![](https://dnyanbatukaram.com/wp-content/uploads/2022/05/श्री-श्री-रविशंकर.jpg)
अध्यात्मातून सामाजिक कार्याचा
डोंगर उभारणारे श्री गुरुदेव
अध्यात्मिक गुरू, मानवतावादी नेता, शांतीदूत म्हणून ओळख असलेले श्री श्री रवीशंकर यांचा आज ६६ वा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या अध्यात्मिक, मानवतावादी, सामाजिक कार्याचा हा आढावा…
जागतिक महामारीनंतर साऱ्या जगाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. आपल्या प्रियजनांचा मृत्यू, आर्थिक संकट, सामाजिक सुसंवादाचा अभाव आणि बिघडलेले मानसिक आरोग्य ही आव्हाने कोरोना कालावधीनंतर प्रामुख्याने समोर आली. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या वैज्ञानिक अहवालानुसार, कोविड-१९ महामारीच्या पहिल्या वर्षी मानसिक अस्वस्थता आणि नैराश्याचे प्रमाण संपूर्ण जगात तब्बल २५ टक्क्यांनी वाढले होते. या नव्या प्रकारच्या आव्हानांशी आपण झुंजत असतानाच यातून सुटका आणि सांत्वन करण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, त्याची सहसंस्था ‘आयएएचव्ही’चे प्रणेते आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर देश आणि धर्माच्या सीमा पार करून अविरत कार्य करीत आहेत. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे महाराष्ट्रात तणावमुक्ती आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी शिबिरे, व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, ग्रामीण विकास कार्यक्रमासारखे शिक्षण आणि सेवा उपक्रम, नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रकल्प, युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबीर, कौशल्य प्रशिक्षण, नैसर्गिक शेती असे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
कोविड काळातील मदत
२०२० मध्ये जेव्हा कोविडची पहिली लाट आली तेव्हा गुरुदेवा लगेच सक्रिय झाले. ‘आयएएचव्ही’द्वारे मार्गदर्शन करीत वसई, विरार, नालासोपारा, गोवंडी आणि धारावी भागातील जवळपास १५ लाख स्थलांतरित कामगारांना मोफत भोजन पुरविले. उपासमारीमुळे दिल्लीत जसा स्थलांतरितांचा लोंढा निघाला, तसे इथे घडू नये म्हणून मुंबई, पुणे भागातील स्थलांतरित कुटुंबातील २ लाख ८० हजार लोकांना १० दिवस पुरेल इतक्या धान्याच्या ७५ हजार किट्सचे वाटप करण्यात आले. राज्यातील नागपूर, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, शिरपूर भागात २० हजारांहून अधिक धान्याच्या किट्सचे वितरण करण्यात आले. ‘आयएएचव्ही’च्या स्वयंसेवकांनी जनमानसात सजगता निर्माण करीत समुपदेशनाचे काम केले आणि स्थलांतर करू पाहणाऱ्या कुटुंबांची यशस्वीरित्या मने वळवत त्यांना तिथेच थांबायला लावले. आयएएचव्ही संस्थेने शासनाने आखून दिलेल्या कोविड काळात पाळायच्या नियमावलीच्या मोहिमेला चालना दिली. ठाणे महानगरपालिकेला ९ हजार कापडी मास्क दिले. तसेच पुणे महानगरपालिकेला ३०० इन्फ्रारेड थर्मामिटर्स, दोन हजार एन ९५ मास्क, दोन हजार पीपीई किट्स आणि कोविड चाचणी बूथ देणगी रुपाने दिले.
नद्यांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छता मोहीम
गेल्या ३०० वर्षांपासून मृतप्राय असलेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न गुरुदेवांनी सुरू केले आहेत. महाराष्ट्रात सध्या २९ नद्यांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. या प्रकल्पाद्वारे गाळ उपसून २ हजार ३९८ कोटी लिटर्स पाणी राज्यभरात साठवले गेले आहे. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण घटले आहे. २०२१मध्ये ‘आयएएचव्ही’द्वारे १९ जिल्ह्यांत १३ हजारांहून अधिक शौचालये बांधण्यास आणि ५० हून अधिक गावांना हागणदारीमुक्त करण्यास मदत करण्यात आली. गुरुदेवांनी सेंद्रिय शेतीच्या मोहिमेची सुरुवात करून दिली आहे. २००६ मध्ये विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचे कार्य केल्याबद्दल ‘आयएएचव्ही’ संस्था कौतुकास पात्र ठरली. गेल्या पाच वर्षात ६१ हजार ४००हून अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. नैसर्गिक शेतीच्या तंत्रामुळे हेक्टरी उत्पादन तर वाढलेच, सोबत जमिनीचा पोतही सुधारला. नैसर्गिक शेतीच्या तंत्रासोबत ‘आयएएचव्ही’च्या स्वयंसेवकांनी आणि शिक्षकांनी त्यांना तणावमुक्त होण्यासाठी स्वास्थ्य आणि श्वास शिबिरे घेतली.
शिक्षणासाठी पुढाकार
महाराष्ट्रात ‘आयएएचव्ही’ ही संस्था ‘गिफ्ट अ स्माईल’ प्रकल्पाद्वारे १० विनामूल्य शाळा चालवित आहे. यात २ हजार ७३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्रकल्पाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे, ही संस्था मुलांच्या शिक्षणाचा खर्च तर उचलतेच, सोबत त्यांना विनामूल्य गणवेश, येण्याजाण्याची सुविधा, ताजे, गरम भोजन पुरवते. मुले भोजन घरीसुद्धा घेऊन जाऊ शकतात. असाच एक ‘शाळा दत्तक योजना’ प्रकल्प केप जेमिनी आणि बँक ऑफ न्यूयॉर्क च्या सामाजिक निधीतून राबवला गेला आहे. २०१४ मध्ये सुरु झालेल्या या प्रकल्पाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ठाणे, नवी मुंबई, शिरूर आणि पिंपरी-चिंचवड येथील ३० हून अधिक नगर पालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक घेण्यात आल्या.
महिला सक्षमीकरण
‘आयएएचव्ही’ ही संस्था महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, फलटण, सांगली आणि रत्नागिरी भागात केवळ तीनचार महिन्यांत ‘स्त्री सौख्य’ प्रकल्पाअंतर्गत दोन हजारांहून अधिक महिलांना याचा लाभ झाला आहे. स्त्रियांना मासिक पाळी आणि स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी २०१० मध्ये ‘स्त्री सौख्य’ प्रकल्पाचा आरंभ झाला, ज्यात समाजातील महिलांना हाताने बनवलेले नॅपकिन्स वाटप करण्यात येत असतात. २५ हजारांहून अधिक महिलांना आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता आणि गावातील साफसफाईशी निगडित समस्या कशा सोडवायच्या, याबद्दल जागरूक करण्यात आले.
आपत्ती निवारण
२०२१ मध्ये आलेल्या महापुरात २४५ लोकांना जीव गमवावा लागला आणि राज्यातील एक लाखाहून अधिक कुटुंबे विस्थापित झाली. कोल्हापूर आणि सांगली येथील महापुराच्या वेळी ‘आयएएचव्ही’च्या स्वयंसेवकांनी ४२ गावातील ३२ हजारांहून अधिक लोकांना मदतीचा हात दिला. त्यांनी २८ हजार ५०० लिटर पिण्याचे पाणी, ५४ हजार किलो धान्य, २१ हजार अन्नाची पाकिटे, ६ हजार २०० रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किट्स, ३ हजार ४०० सॅनिटरी नॅपकिन्स, ११ हजार कपडे, १२ हजार अंथरूणे, २ हजार १०० हून अधिक मेडिकल किट्स आणि ३ हजार ५०० हून अधिक स्वच्छता किट्सचे वितरण केले. तणावमुक्त आणि रोगमुक्त समाजाचा संकल्प घेतलेल्या श्री श्री रविशंकर यांच्या ध्येयाने प्रेरित होऊन ‘आयएएचव्ही’चे स्वयंसेवक पूर्णपणे समर्पित भावाने समाजाची सेवा करीत आहेत. गुरुदेवांच्या या कार्यास ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे वंदन आणि उदंड आयुष्यासाठी प्रार्थना!