‘गाथा परिवारा’तर्फे देहूत इंद्रायणीमध्ये
जगद्गुरू तुकारामांच्या गाथ्याचे पारायण
देहू : संत तुकाराम महाराजांचे अभंग आपल्या हृदयावर कोरले जावेत. हे अभंग जीवनात उतरवले तर, आपले जीवनही तरून जाईल, अशी भावना देहूतील गाथा मंदिराचे प्रवर्तक आणि संत तुकाराम महाराज वाड्ःमय संशोधन मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. पांडुरंग महाराज घुले यांनी आज (दि. ११) येथे व्यक्त केले.
देहू येथील इंद्रायणी नदीच्या आनंद डोहात संत तुकाराम महाराजांचे अभंग बुडविले गेले. त्यामुळे तुकाराम महाराजांनी १३ दिवस डोहाच्या कडेला दगडी शिळेवर बसून उपोषण करत सत्याग्रह केला. त्यामुळे चैत्र शुद्ध तृतीयेला तुकोबांची अभंग गाथा देवाने पाण्यावर तारली, अशी श्रद्धा आहे.
या घटनेचे औचित्य साधून आज चैत्र शुद्ध तृतीयेला (दि. ११) आनंद डोहाच्या पाण्यात उभे राहून गाथेतील अभंगांचे पारायण करत ‘गाथा पुनरुत्थान दिन’ साजरा करण्यात आला. ‘गाथा परिवारा’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाण्यातील अभंग पारायणानंतर आयोजित कार्यक्रमात घुले महाराज बोलत होते. या प्रकारच्या उपक्रमांमधून तुकोबांची गाथा समाजात पोहोचली जावी, अशी अपेक्षा घुले महाराजांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे, जागतिक ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे, पंढरपूरच्या कैकाडी महाराज मठाचे ह. भ. प. भारत महाराज जाधव, देहूचे माजी सरपंच मधुकर कंद पाटील, इतिहास लेखक लक्ष्मण कंद पाटील, तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिराचे डॉ. विवेकानंद मोरे, गाथा परिवाराचे संस्थापक ह. भ. प. उल्हास पाटील, कार्यक्रमाचे निमंत्रक प्रभाकर भोसले, सामाजिक कार्यकर्ते किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी आदी मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भास्कर हांडे यांनी आपल्या मनोगतात तुकोबारायांच्या पूर्वी मावळ प्रांतातील समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा मागोवा घेतला. तसेच या समृद्ध परंपरेचा तुकोबारायांच्या लेखनावर कसा प्रभाव पडला हे विशद केले.
प्रास्ताविकात किशोर ढमाले म्हणाले, ह. भ. प. तुकाराम महाराज घाडगे या ठिकाणी गेली काही वर्षे अशा प्रकारे आनंद डोहाच्या पाण्यात उभे राहून गाथा पारायण करत आहेत. मात्र चैत्र शुद्ध तृतीया हीच गाथा तरल्याची तिथी आहे, असे संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी आम्हाला सांगितले. त्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम आज आयोजित केला.
अशाच प्रकारे आपल्याला गावातील नदीलाच इंद्रायणी नदी समजून त्याच नदीत गाथा पारायण करावे, असे आम्ही सुचविले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील १०० गावांमध्ये हे गाथा पारायण होत आहे. आता दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत.
इंद्रायणीच्या डोहात गाथा पारायण झाल्यानंतर डोहाकडेच्या तुकोबा ज्या शिळेवर सत्याग्रहासाठी बसले होते, त्या मंदिरात आरती करण्यात आली. डॉ. विवेकानंद मोरे यांनी यावेळी तुकोबांच्या अभंगावरील कविता सादर केली. तर, शेवटी प्राचार्य ज्ञानेश्वर गुलीग यांनी ‘तुका आकाशाएवढा’ हा अभंग सादर केला. अभिजीत घोरपडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.