पंढरपुरात गोपाळकाला करून

पालख्या निघाल्या परतवारीला

पंढरपूर :
उपजोनिया पुढती येऊं। काला खाऊं दही भात॥
वैकुंठी तो ऐसे नाही। कवळ काही काल्याचें॥
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करत, एकमेकांना काल्याचा प्रसाद भरवून समता, बंधुता, एकोप्याचा संदेश देत आज (दि. १३ जुलै) पंढरपुरातील गोपाळपुरा येथे विविध संतांच्या पालखी सोहळ्यांनी गोपाळकाला साजरा केला. त्याचबरोबर श्री विठ्ठलाची भेट घेऊन ‘जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’ म्हणत संतांच्या पालख्या पंढरीतून आपापल्या गावाला अर्थात परतवारीला निघाल्या आहेत.

चंद्रभागा स्नान करून पालख्या गोपाळपूरला
आजच्या पौर्णिमेच्या दिवशी पहाटेपासूनच परंपरेनुसार संतांच्या पालख्या पंढरपूरच्या जवळच असलेल्या गोपाळपूर येथे दाखल झाल्या. पहिली मानाची अमळनेरकर महाराजांची पालखी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. त्यानंतर श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. त्याच्या मागोमाग विविध संतांच्या छोट्या मोठ्या दिंड्या, पालख्या विठ्ठलनामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या.

सकाळी अनुक्रमे सव्वानऊ वाजता जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांची, तर साडेनऊ वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले. गोपाळपूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी, तसेच शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालख्यांचे स्वागत करून त्यांचे पूजन केले.

संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, संत निवृत्ती महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालख्या काल्यासाठी गोपाळपुरात दाखल झाल्या. त्याअगोदर संतांच्या पादुकांना चंद्रभागा स्नान घालण्यात आले.

तत्पूर्वी गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे दोन वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात करण्यात आली. पूजेनंतर पहाटे तीन वाजल्यापासून श्रीकृष्ण मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रध्देने श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली, तसेच एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली. श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप केले जात होते. याचवेळी परंपरेप्रमाणे संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा काला श्री विठ्ठल मंदिरामध्ये देवासमोर लाकडी सभामंडपामध्ये झाला.

गोपाळपुरात श्रीकृष्णाचे मंदिर
गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूरपासून दक्षिणेस दोन किलोमीटरवर आहे. या ठिकाणी एका टेकडीवर गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. हे मंदिर अत्यंत प्रेक्षणीय, दगडी बांधकामाचे असून मंदिराच्या कडेने किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे. मंदिराच्या आवारातच देवाचे सासरे भीमकराज आणि जनाबाई इत्यादींची मंदिरे आहेत.

गोपाळकृष्णाची मूर्ती देहुडाचरणी वेणू वाजवणाऱ्या रूपात आहे. या मूर्तीचा चेहरा आणि पंढरपुरातील मुख्य मंदिरातील पांडुरंग मूर्तीचा चेहरा बराचसा सारखा आहे. पंढरपुरातील श्री विठ्ठल हा गोकुळीचा श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे सर्व सवंगड्यांना घेऊन गोकुळात दहीहंडी उत्सव केला, त्याचप्रमाणे सर्व जातीधर्माचे वारकरी गोपाळपुरात गोपाळकाला करतात.

देव आणि विठ्ठलाची भेट
यानंतर आज परतवारीला निघण्यापूर्वी सर्व प्रमुख संतांच्या पादुका श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात नेऊन देव आणि संतांची भेट घडविण्यात आली. देवदर्शनानंतर श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोहळ्याने सायंकाळी ४ वाजता परतवारीसाठी प्रस्थान ठेवले.

यावेळी
पंढरीहुनि गावी जातां। वाटे खंती पंढरीनाथा।।
आता बोळवीत यावे। आमुच्या गावा आम्हासवे।।
तुम्हां लागी प्राण फुटे। वियोग दु:खे पूर लोटे।।
निळा म्हणे पंढरीनाथा। चला गावा आमुच्या आता।।
हा संत निळोबारायांचा अभंग म्हणत वारकऱ्यांनी जड अंत:करणाने पंढरपूरचा निरोप घेतला.

माऊलींना निरोप देण्यासाठी हजारो पंढरपूरकर वेशीपर्यंत आले होते. आज पालखीचा मुक्काम वाखरी येथे असणार आहे. यानंतर वेळापूर, नातेपुते, फलटण, पाडेगाव, वाल्हे, सासवड, हडपसर, पुणे असे आठ मुक्काम करून पालखी सोहळा आषाढ वद्य दशमीला आळंदीत पोहोचेल. आषाढ वद्य एकादशीला नगरप्रदक्षिणा होऊन वारीची सांगता होईल. बारस सोडून सर्व वारकरी आपापल्या गावी परतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *