृत्या चितारतांना चेहऱ्यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले आहेत. ‘मैथुन शिल्पे’ हे मार्कंडा मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. मार्कंडाला महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. पण एरवी ही मंदिरे वर्दळीपासून काहीशी दूर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *