उद्याच्या आषाढी एकादशीसाठी
भूलोकीचे वैकुंठ पंढरपूर सज्ज
पंढरपूर : माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।। या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातील भावनेप्रमाणे महाराष्ट्रातील विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या आज (दि. ९ जुलै) अखेर भूवैकुंठ पंढरपुरात पोहोचल्या आहेत. पावलो पंढरी वैकुंठ भुवन। धन्य आजी दिन सोनियाचा॥ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे तब्बल दोन वर्षांनी पंढरपुरात आलेले वारकरी भरून पावल्याची भावना व्यक्त करत आहेत. वाखरीवरून निघालेला माऊलींचा पालखी सोहळा रात्री साडेनऊ वाजता श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी पोहोचला आणि आरतीनंतर आषाढी पायी वारी सोहळ्याची सांगता झाली.
रात्रीच (दि. ८ जुलै) बहुतेक पालख्या वाखरीमध्ये मुक्कामी आल्या होत्या. रिमझिम पावसात आज वाखरी येथे उभे रिंगण पार पडले. सुमारे १० लाख भाविकांनी वाखरी येथे हजेरी लावली. वाखरी हे ठिकाण पंढरपूर पासून आठ किलोमीटरवर आहे. पहाटेपासूनच वाखरीवरून वेगवेगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये येण्यास सुरुवात केली.
पंढरपुरात अगोदरच प्रवेश केलेली संत मुक्ताबाईंची पालखी आणि पंढरपूर येथील केशवराज संस्थानमधून निघणारी संत नामदेवांची पालखी सर्व संतांच्या स्वागतासाठी सकाळी वाखरी येथे आल्या. रिंगण झाल्यानंतर पांडुरंगाचे प्रतिनिधी असलेल्या नामदेवरायांच्या पालखी सोहळ्याला माऊलींच्या पालखी सोहळ्याचे बाळासाहेब चोपदार यांनी पंढरपुराकडे सर्वात पुढे चालण्याची विनंती केली.
पुरंदरे मळा येथे माऊलींची पालखी मुख्य रथातून खाली उतरवून भा रथात ठेवण्यात आली. त्यानंतर वडार समाजाने हा रथ ओढत इसबावी येथील पादुका मंदिराजवळ आणला. यावेळी हजारो भाविकांनी माऊलींच्या पादुकांवर खारीक, बुक्क्याची उधळण करत माऊलींचे दर्शन घेतले. त्यानंतर एकामागोमाग एक असे सात मानाचे पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. सर्वात शेवटी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, त्यांच्या पुढे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, त्या पुढे संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका, संत मुक्ताबाई आणि पंढरपूरवरुन संतांच्या स्वागताला आलेले संत नामदेवराय असा क्रम होता. माऊलींच्या पादुका गळ्यात अडकवून शितोळे सरकार यांनी पंढरपुरात प्रवेश केला. सर्वात शेवटी असलेल्या माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये रात्री साडेनऊ वाजता पोहोचला.
पाच दिवस पंढरपुरात मुक्काम
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम नाथ चौक येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये आहे. संत एकनाथ महाराजांची पालखी नाथ चौकातील नाथ मंदिरात उतरली. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बेलापूरकर मठामध्ये मुक्कामी आहे. तर, संत तुकाराम महाराजांची पालखी प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये उतरली आहे. या सर्व पालख्यांचा मुक्काम दशमी ते चतुर्दशी असा पाच दिवस पंढरपुरात असणार आहे.
एकादशीला नगरप्रदक्षिणा
माऊलींच्या पादुकांचे एकादशीला नगर प्रदक्षिणेच्या वेळी चंद्रभागा स्नान होईल. काल्याच्या दिवशी चंद्रभागा स्नान, नंतर पांडुरंगाची भेट होऊन गोपाळपुरात काला होईल. काला करून पालखी दुपारी चारनंतर परतीचा प्रवास सुरू करेल. आषाढ वद्य दशमीला पालखी आळंदीला पोहोचेल. आषाढ वद्य एकादशीला नगरप्रदक्षिणा होऊन वारीची सांगता होईल. त्यानंतर बारस सोडून सर्व वारकरी आपापल्या गावी परततील.