पंढरपूरच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या

वारी फोटोग्राफीला जगभर दाद

संत ज्ञानेश्वर माऊलींनी तेराव्या शतकात संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचे पसायदान मागितले. तेच विचार घेऊन पंढरीच्या वारीचा ओघ शेकडो वर्षे वाहतो आहे. ही वारी कॅमेऱ्यात टिपून एक तरूण ती जगभर पोचवत आहे. विशेष म्हणजे त्याच्या या वारीच्या फोटोंचं परदेशांमध्ये कौतुक होत आहे. त्या तरुण फोटोग्राफरचं नाव ज्ञानेश्वर माऊली वैद्य. त्यांची ही फोटोवारी त्यांच्याच शब्दांत…

आजपर्यंत मला ४० देशांत ७०हून अधिक सुवर्ण पदके, १२० हून अधिक सिल्व्हर आणि ३०० हून अधिक ब्राँझ मेडल्स मिळाली आहेत. शिवाय अनेक प्रकारची ऍवॉर्डस् आणि रोख बक्षिसे, शिवाय अनेक मानसन्मान माझ्या खात्यात जमा झाले आहेत. यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, वारीच्या अनेक फोटोंनी हा बहुमान मला मिळवून दिला आहे.
रुढ अर्थाने ना मी श्रीमंत ना उच्चशिक्षित. पण डोक्यात फोटोग्राफीचा नाद घुसला आणि मला तो पुढं पुढं नेत गेला. माझं मूळ गाव पंढरपूर. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे सहकुटुंब राहतो. अठरा विश्व म्हणतात तसं दारिद्र्य माझ्या कुटुंबाच्या वाट्याला आलं. त्यातून मार्ग काढता काढता नाकी नऊ, तिथं फोटोग्राफीचा छंद जोपासणं म्हणजे अवघडच. पण तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सारं विश्व तुमच्या पाठीशी उभं राहतं म्हणतात ना, तसे नरसोबाच्या वाडीचे दत्त महाराज आणि वारीच्या वाटेवर माऊली मला पावले.

लहानपणी मी एका पाहुण्यांच्या घरी गेलो होतो. तिथं एका खिडकीत लहान कॅमेरा चार्जिंगला लावून ठेवलेला दिसला. मला लहानपणापासून कॅमेरा या वस्तूचं कुतुहल होतं. मी तो कॅमेरा उचलून नीट वरती ठेवला. पण तो कॅमेरा ज्याचा होता त्यानं पाहिलं. त्याला वाटलं मी कॅमेरा चालू करतोय. त्यानं येऊन खाड्दिशी माझ्या कानाखाली मारली! म्हणाला, किती महागडा कॅमेरा आहे, काही झालं तर? त्यानं गालावर मारलेली ती चापट माझ्या हृदयापर्यंत गेली. मी तिथंच निश्चय केला, आपल्याकडे पैसे आले, की आपणही कॅमेरा घ्यायचा!
पण पैशांअभावी ते लांबत गेलं…

एकदा किल्ले रायगडावर पहिल्यांदा शिवछत्रपतींच्या दर्शनाला गेलो होतो. तीन दिवसांचा मुक्काम होता. मी रात्री गडावरती पोहोचलो, तेव्हा तिथं तीनचार जण जेवण करत बसले होते. प्रत्येकाकडं कॅमेरे होते. ते त्यांनी बाजूलाच ठेवले होते. ते हौशी फोटोग्राफर होते. तुमच्या सोबत थांबू का, असं विचारलं. त्यांनी परवानगी दिली. पुढचे तीन दिवस ते फोटो काढत होते आणि मी त्यांच्यासोबत फिरत होतो. त्यांची फोटोग्राफीची पद्धत, फ्रेमिंग, कॅमेरा त्याच्या लेन्सेस, फोटोग्राफीचे वेगवेगळे प्रकार हे सगळं त्यांच्याकडून समजून घेत राहिलो.

मग कॅमेरा खरेदी करायचं खूळ डोक्यात भरलं. पुण्यातल्या दोन चुलत भावांकडे आलो आणि त्यांच्या सोबत जाऊन माझा पहिला निकॉन कुलपिक्स (पाईंट ऍड शूट) हा कॅमेरा सहा हजार रुपयांना विकत घेतला. त्या कॅमेऱ्यावर मी खूप काही शिकलो. पुढं सांगलीचे कॅमेरा विक्रेते शरद सारडा यांची भेट झाली. त्यांनी मला एक DSLR घ्यायला सांगितला. वर्षभर पैसे जमवून मी ३७ हजारांचा NIKON D3100 कॅमेरा घेतला.

आपण फोटोग्राफीचा बेसिक कोर्स करायला हवा, असं मनात आलं आणि तसा कोर्स घेणाऱ्या दिलीप नेर्लिकरांची भेट झाली. त्यांना मी काढलेले फोटो दाखवले तप, म्हणाले, तुला कोर्स करण्याची गरजच नाही. भारीच काढतोस ती फोटो! माझं मन मोरपीसच झालं जणू, पण जास्त हवेत न तरंगता नेर्लिकर सरांकडून फोटोग्राफितले बारकावे शिकलो. त्या नंतर आयुष्यात आले तिलक हरीया. त्यांनी मला फोटो एडिटींग आणि फोटोग्राफीच्या स्पर्धेसाठी तयार केलं. माझे तिसरे गुरू अशोक सरावनन मला भेटले इंटरनेटवर. ते चेन्नईचे होते. मी त्यांच्याशी संपर्क केला. पण त्यांना हिंदी कळत नव्हतं आणि मला इंग्रजी. मग गूगल ट्रान्सलेटर मदतीला धावलं. मराठीत टू इंग्लीश आणि इंग्लीश टू मराठी-हिंदी असा संवादाचा द्रविडी प्राणायाम तब्बल तीन वर्षे चालला. त्यांच्यासारखे फोटो काढण्याचे प्रयत्न मी केले. तीन वर्षांनी त्यांची चेन्नईत भेट झाली. त्यांच्या CWC(चेन्नई विकेंड क्लिकर्स) ग्रुपशी दोस्ती झाली. नवी माणसं भेटत गेली आणि फोटोग्राफीचा छंद विस्तारत गेला.

असाच एकदा घरी फोटो एडिटींग करत असताना वडील म्हणाले, तू एवढं फिरतो. काय मिळतं त्यातून? मी म्हणालो, मन:शाती! ते मला म्हणाले, मग वारीची फोटोग्राफी करायला का जात नाही? आषाढी वारी वीसेक दिवसांची असते. आपण वारकरी आहोतच आणि तू माळकरीही आहेस. कर यंदा पायी वारी…

त्यांनी एवढं म्हणायचा अवकाश अन् मी २०१६ ची माझी पहिली पायी वारी करण्यास तयार झालो. प्रस्थानाचा भारावून टाकारा सोहळा बघितला आणि नंतर पंढरपूरपर्यंतचा सुमारे २० दिवसांचा चैतन्यदायी प्रवास अनुभवला. नाना रंगाची, नाना ढंगाची, एकमेकांना ‘माऊली-माऊली’ म्हणणारी निर्मळ मनाची माणसं किती टिपू न् किती नको, असं झालं. त्या वर्षी मी तब्बल १६ हजारांहून अधिक फोटो काढले. यापैकी अनेक फोटो ३६ देशांमधे गाजले. हजारो लोकांनी ते प्रदर्शनात पाहिले. आपल्या विठुरायाची आषाढी वारी अवघ्या जगाने पाहिली, अनुभवली… हे माझ्याकडून भगवंतानेच करून घेतले, अशी माझी ठाम श्रद्धा आहे.

आम्ही KAPA ( कोल्हापूर अमॅच्युअर्स फोटोग्राफर्स असोशिएशन) या ग्रुपची स्थापना केली. आम्ही सर्वांनी २०१७, १८, १९ या वर्षी वारीत सहभागी होऊन फोटो काढले. नॅशनल जिओग्राफी सारख्या जगप्रसिद्ध संस्थेनं आमचे वारीचे फोटो त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले. माझे वैयक्तिक ६० फोटो नॅशनल जिओग्राफीने प्रसिद्ध केले. वारीने फोटोग्राफर ज्ञानेश्वर वैद्य हे नाव जगभर पोहोचवले.

शालेय शिक्षणाला मी लवकरच रामराम केला होता. पण पश्चिम महाराष्ट्रातली पहिली फोटोग्राफीची पदवी मी मिळविली. त्यानंतरही दोन इंटरनॅशनल पदव्या मिळविल्या. डॉक्युमेन्ट्री फोटोग्राफीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील विविध प्रथा, परंपरांची मी फोटोग्राफी केली.

मी अनेक फोटो झपाटल्यासारखे काढले आहेत. गंगातीरी देह ठेवावा ही प्रत्येक हिंदू माणसाची इच्छा असते. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या रुपाने गंगेच्या तीरावर एक मृत्यूसोहळाच सुरू असतो. तो टिपण्यासाठी मी वाराणसी गाठली. तिथल्या मणिकर्णिका या घाटावरच्या स्मशानात तब्बल तीन दिवस राहिलो. नाश्ता आणि दोन वेळचं जेवण तिथंच स्मशानात. आणि मला हवा असलेला फोटो चौथ्या दिवशी रात्री १२-१ वाजण्याच्या सुमारास मिळाला. सकाळी फोटो पाहिला तेव्हा आपल्या तपश्चर्येचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. पण स्वत:कडं पाहिलं तेव्हा लक्षात आलं, आपण पूर्णपणे स्मशान बैरागी झालो आहोत. अंगावर चितेची राख जमा झाली होती. कानात, नाकात, पापण्या, डोकं सर्वत्र चितेची राख साचून राहिली होती. तशीच गंगेत डुबकी मारली आणि ट्रेन पकडून घरी परतलो. मुंबईत तिलक सरांना तो फोटो दाखवला, तर त्यांनी हातच जोडले! तो फोटो जगभर गाजला. त्याला अनेक नामांकने आणि बक्षिसे मिळाली.

वाराणसीतील नागा साधू, अंदमान येथील सेल्युलर जेल अशा अनेक फोटोंवर जागतिक कौतुकाची मोहोर उमटली. जीवनातील विविध रंगांचा उत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं मला मोठं आकर्षण आहे. त्यामुळं आषाढी वारीसोबतच पट्टणकोडोली, जोतिबा, जेजुरी या यात्राही कॅमेऱ्यात टिपण्यासाठी जातो. पण वारीचा २० दिवसांचा अनुभव मात्र अनोखा असतो. तिथं असते ती फक्त निर्मळ मनं अन् माणुसकी. ती टिपण्याचा मी प्रयत्न करत राहतो.

8 thoughts on “माऊलींची फोटोवारी जगात भारी

  1. डी वी दादांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे.
    फोटोग्राफी क्षेत्रातील “अवलिया”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *