भजन आणि कीर्तन उत्सवाने
साजरी होते श्रीकृष्ण जन्माष्टमी
पंढरपूरचा श्री विठ्ठल म्हणजे गोकुळीचा श्रीकृष्ण. त्यामुळे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात गावोगावी वारकरी नामसप्ताह, भजन, ज्ञानेश्वरी पारायण आदी उपक्रमांच्या माध्यमातून गोकुळाष्टमी उत्सव श्रावण वद्य प्रतिपदा ते वद्य अष्टमी असा साजरा करतात. विठ्ठल मंदिरात मात्र हा उत्सव थोड्या वेगळ्या प्रकारे साजरा होतो.
– अभय जगताप
श्रावण वद्य तृतीया ते श्रावण अमावस्या असा हा उत्सव विठ्ठल मंदिरात साजरा होतो. पूर्वी हा उत्सव बाजीराव पडसाळीमध्ये होत असे. आता हा उत्सव लाकडी सभामंडपात होतो. उत्सवानिमित्त येथे मांडव टाकून विद्युत रोषणाई केली जाते. मंडपात आरसे जडावलेल्या लाकडी महिरपीच्या मखरामध्ये ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा इत्यादी ग्रंथ ठेवतात. या ग्रंथांच्या समोरच हा उत्सव होतो. अन्य कोणतेही चित्र अथवा प्रतिमा लावण्याची परंपरा नाही. लाकडाच्या महिरपीतील काही आरसे तुटल्याने आता त्या जागी तात्पुरती वेग वेगळी चित्रे लावली आहेत. उत्सवाच्या प्रारंभी, कृष्ण जन्माच्या दिवशी, भजन समाप्ती आणि काल्याच्या दिवशी मंडपात आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्याबाहेर केळीचे खांब अथवा नारळाच्या झावळ्या लावतात.
साधारणपणे १२ ते १३ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे दोन भाग आहेत.
१. श्रावण वद्य तृतीया ते श्रावण वद्य दशमी भजन उत्सव होतो.
२. श्रावण वद्य दशमी ते अमावस्येदरम्यान कीर्तने होतात.
श्रावण वद्य तृतीया अथवा चतुर्थीस उत्सवास सुरुवात होते. दशमीला आठवा दिवस येईल अशा बेताने नाम सप्ताहाला सुरुवात होते. अखंड वीणा उभा रहातो. या दिवसापासून भजनास सुरुवात होते. पूर्वी रात्री ९ ते ११ चे भजन बडवे आणि पैठणकर मंडळी करत. आता संस्थानतर्फे कार्यक्रम होतो. याशिवाय अन्य भजनी मंडळी मिळून रात्रभर भजन करतात. या उत्सवाचा वीणा बडवे मंडळीत ह. भ. प. विनय बडवे यांच्याकडे होता. मंदिराचा पूर्ण कारभार देवस्थान समितीकडे आल्यावर आता ते त्यांच्या घरी स्वतंत्र उत्सव करतात.
कृष्ण जयंती, कृष्ण जन्माच्या दिवशी रात्री ९ ते १० भजन होते. कृष्ण जयंती हा भक्तांसाठी जसा उपवासाचा दिवस असतो, त्याचप्रमाणे देवालाही उपवासाचा नैवेद्य होतो. या दिवशी दुपारी देवाचा पोशाख बदलत नाहीत. त्या ऐवजी रात्री ११ वाजता जन्माच्या आधी पोशाख बदलतात. देवाला जरीकाठी रेशमी पितांबर, रेशमी अंगी घालतात. देवाच्या मस्तकी १०० हात लांब कापडाचा मंदिल बांधतात. कृष्णावताराची खूण म्हणून डोक्यावर रेशमी कुंची घालतात. हातात रुप्याची काठी देतात.
इकडे मंडपात रात्री १० ते १२ कृष्ण जन्माचे वारकरी सांप्रदायिक कीर्तन होते. कीर्तनामध्ये देवाच्या अवताराचे प्रयोजन सांगणारा अभंग निरुपणाला घेतात. विठोबा-रखुमाई भजनानंतर जन्मकथा, वसुदेव देवकी विवाह, लग्नात आकाशवाणी होणे, नव वधूवरांना बंदीशाळेत टाकणे, बळीराम जन्म आणि नंतर कृष्णजन्म असा कथाभाग संत नामदेवरायांच्या अभंगाच्या आधारे सांगतात. जन्मसमयी देवावर गुलाल आणि फुले उधळतात. याच वेळी कीर्तनातसुध्दा ग्रंथांच्या दिशेने पुष्पवृष्टी होते. त्यानंतर पुन्हा दर्शन सुरू होते. सर्व भाविकांचे दर्शन होईपर्यंत दर्शन चालू ठेवतात. या रात्री देवाची शेजारती करत नाहीत.