पालख्या वाखरी मुक्कामी;

उद्या दाखल होणार पंढरीत

वाखरी : आळंदीहून निघाल्यानंतर सुमारे १८ दिवसांपासून ।।ज्ञानबातुकाराम।।चा गजर करत मजल दरमजल करत पंढरपूरला निघालेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज (दि. ८ जुलै) अखेर पंढरपूरपूर्वीच्या शेवटच्या मुक्कामावर म्हणजे वाखरी येथे पोहोचला. पंढरपूर जवळ आल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला आहे.

भंडीशेगाव मुक्कामी प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई यांच्या हस्ते पहाटे माऊलींची विधीवत पूजा करण्यात आली. दिवसभर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कांदेनवमीच्या निमित्ताने पालखी तळावर वाल्हेकरांच्या दिंडीमध्ये कांदेनवमी साजरी करण्यात आली. पालखी सोहळ्यात वाल्हेकरांना समाजआरतीचे वेळी पंख्याचा मान असतो. वाल्ह्याचे अभियंते कृष्णाजी भगवंत मांडके यांनी नीरा नदीवर स्वखर्चाने पूल बांधून माऊलींचा पालखी सोहळा सासवड, जेजुरी, वाल्हेमार्गे लोणंदला नेला. त्यामुळे माऊलींना आरतीच्या वेळेस वारा घालण्याचा मान मांडके यांना देण्यात आला. त्यांच्या वतीने पालखी तळावर कांदेनवमी साजरी केली जाते.

संत नामदेव महाराजांसाठी रथ

श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पालखी सोहळ्याकरिता नूतनीकरण केलेला रथ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने संत नामदेवांचे वंशज असलेल्या नामदास कुटुंबीयांकडे हस्तांतरीत करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्थ डॉ . अभय टिळक संत नामदेव महाराजांचे वंशज केशव नामदास, एकनाथ नामदास, निवृत्ती नामदास, मुकुंद नामदास, नामदास कुटुंबीय तसेच हैबतबाबा आरफळकर यांचे प्रतिनिधी बाळासाहेब आरफळकर, दिंडी प्रमुख राणा महाराज वासकर, माऊली जळगावकर, गणेश कराडकर, देवीदास ढवळीकर, बाळासाहेब उखळीकर, हरिभाऊ बोराटे आजरेकर यांच्यासह दिंडीकरी, फडकरी आणि वारकरी उपस्थित होते. दुपारचे भोजन घेवून हा सोहळा शेवटच्या वाखरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.

बाजीराव विहीर येथे उभे रिंगण

दुपारी साडेबारा वाजता पिराची कुरोली येथून संत तुकाराम महाराजांचा तर एक वाजता भंडीशेगाव येथून संत ज्ञानेश्वर माऊलींचा सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. ओढ्यावर नवीन पूल झाल्याने तसेच रस्ता रुंद झाल्याने आणि उड्डाणपूल झाल्याने वाहतुकीत कोठेही अडथळा आली नाही. दुपारी अडीच वाजता सोहळा बाजीराव विहीर येथे उभ्या रिंगणासाठी पोहोचला. सोहळ्यातील दुसरे उभे रिंगण रस्त्यावरच लावण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता अश्‍व धावण्यासाठी सोडण्यात आले. पुढे माऊलींचा अश्‍व, तर मागे स्वाराचा अश्‍व धावत होता. टाळ मृदुंगाच्या गजरात माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा अखंड जयघोष चालू होता. अश्‍वांनी धावत जावून माऊलींना एक प्रदक्षणा पूर्ण केली. रथाजवळ येवून माऊलींचे दर्शन घेतले. नारळ, प्रसाद घेऊन पुन्हा तो पंढरीच्या दिशेने धावत आला. यावेळी वैष्णवांनी पुंडलिक वरदा, हरि विठ्ठल असा जयघोष केला. उभ्या रिंगणाचा सोहळा संपल्यानंतर गोल रिंगणासाठी हा सोहळा रस्त्यालगतच्या मैदानात पोहोचला. पाऊस पडून गेल्याने रिंगणाचा परिसर चिखलमय झाला होता.

चिखलात पार पडले गोल रिंगण

उभ्या रिंगणानंतर गोल रिंगणाला सुरुवात झाली. सुरुवातीला माऊलींचा आणि स्वाराचा अश्‍व रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आला. त्यानंतर पताकाधारी आणि माऊलींची पालखी दिंड्यांसमवेत एक प्रदक्षिणा पूर्ण करून रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आली. सायंकाळी साडेचार वाजता जरी पटक्याचा भोपळे दिंडीचा ध्वज रिंगणात धावण्यासाठी सोडण्यात आला. त्याने तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर माऊलींच्या अश्‍वाला चोपदारांनी रिंगण दाखविले. ढगाळ वातावरणात स्वाराच्या अश्‍वासह माऊलींच्या अश्‍वाने लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत नेत्रदिपक दौड करून दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी उपस्थितीत भाविकांनी माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करीत अश्‍वांवर खारीक, बुक्याची उधळण केली. रिंगण सोहळ्यानंतर दिंड्यामध्ये उडीचे खेळ रंगले. हे खेळ खेळताना सारे वैष्णव चिखलात माखून निघाले. उडीच्या खेळानंतर हा सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील उभे रिंगणही बाजीराव विहिरीजवळ नव्यानेच बांधलेल्या उड्डाणपुलावर झाले. समाज आरतीनंतर तो वाखरीत विसावला.

उद्या पालख्या पंढरीत

उद्या (दि. ९ जुलै) सर्व संतांना पुढे करून सर्वात शेवटी दुपारी १ वाजता माऊलींची पालखी वाखरीतून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार आहे. विसावा पादुका येथे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर आरती होईल. माऊलींच्या पादुका या श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातील आणि त्या पंढरपुरातील ज्ञानेश्‍वर मंदिरात नेल्या जातील. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज आदी संतांच्या पालखी सोहळ्यासमवेत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेले सुमारे ९ लाख वारकरी वाखरीत दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *