तळघरात सापडल्या तीन दगडी मूर्ती;

पादुकाही आढळल्या, अद्याप काम सुरू

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असताना पुरातन विभागाच्या कर्मचाऱ्यांना विठ्ठल मंदिरात शुक्रवारी (दि. ३१) तळघर आढळून आले. या तळघरात तीन दगडी मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत. अद्यापही पुरातत्त्व खात्यातर्फे याठिकाणी काम सुरूच आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी भुयार सापडल्या याबाबतची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

शुक्रवारी (दि. ३१) मंदिराच्या सोळखांबी परिसरात पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी हनुमान दरवाजाजवळ काम करत होते. त्यावेळी एक दगड खचला आणि त्याखाली पोकळी असल्याचे आढळले. दगड काढल्यानंतर त्या ठिकाणी एक मोठे तळघर असल्याचे दिसले. मंदिर समितीतील अधिकारी आणि पुरातत्त्व विभागाचे वास्तु विशारद तेजस्विनी आफळे यांनी पाहणी केल्यानंतर ते तळघर पाच ते दहा फूट असल्याचे दिसून आले.

तळघरात जाण्यासाठी पायऱ्या आढळल्या. सध्या तळघरात अंधार असून तिथे काही मूर्ती वगैरे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञ आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर पंढरपुरात पोहोचल्यानंतर तळघराची पाहणी करण्यात आली. तळघरातील माती उकरली असता तिथे तीन दगडी मूर्ती, पादुका आणि काही नाणी सापडल्याचे समजते. अद्यापही या तळघरातून माती उपसणे सुरू आहे.

परकीय आक्रमणापासून वाचविण्यासाठी श्री विठ्ठलाची मूर्ती वारंवार सुरक्षित ठिकाणी हलविली गेली होती. हे भुयारही याच कारणास्तव बनविले गेले असावे, अशी चर्चा सध्या पंढरपूरकरांमध्ये सुरू आहे. मार्च महिन्यापासून सुरू असलेले मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम आता पूर्णत्वास येत आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात बसविण्यात आलेले ग्रेनाईट, भिंतींना वगैरे मढविलेली चांदी पुरातत्त्व खात्याच्या सूचनेनुसार काढण्यात आली. त्यामुळे जवळपास ७०० वर्षांपूर्वीचे मंदिराचे रूप आता पुन्हा दिसू लागले आहे. या कामामुळे गेले दोन महिने श्रीविठ्ठलाचे सुरू असलेले पदस्पर्श दर्शन २ जून रोजी सुरू करण्यात येणार आहे.

संरक्षणासाठी हलविली होती मूर्ती
सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वी विठ्ठल मूर्ती आक्रमकांच्या तडाख्यात सापडू नये, म्हणून संत प्रल्हाद महाराज बडवे आणि देगावचे पाटील सूर्याजीराव घाडगे यांनी प्रयत्न केले. मंदिरांची मोडतोड करत आलेल्या अफजलखान्याच्या स्वारीच्या वेळी विठ्ठलाची मूर्ती वाचविण्यासाठी १६६५ साली आणि २ ऑक्टोबर १६९५ ते १३ ऑक्टोबर १६९९ दरम्यान औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळी विठ्ठल मंदिरातून मूर्ती हलविण्यात आली.

पंढरपूरजवळील देगाव येथील सूर्याजीराव घाडगे पाटील यांच्या शेतातील विहीरीत ही मूर्ती लपविण्यात आली. पाणी उपसले तर मूर्ती दिसेल, म्हणून घाडगे पाटील यांनी विहिरीतील पाणी शेतीला न देता मूर्ती जतन केली. सुमारे सहा वर्षे देवाचे नित्योपचार सुरू ठेवले. ही मूर्ती काही दिवस गवताच्या गंजीत लपवून ठेवण्यात आली. तसेच सूर्याजी घाडगे यांनी आपल्या वाड्याच्या तळघरातही काही महिने विठ्ठल मूर्ती लपवली.

संकट टळल्यावर विठ्ठल मूर्ती पुन्हा पंढरपूरच्या मंदिरात आणली गेली. या घटनेच्या स्मरणार्थ अजूनही श्रावण शुद्ध पंचमीला देगाव येथे वारकरी संप्रदाय, बडवे समाज आणि पाटील कुटुंबाकडून मूर्ती संवर्धन दिन पाळण्यात येतो. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होतात. पंढरपूरनजिकच्या चिंचोली, गुळसरे आदी गावांमध्येही पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती हलविल्याचे दाखले मिळतात.

मूर्तीविषयक वादविवाद
मधल्या काळात सध्याची मूर्ती ही मूळ मूर्ती नाही. मूळची मूर्ती अन्यत्र हलविली गेली आहे, असे दावे करण्यात आले होते. पौराणिक ग्रंथांमध्ये सांगितलेली मूर्तीच्या अंगावरील लक्षणे ही माढा येथील श्रीविठ्ठलाच्या मूर्तीवर आढळतात. त्यामुळे आक्रमकांपासून पंढरपुरातून माढ्याला हलविलेली विठ्ठलाची मूर्ती पुन्हा आणली गेली नाही, अशी शक्यता ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांनी व्यक्त केली होती. ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या आपल्या ग्रंथातून त्यांनी आपले विठ्ठलमूर्तीबाबतचे संशोधन मांडले आहे.

तथापि पंढरपुरातील सध्याची मूर्ती ही विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे, असे सांगत महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ढेरे यांचा दावा खोडला. तर इतिहास संशोधक ग. ह. खरे आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक गो. ब. देगलूरकर यांनीही सध्याची मूर्तीच मूळ मूर्ती असल्याचा निर्वाळा दिला आहे. आता मंदिरात भुयार सापडल्यानंतर पंढरपुरात पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *