पौष वारीसाठी तीन लाख

भाविक, वारकऱ्यांची गर्दी

त्र्यंबकेश्वर : ‘संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय’ अशा जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात नाशिकजवळची त्र्यंबकेश्वर नगरी आज (दि. १८) दुमदुमून गेली. कोरोनाकाळातील दोन वर्षांच्या खंडानंतर पौष यात्रा भरल्याने सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी गर्दी केली.

पालकमंत्री दादा भुसे यांनी पहाटेच सपत्नीक संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची शासकीय महापूजा केली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सूर्यवंशी दाम्पत्याला दर्शनाचे पहिले मानकरी होण्याचा मान मिळाला. थंडीला न जुमानता ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणेसह कुशावर्तात स्नानासाठी वारकऱ्यांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. यंदाच्या वारीत महिला वारकऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

नाशिकच्या अंजनेरी ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबक नगरीत, ज्योतिर्लिंगाच्या सान्निध्यात, गोदातिरी १६ जानेवारीपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. आज (दि. १८) दुपारी ४ वाजता संत श्री निवृत्तीनाथ महाराज रथोत्सव नगर परिक्रमा, आणि श्री त्र्यंबकराज भेट, कुशावर्त तीर्थस्नान सोहळा पार पडला. त्यानंतर संध्याकाळी श्री संत मुक्ताई संस्थानातर्फे परंपरेप्रमाणे कीर्तनसेवा पार पडली.

उद्या (दि. १९) म्हणजे द्वादशीला दुपारी हा. भ. प. रामकृष्ण महाराज लहवीतकर आणि ह. भ. प. बाळासाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन होणार आहे. त्रयोदशीला (दि. २०) सकाळी नऊ वाजता ह. भ. प. कान्होबा महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन तर, रात्रीचे कीर्तन ह. भ. प. उखळीकर महाराज यांचे होणार आहे. चतुर्दशीला (दि. २१) सायंकाळी सात वाजता ह. भ. प. जयंत महाराज गोसावी यांचे काढ्याचे कीर्तन होणार असल्याचे त्र्यंबकेश्वरच्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानातर्फे कळविण्यात आले आहे.

कडाक्याच्या थंडीतही हजारोंच्या संख्येने पायी आलेले वारकरी, भजन, कीर्तन आणि भारुडाने दुमदुमून गेलेली त्र्यंबकेश्वर नगरी असा माहोल सध्या येथे पहावयास मिळत आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला वारकऱ्यांनी केलेला नेत्रदीपक रिंगण सोहळाही भाविकांना तब्बल दोन वर्षांनी पाहायला मिळाला. यंदा यात्रेला आलेल्या सुमारे पाचशे दिंड्यांची नोंद करण्यात आली आहे. या दिंड्यांचे संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे पाटील, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर, विश्वस्त प्रा. अमर ठोंबरे आदींनी स्वागत केले. यावेळी दिंडी प्रमुखांना निवृत्तीनाथ महाराज यांची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

भाविकांसाठी एसटी महामंडळ आणि नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसचे नियोजन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करत असताना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तिनाथांना झाला. तो गुरुप्रसाद त्यांनी आपले धाकटे बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणाऱ्या भगद्वगीतेचा भावार्थ सर्वसामान्यांना समजण्यासाठी प्राकृत भाषेत लिहिण्याचा आदेश दिला. त्यानुसार ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) लिलिहिली. त्यांनी जुन्या रुढी, परंपरा यांनी ग्रासलेल्या समाजाला त्यांनी नवीन मार्ग दाखविला. यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. त्यामुळे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांना वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक मानले जाते, तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते.

संत निवृत्तिनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य १२ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली. त्यामुळे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा जेष्ठ महिन्यात पावसाळ्यात होतो. मात्र ही यात्रा पौष कृष्ण एकादशीला भरते. पंढरपूरची यात्रा आषाढ महिन्यात असते. त्यावेळी सर्व दिंड्या साधारण महिनाभर पायी वाटचाल करून पंढरपूरला जातात. कार्तिक महिन्यात आळंदीची यात्रा असते. हे सर्व लक्षात घेऊन संत निवृत्तीनाथांची यात्रा पौष महिन्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ही पौष यात्रा दरवर्षी साजरी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *