विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती

सदस्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : कोरोना निर्बंध शिथील झाल्याने यंदा पंढरपूरचा आषाढीचा पायी वारी सोहळा होत आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीच्या (दि. १० जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. मंदिर समितीच्या वतीने औसेकर महाराज यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची मूर्ती, वीणा, शेला-पागोटे देऊन सत्कार केला.

विकास कामांचे नियोजन करण्याची सूचना
निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावे चर्चा केली. पंढरपुतील विकास कामांचे नियोजन करा, वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसेच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थित असते. राज्यभरातील विविध भागातून भाविक पंढरपुरात दाखल होतात. यंदा वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याचीही शक्यता आहे. त्यांना सोयीसुविधांची कमतरता भासू नये यासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्नशील राहील असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

गतवर्षीच्या वृक्षारोपणाची चौकशी
गतवर्षी सत्यभामा मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपणाची मुख्यमंत्र्यांनी आवर्जून माहिती घेतली. पंढरपूर मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी शासनाने ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत कामांबाबत यावेळी चर्चाही करण्यात आली. अशा पद्धतीने निधी देण्याचे जाहीर करून, तो लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल समितीने यावेळी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *