देशात एकमेव असलेले

बार्शीतील भगवंत मंदिर

देशात भगवंत मंदिर नावाने एकमेव असलेल्या बार्शी येथील मंदिरात आज भगवान श्री विष्णूंचा प्रकटदिन उत्साहात साजरा होत आहे. सूर्योदयाच्या वेळी फुले टाकून हा प्रकटोत्सव साजरा झाला. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता भगवंत मंदिरापासून भगवंताच्या उत्सवमूर्तीची फुलांनी आकर्षकरित्या सजवलेल्या उत्सव रथातून शोभा यात्रा काढण्यात आली. श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त वैशाख शुद्ध षष्ठीपासून सुरू झालेल्या सप्ताहाची आज वैशाख शुद्ध द्वादशीला सांगता होत आहे. देवस्थान ट्रस्ट आणि बार्शी नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने सात दिवस येथील भगवंत मैदानावर भगवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, संगीत रजनी आदींचा समावेश आहे.

पुंडलिकाप्रमाणे अंबरीषासाठी देव बार्शीला आला
भक्त पुंडलिकासाठी देव जसा वैकुंठाहून पंढरीला आला, तसा भक्त अंबरीषासाठीही बार्शीला आला, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे श्री क्षेत्र पंढरपूर येथे एकादशी करून पांडुरंगाचे दर्शन घेऊन बार्शीला द्वादशीच्या दिवशी श्री भगवंत दर्शन पूजनानंतर उपवास सोडावयाचा असा वारकऱ्यांचा प्रघात आहे. त्याला ‘साधन द्वादशीचे व्रत’ही म्हणतात. म्हणजे दशमीला एकभुक्त राहून, एकादशीला निर्जल उपवास करुन द्वादशीला सूर्योदयाच्या आत तीर्थप्राशन करुन व्रताचे पारणे करायाचे, असे हे व्रत आहे. भक्तश्रेष्ठ राजा अंबरीषाच्या रक्षणासाठी साक्षात्‌ श्री विष्णुंनी लक्ष्मीसह ‘भगवंत’ या नावाने येथे अवतार घेतला, अशी पौराणिक कथा आहे. या राजाने हे साधन द्वादशीचे व्रत केले होते, असे सांगतात. द्वादशीला प्राकृत भाषेत ‘बारस’ असे नाव आहे. श्री विठ्ठलाचे दर्शन घेताना वारकरी ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठळ’ असा उद्घोष करतात. तर भगवंत नगरीत भक्त ‘अंबरीष वरद श्री भगवान’असा उद्घोष करतात. ‘द्वादशीचे गावी झाला उपदेश’ असा नामदेवांच्या अभंगात उल्लेख आहे. नामदेवरायांचे गुरू विसोबा खेचर यांची या मंदिराच्या शेजारीच समाधी आहे. त्यामुळे त्यांनी नामदेवांना उपदेश केलेले ठिकाण हेच, आहे असेही म्हणतात.

अंबरीष राजाची पौराणिक कथा
या क्षेत्राशी संबंधित अंबरीश राजाची पौराणिक कथा थोडक्यात अशी आहे –
अयोध्येचा राजा अंबरीष याने आपल्या दुराचारी पुतण्याचा वध केला. पण स्वगोत्रनाशाचे पातक लागल्याने तो खिन्न होऊन तीर्थयात्रेला निघाला. नारदमुनींनी त्याला एकादशी आणि साधन द्वादशीच्या व्रताचा महिमा सांगितला. हे व्रत केल्यास विष्णू संतुष्ट होऊन ते तुझे पातक नष्ट करतील, असे सांगितले. त्याप्रमाणे पंकक्षेत्र अर्थात सध्याच्या बार्शी नगरीत पुष्पावती नदीकाठी अंबरीष राजा साधन द्वादशीचे व्रत करू लागला. त्यांची सत्त्वपरीक्षा पाहण्यासाठी महाकोपी दुर्वास मोठ्या शिष्य परिवारासह बार्शीला आले. कार्तिक शुध्द एकादशी झाल्यानंतर अंबरीषाचे द्वादशी सोडण्याचे व्रत होते त्यावेळी दुर्वास ऋषी नदीवरुन स्नान कररून भोजनासाठी येणार असताना मुद्दामच राजाचा व्रतभंग व्हावा म्हणून उशीराने तेथे गेले. राजाने खूप वाट पाहन नाईलाजाने फक्त तीर्थ प्राशन करुन द्रादशी सोडली. व्रतभंग होऊ दिला नाही.

दुर्वासांना हे कळताच त्यांनी आपल्या जटेतून एक राक्षसी निर्माण करुन राजावर सोडली. त्यामुळे भगवंताचे सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागले. ते चक्र आवरुन धरणे देवादिकांनाही अशक्य झाले. अखेरीस राजा अंबरीषाची करुणा भाकल्यावर त्याच्या आज्ञेने ते शांत झाले. बार्शी येथील श्री उत्तरेश्वर मंदिरात असलेल्या चक्रतीर्थात सुदर्शन चक्र शांत झाले. अशी अख्यायिका आहे. त्यानंतर आपल्या मुलास गादीवर बसवून राजाने वानप्रस्थाश्रम स्वीकारुन ईश्वरोपासनेत जीवन व्यतीत केले. अंबरीषाला वर देणाऱ्या त्या भगवंताचे बार्शीतील मंदिर असे पुराण प्रसिध्द आहे. ज्या ठिकाणी चक्र शांत झाले त्याच ठिकाणी श्री भगवंताच्या आदेशानुसार दुर्वासांनी राजा अंबरीषाला छळल्याबद्दल प्रायश्चित म्हणून तपश्चर्या केली. येथे दुर्वासांच्या तपश्चर्येचे एक दगडी सिंहासन, पादुका, सुदर्शन चक्र गुप्त होण्याची जागा दाखविली जाते.

सध्याचे मंदिर १३ शतकातील
सध्याचे श्री भगवंत मंदिर १३ व्या शतकापासून अस्तित्वात आहे. १२४५ मध्ये मूळ मंदिर बांधले गेले. पुढील लाकडी मंडप १५० वर्षांनी तयार झाला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराप्रमाणेच भगवंत मंदिराला १६ खांब आहेत. त्यात एक गरुड खांब असून त्याला भाविक आलिंगन देतात. अंबरीष विजय नामक ग्रंथातील ओव्यांमध्ये बार्शीतील १२ पवित्र तीर्थांची नावे येतात. त्यामुळे १२ पवित्र तीर्थांचे गांव ‘बाराशिव’ यावरुन बार्शी असे नाव मिळाले असावे, असेही म्हणतात. १७६० मध्ये नानासाहेब पेशव्यांनी मंदिराच्या खर्चासाठी सनद दिलेली आढळते. आहिल्यादेवी होळकर यांनीही मंदिरासाठी देणगी दिली होती. श्री भगवंताचे मुख्य मंदिर हेमाडपंथी धारणेचे असून ध्वंजाकित शिखरावर दशावताराची शिल्पे कोरलेली आढळून येतात.

ज्याने केली नाही काशी
गाभाऱ्यात शाळीग्रामाची शंख चक्र-गदा-पद्मासह विराजमान झालेली, पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे मस्तकावर शिवलिंग धारण केलेली, विशाल छातीवर भृगू ऋषीचें पाऊल मिरवणारी, उजव्या पायाच्या अंगठ्यामधून सतत भागिरथी स्त्रवणारी मूर्ती आहे. गाभाऱ्यातील भिंतीवर महादेवाची पिंड, गणपती, अश्वमेधचा घोडा, सर्पकृतीतील सुदर्शन चक्र, शेषावरील विष्णु, चंद्र, सुर्य या शिल्पाकृती विशेष करुन कोरलेल्या आढळून येतात. बाहेरील दगडी खांबावर ही पुराणातील प्रसंग, शिल्परुपे कोरलेली आहेत.
कवीराय राम जोशी यांनी भगवंताचा महिमा सांगणारे कवन रचले आहे. श्री अंबरीष विजय हा ग्रंथ प्रसिध्द आहे. याशिवाय अनेक स्थानिक कवींनी या भगवंत देवाचे महात्म्य सांगणारी कवने, स्तोत्रे रचली आहेत. त्यापैकी ‘कशास काशी, गया, अयोध्या असता श्रीहरी आमुचे घरी’ असा बार्शीकरांचा भक्तीभाव व्यक्त करणारीही काव्ये आहेत. श्री भगवंताचे परमभक्त जोगा परमानंद यांची समाधी मंदिरात उत्तरेकडील ओवरीत आहे. त्यांची पुण्यतिथी प्रतिवर्षी साजरी होते. श्री संत तकाराम महाराजांनीही या मंदिराला भेट दिल्याचे पुरावे मिळतात. ‘ज्याने केली नाही काशी, त्याने यावे बारशी, आले भगवंत वैकुंठ सोडुनी भक्तासाठी’
असे एका काव्यात म्हटले आहे. त्यानुसार स्थानिक भाविक आणि वारकऱ्यांसाठी बार्शी हीच काशी आहे. अशा या भक्तांसाठी वैकुंठ सोडून बार्शीला आलेल्या भगवंताच्या चरणी प्रकट उत्सवानिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *