प्रा. राम चरण यांनी
गुंफले पहिले पुष्प
पुणे : जगातील शक्तीशाली देशांमधील विवादांमुळे सर्वत्र कलह वाढताना दिसत आहे. अशा वेळेस मनाची शांती, मानवता आणि आपले कर्तव्य या तीन वैश्विक सत्यांचे पालन केल्यास सृष्टीत शांतता नांदेल, असे विचार अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक आणि जागतिक स्तरावरील व्यावसायिक सल्लागार प्रा. राम चरण यांनी गुरुवारी (दि. २४) येथे व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंत आयोजित २७वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या समारंभासाठी अनामेय वैदिक आश्रमाचे आध्यत्मिक गुरू स्वामी आशुतोष स्ट्रोबेल, रामकृष्ण मिशनचे स्वामी संपूर्णानंदजी, जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी आणि ग्लोबल मार्केटिंगचे उपाध्यक्ष संजय कामटेकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष आणि युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. संजय उपाध्ये आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.
डॉ. रामचरण पुढे म्हणाले, स्पर्धात्मक युगात प्रत्येक मानवाने आपले मन शांत ठेऊन कार्य करावे. त्यातूनच रोजच्या जीवनात मानसिक समाधान आणि आनंद मिळतो. वर्तमान काळात युक्रेन, रशिया, तुर्की, सिरिया या देशातील विद्रोही स्थिती मानवाला दुःखाच्या खाईत ढकलत आहे. भय, क्रोध, आळस, अहंकार, अवास्तव महत्वाकांक्षा आणि तृष्णा या सर्व गोष्टी मानवी दुःखाला कारणीभूत आहेत. एकमेकांवर विश्वास न ठेवणे हे विवादाचे मुख्य कारण आहे. मानव जातीला आत्मिक आनंदासाठी दररोज नवनवीन शिकण्याची गरज आहे. तसेच मनाला शांत ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात या गोष्टींची सवय लावून घ्या. तसेच एकमेकांवर विश्वास ठेवणे, सकारात्म विचारधारा असणे आणि भारतीय संस्कृतीचे पालन केल्यास मानवाचे कल्याण होईल.
स्वामी संपूर्णानंदजी म्हणाले, ज्ञानात शक्ती सामावलेली असते. त्यामुळे स्वामी विवेकानंद यांनी विज्ञानाची कास धरून अध्यात्म आणि ध्यानाच्या मार्गावर चालावे असे सांगितले. महाराष्ट्र ही संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांसारख्या संतांची भूमी आहे. त्यांनी सांगितलेल्या सत्याच्या ज्ञानाचे पालन केल्यास जीवनाचा खरा आनंद मिळेल. ध्यान आणि समाधीप्राप्तीसाठी शांती ही सर्वात महत्वाची आहे. ‘एकम सत विप्रा बहुधा’ म्हणजेच सत्य एक आहे. स्वामीजींच्या वचनावर चालणारे डॉ. विश्वनाथ कराड हे खर्या अर्थाने कर्मयोगी आहेत.
स्वामी आशुतोष स्ट्रोबेल म्हणाले, सृष्टीतील प्रत्येक प्राणीमात्राला शांतीची गरज आहे. लोकसंख्येच्या पाच टक्के लोकांनी रोज योग आणि ध्यानधारणा केली, तर त्याच्या सामर्थ्यांने समाजावर चांगले परिणाम दिसून येतील. या संदर्भात अमेरिका, चीन आणि अन्य देशांमध्ये असे प्रयोग केले जात आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जीवन उंचाविण्यासाठी आनंद सर्वात महत्वाचा आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ईश्वर व्यक्ती नाही तर शक्ती आहे. तत्त्वांची पूजा हीच खरी ईश्वर पूजा आहे. जीवनातील सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी अध्यात्माला समजून घेणे आवश्यक आहे. या व्याख्यानमालेत केवळ चर्चा नाही तर हृदयातून निघालेले चिंतन आहे. यातूनच आम्हाला मनाच्या अंतःकरणाचा शोध घ्यावयाचा आहे. त्याग, समर्पण आणि प्रेम हेच जीवनाचे खरे तत्व आहेे.
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न या व्याख्यानमालेतून केला जात आहे. यातील विचारांची प्रेरणा घेऊन जीवन जगले पाहिजे. यावेळी संजय कामटेकर आणि डॉ. संजय उपाध्ये यांनीही आपले विचार मांडले. प्रा. डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी आभार मानले.
बुधवार दि. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. या समारंभासाठी राजस्थान विधानसभेचे सभापती डॉ. सी. पी जोशी, द्वारका येथील इस्कॉन मंदिराचे अमोग लीला दास, पद्मश्री शांती दूत सद्गुुरू ब्रह्मेशानंदचार्य स्वामी आणि कवी, लेखक आणि प्रेरक वक्ता डॉ. इंद्रजीत भालेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
२५ ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत दुपारी ४.३० वाजता होणाऱ्या व्याख्यानमालेत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील (राष्ट्रीय शिक्षण धोरण), पुणे येथील गोखले इन्स्टीट्यूट ऑफ पॉलिटेक्निक व इकॉनॉमीचे कुलगुरू डॉ. अजित रानडे (आर्थिक वाढ आणि समानता), इस्त्रोेचे माजी शास्त्रज्ञ डॉ. भानू पंत (इस्त्रो : आज आणि उद्या), नवी दिल्ली येथील डॉ. वेदाभ्यास कुंडू (नॉनव्हाइलेंट कम्युनिकेशन फॉर हार्मेनियस कोएक्झीटन्स), महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे ( इन सर्च ऑफ व्हाब्रंट डेमॉक्रॉसी ऍण्ड पीस) अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
या व्याख्यानमालेला जोडूनच सकाळी ८.४५ ते १२.०० पर्यंत कार्याशाळा होणार आहे. यामध्ये आध्यात्मिक वक्ता डॉ. भावार्थ देखणे, अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे माजी प्रभारी कुलगुरू सय्यद अहमद अली, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, विचारवंत व प्रेरणादायी वक्ते डॉ. संजय उपाध्ये, डीआरडीच्या संशोधन आणि विकास आस्थापनाचे संचालक प्रदीप कुरुळकर, सामाजिक कार्यकर्ता रमेश पानसे, प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, ‘रिंगण’चे संपादक सचिन परब, लेखक व इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील, युनेस्को चेअर डॉ. प्रियंकर उपाध्याय, पिस फेलो डॉ. अंजू उपाध्याय, लेखक विश्वासराव पाटील या मान्यवरांची विश्वशांती, संस्कृती व प्रबोधन इत्यादी विषयांवर व्याख्यानांची विशेष कार्यशाळाही आयोजित केली आहे.
प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता आणि श्रोते यांच्यामधील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम हे या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या व्याख्यानमालेमध्ये २५ ते २९ नोव्हेंबरपर्यंत माईर्स एमआयटी संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ७.०० ते ८.०० या वेळात योगासन वर्गाचेही आयोजन स्कूल ऑफ योग अँड मेडिटेशनचे विभाग प्रमुख प्रा. निरंजन खैरे व क्रीडा विभागाचे संचालक प्रा. डॉ. पी. जी. धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. योगासन वर्ग आयोजित करणारी माईर्स एमआयटी, पुणे ही एकमेव शैक्षणिक संस्था आहे.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल’, हे स्वामी विवेकानंदांचे वचन व तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरी आणि गाथेतील ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वदर्शन हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू आहे. ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे, अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे यांनी दिली.