दोन्ही संतांच्या पादुका
राम मंदिराच्या भेटीला
पुणे : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२६ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानोबा माऊली आणि संत तुकोबारायांच्या पादुका दुबईतील राम मंदिराच्या भेटीला जाणार आहेत. कार्तिक एकादशीनिमित्त यंदा संत ज्ञानोबा-तुकोबा विश्वभ्रमण दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
२० ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही दिंडी आळंदी-पुणे-दुबई-राम मंदिर-बरजुमान-अबुदाबी-शारजा-पुणे-आळंदी असा प्रवास करणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी प्रथमच परदेशात या दिंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या उपक्रमाच्या अध्यक्ष प्रीती करांडे यांनी दिली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जागतिक तत्त्वज्ञान सामावलेल्या श्रीमद भगवद्गीता या ग्रंथावर अनुवादात्मक ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून जगाला अंधकाररूपी अज्ञानातून प्रकाशरूपी ज्ञानाकडे सर्वसामान्यांना नेण्याचे कार्य केले आहे. तसेच श्री संत तुकाराम महाराजांनी ‘जगद्गुरू’ या पदवीला योग्य न्याय देत समाजाला ज्ञान देण्यासाठी पाचवी वेदरूपी अभंग गाथा लिहिली. संत बहिणाबाईंच्या उक्तीप्रमाणे ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे जगातील सकल संतांचे महामेरू श्री संत ज्ञानोबाराय, तुकोबारायांच्या विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी प्रथमच विदेशी धरतीवर श्री संत ज्ञानोबा, तुकोबा विश्वभ्रमण दिंडीचे आयोजन केले आहे. दुबईतील राम मंदिरात हा सोहळा पार पडणार होणार आहे, अशी माहिती प्रीती करांडे यांनी दिली.
दुबईतील या मंदिरात रविवारी (दि. २०) कार्तिकी एकादशीचा सोहळा पार पडला. त्रयोदशीला (दि. २२) माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विठू नामाचा गजर, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असा धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
गेल्याच महिन्यात दुबईतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. २०२०मध्ये या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली होती. अरब आणि हिंदू स्थापत्यरचनेतून संगमरवरी दगडात साकारलेल्या या भव्य, सुंदर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठे सभागृह बांधले आहे. या मंदिरात दररोज सुमारे दीड हजार भाविक ऑनलाईन नोंदणी करून दर्शनासाठी येतात.
माउलींची क्रुपा द्रुष्टि अशिच असोदेत आम्हावरी /