छत्रपती संभाजी राजेंकडून
देहू संस्थानकडे ध्वज सुपूर्दकोल्हापूर : आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यास छत्रपतींचा जरीपटका ध्वज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी अर्पण केला.
महाराष्ट्रात पंढरीच्या वारीची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. आजही या वारीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीतून पंढरपूरला नेण्यात येतात. लाखो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.
संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी हा पालखी सोहळा सुरू केला. त्यावेळी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी दिल्लीचा बादशहा औरंगजेब स्वराज्यावर चाल करून दक्षिणेत आला होता. तेव्हा त्याने या आषाढी वारीला उपद्रव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी या पालखी सोहळ्याला संरक्षण दिले होते. त्यांच्यानंतर छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई साहेब यांनीदेखील पालखी सोहळ्याला संरक्षण आणि सहकार्याची परंपरा कायम ठेवली.
यावेळी छत्रपती पालखी सोहळ्याकरिता मानाचा जरीपटका ध्वज अर्पण करीत असत. हा ध्वज पालखीच्या अग्रस्थानी असे. त्यामुळे मराठा सत्तेचे या सोहळ्याला संरक्षण असल्याचे सूचित होई.
स्वराज्याचा हा ध्वज आजही पालखीच्या अग्रभागी डौलाने फडकत असतो. शेकडो वर्षाची परंपरा वारकरी संप्रदाय आजही निष्ठेने जपत आहे. मधल्या काळात काही कारणास्तव लुप्त झालेली ही परंपरा मागील वर्षीपासून पुन्हा सुरू करण्यात आली.
मागील वर्षी तुकोबारायांच्या पालखी प्रस्थान पूजेस उपस्थित राहून जरीपताका ध्वज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीस अर्पण केला होता. यंदा कोल्हापुरातील जुना राजवाडा येथे देवघरात जरीपटक्याचे विधीवत पूजन करून हा ध्वज देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानाकडे सुपूर्द करण्यात आला.