श्री पंचकेदार मंदिर देखाव्याचे
चंद्रकांत पाटलांनी केले उद्घाटन
पुणे : गणेशोत्सवात पुण्यातील आणि राज्यातील गणेशभक्तांचे आकर्षण ठरणारा देखावा असतो, तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा. यंदा मंडळाने आकर्षक देखाव्यातून हिमालयातील श्री पंचकेदार मंदिर साकारले आहे. त्याचे उद्घाटन राज्याचे उच्च तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. ३१) झाले.
यावेळी ट्रस्टचे हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे, अमोल केदारी, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, सुनील जाधव यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुण्यामध्येच नाही, तर संपूर्ण जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. लाखो गणेशभक्त दगडूशेठच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. आज जगभरातून इंटरनेटच्या माध्यमातून देखील शेकडो भक्त दर्शन घेत आहेत. कोविड संकटानंतर उत्साह आणि आनंद देणारा हा उत्सव आहे.
श्री पंचकेदार मंदिर प्रासाद भगवान शिवशंकरांचे निवासस्थान असलेल्या हिमालयाच्या सानिध्यात विराजमान आहे. त्याचीच प्रतिकृती यंदा मंडळाने उभारली आहे. या मंदिर उभारणीत अनेक प्रतीकांचा, मूर्तींचा आणि लक्ष, लक्ष दिव्यांचा वापर केलेला आहे. अनेक देवी-देवता, व्याल, शार्दुलांच्या, यक्षगणांच्या मूर्ती, सूरसुंदरी, कमलपुष्पांच्या उत्तुंग शिखरांनी देखावा शोभित झाला आहे.
श्री पंचकेदार मंदिराच्या उत्तुंग शिखरावर सुवर्ण कलशाचा आमलक असून, त्यावर सिध्द ओंकाराच्या त्रिशूल डमरूच्या ध्वजदंडाने शोभायमान झाला आहे. नागांच्या नक्षीदार कमानीच्या शिखरावर, चारी दिशांना शिव शक्तीचे, अर्थातच शिवपार्वती मूर्तींचे वास्तव्य आहे. याशिवाय मंदिरामध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा २२१ झुंबरे लावण्यात आली आहेत. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे कलादिग्दर्शन केले आहे. विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केले आहे.
श्री पंचकेदार मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आडव्या भागावर, दोन्ही बाजूस असलेल्या गवाक्षात एकूण २८ सूरसुंदरी आहेत. त्या ७ आणि ७ अशा गटांत असून सप्त नद्या, सप्त सुरु यांच्या प्रतिनिधी आहेत. त्याच्या खालच्या आडव्या पट्ट्यात गंधर्व, स्त्री-पुरुष नृत्य, गायन करत आहेत. असा हा शिखराचा भाग अनेक शिवगण, सूरसुंदरी, गंधर्व, शार्दुल, नाग इत्यादींनी व्यापलेला आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस स्तंभाच्या रांगा आहेत. या स्तंभांच्या वरती दोन्ही बाजूस १८ मोरांच्या रांगा असून, स्तंभांच्या मध्य भागावर, बाहेरच्या बाजूने कमळनाळ घेतलेल्या ४४ सूरसुंदरी प्रत्येक बाजूवर आहेत. तर आतल्या भागावर असलेल्या सूरसुंदरी नमस्कार मुद्रेत असून त्या गणेश भक्तांना नमन करत आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूच्या स्तंभांवर मोद, प्रमोद नावाचे गणेशाचे द्वारपाल उभे आहेत. तर त्यांच्या बाजूला दोन भैरव मूर्ती आहेत.
नागांच्या किनातीने आणि कमानीच्या नक्षीदार बाकाने हे प्रवेशद्वार भक्तांना आनंद देते. इथून आपली नजर आत गर्भगृहात विराजमान असलेल्या प्रत्यक्ष श्रीमंत दगडूशेट हलवाई गणेशाच्या त्रैलोक्य सुंदर मूर्तीकडे जाते. दोन्ही बाजूस कमानीचे सहा स्तंभ दिसतील, त्यावर मोठे नक्षीदार व्याल दिसतील. हे स्तंभ आणि व्याल षड्रीपुंची प्रतीके आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, आणि मत्सर हे ते सहा षड्रीपू आहेत. श्रीचे आसन अष्ट स्तंभांच्या संगमरवरी मखरात विराजित आहे. हे स्तंभ आहेत अष्ट दिशांचे, अष्ट दिगपाल असलेल्या आणि अष्टमूर्ती शिवाच्या वास्तव्याचे. मखरावर पृथ्वी, वरूण, अग्नी, वायू, आदित्य आकाश, चंद्र, आणि नक्षत्र या अष्टवसुंचा कलश असून, त्यावर अष्ट नागांचे अर्थात अनंत, गुलिक, वासुकी, संकपाल, तक्षक, महापद्म, पद्म आणि कर्कोदक नावाच्या नागांचे कोंदण आहे. हे मखर नागांच्या अनेक कलशांच्या नक्षीदार रांगांनी आभूषित झालेले आहे.
३१ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण
गुरुवारी (दि. १ सप्टेंबर) पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिलांनी श्रीगणेशासमोर सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण केले. यावेळी प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यावेळी उपस्थित होते. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३५ वे वर्ष होते. यावेळी अनुराधा पौडवाल म्हणाल्या, जगद्गुरू शंकराचार्य रचित सौंदर्य लहरीचे पठण मी केले आहे. धर्म बळकट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे पठण आपण सर्वांनी एकत्रितपणे नक्की करूया.
रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत हरी जागराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समस्त वारकरी भजनाचा गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. याशिवाय सूर्यनमस्कार, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत.