माऊलींच्या ७२५ व्या संजीवन
समाधी सोहळ्याचे औचित्य

आळंदी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांचे ७२५ वे निर्वाण वर्षानिमत्त आळंदी येथे आजपासून (दि. १८) अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालय येथे शनिवार आणि रविवारी (१८, १९ जून) आयोजित या कार्यक्रमांचे उद्घाटन वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अध्यापक मारुती बाबा कुऱ्हेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. नारायण महाराज जाधव, मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष श्री रविंद्र भैय्यासाहेब पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या समाधी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘ज्ञानियांचा राजा’ या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १८ आणि १९ जून २०२२ या कालावधीत आळंदी येथील श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालय येथे करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात सारेगमप महाविजेती कार्तिकी गायकवाड आणि गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड हे सुप्रसिध्द कलाकार आपली कला सादर करणार आहेत. याशिवाय दररोज हरिपाठ, व्याख्यान, कीर्तन, भजन, अभंगवाणी, भक्तीगीते, भारुड, दिंडी इत्यादी कलांचा अविष्कार या कार्यक्रमात पाहता येणार आहे.

आज (दि. १८) दुपारी ४ वाजता हरिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका आणि संत मुक्ताई यांच्या जीवनावर श्री निरंजन नाथजी यांचे व्याख्यान झाले. ह. भ. प. अक्षय महाराज भोसले यांचे कीर्तन झाले. रात्री ८ वाजता सुप्रसिद्ध संगीतकार गायक कल्याण गायकवाड, प्रसिद्ध कलाकार कार्तिकी गायकवाड आणि कौस्तुभ गायकवाड यांनी भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर केला.

रविवारी (दि. १९) दुपारी ४ वाजता हरिपाठ होईल. श्री स्वामीराज भिसे महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान सादर करणार आहेत. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडावर आधारीत समर्थ पाटील भजन सादर करणार आहेत. तर ह. भ. प. शप्रमोद महाराज जगताप हे कीर्तन करणार आहेत.

तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या काव्यावार आधारीत ओडिसी नृत्य श्रीमती शुभदा दादरकर आणि सहकारी सादर करणार आहेत. त्याचप्रमाणे भूपाळी ते भैरवी कलामंच ही संस्था गण, गौळण, नमन, भूपाळी, ओवी, वासुदेव, दिंडी, कीर्तन, भारुड, पसायदान इत्यादी कार्यक्रम सादर करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *