श्रीगुरू आंबेकर-आजरेकर फडाची
व्याप्ती वाढविणारे वै. चवरे महाराज
वारकरी संप्रदायातील एक विभूती म्हणजे, श्रीगुरू परम पूज्य हरी भक्त परायण वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज चवरे! ( श्रीगुरु आंबेकर उर्फ आजरेकर फड) महाराजांची आज म्हणजे फाल्गुन शुद्ध अष्टमीला पुण्यतिथी.
पंधराव्या वर्षीच जबाबदारी
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील जिवाची वाडी हे पंढरीनाथ महाराजांचे गाव. आजरेकरांच्या फडातील पाचव्या पिढीचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
श्रीगुरु हनुमंत बाबा चवरे, ह. भ. प. नामदेव अण्णा चवरे, वैकुंठवासी रंगनाथ दादा चवरे यांच्यानंतर १५ व्या वर्षीच पंढरीनाथ महाराजांवर पारमार्थिक जबाबदारी आली.
१९१५मध्ये हा आंबेकर दिंडीप्रमुख संप्रदायात कौतुकाचा विषय होता. आजरेकरांनी त्यांना प्रथम माळ घातली. राम कृष्ण हरि मंत्र, मृदंग गायन, गाथा पाठांतर यांचा मार्ग शिकवला. पंढरीनाथ महाराजांनी श्री संत तुकाराम महाराजांचा गाथा, फडावरील नित्य भजनावली, हरिपाठासह हजार बाराशे अभंगांचे पाठांतर केले. अभंगांच्या चालींची नक्कल न करता स्वतःची शैली निर्माण केली. ते पखवाजही अतिशय उत्कृष्ट वाजवीत. त्याचबरोबर ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व प्राप्त करून प्रवचनकार कीर्तनकार अशी घडण होत गेली.
फडाची व्याप्ती वाढविली
कुटुंबाचा बीड, बार्शी, सोलापूर, धाराशिव, उस्मानाबाद लातूर परिसरात असलेला संपर्क त्यांनी पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण परिसरातही वाढवला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, मावळ, हवेली, इंदापूर, बारामती, नाशिक, मुंबई, कल्याण, ठाणे इत्यादी भागात अखंड ६० वर्षे फिरून समुदाय वाढवला. लोक महाराजांना आवडीने बापू म्हणत. बापूंनी आजरेकर आंबेकरांसह कार्तिक वद्य चतुर्दशीची देहू येथील कीर्तनाची परंपरा सांभाळली. देहू येथे दिंडीस उतरण्याची व्यवस्था पंढरीनाथ बापूंनी केली. आळंदी येथे जागा घेतली. नाशिकचे पांडुरंग कचेश्वर आंधळे पाटील यांनी बापूंचे चरित्र लेखन केले आहे.
भगवानबाबांकडून गौरव
२२ फेब्रुवारी १९५६ रोजी श्रीयुत पांडुरंग कचेश्वर आंधळे पाटील यांना एका साधू महात्म्याने चवरे महाराजांच्या स्वाधीन केले. चवरे महाराज पाटील यांना सोबत घेऊन नाथषष्ठीला पैठणला आले. त्यांना सोबत घेऊन पूजनीय भगवान बाबा आणि वामन भाऊंच्या राहुटीवर गेले. तिथे वामन भाऊंनी चवरे महाराजांना कीर्तन करण्याचा आग्रह केला. दुसऱ्या दिवशी कीर्तन करतो असे सांगून त्यांनी त्या दिवशी पखवाज वादन केले. स्वतः वामन भाऊ पट्टीचे पखवाज वादक होते. त्यांच्या कीर्तनातील चार पखवाज वादक आणि चवरे महाराज पाचवे, असा भव्य कार्यक्रम झाला. षष्ठीला दुपारी भगवान बाबांच्या फडावर चवरे महाराजांना फेटा उपरण्याचा आहेर स्वतः भगवानबाबांनी चढवला. एकदा कर्जत-खोपोलीजवळच्या तळवली गावी पंढरीनाथ बापूंनी, मृदंग वादक आणि टाळकऱ्यांशिवाय एकट्याने सर्व पार पाडून ७ दिवस कीर्तन केले.
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी
महाराजांनी शके १८२१, २१ मार्च १९७५, फाल्गुन शुद्ध सप्तमीच्या दिवशी सर्व नातलगांना पंढरपूर येथे बोलावून घेतले. लहान मुलगा ह. भ. प. तुकाराम महाराजांचे लग्न होऊन पंधरा दिवसच झाले होते. पुन्हा कशासाठी बोलावले कळेना. संध्याकाळी त्यांनी अखेरच्या पाच अभंगांऐवजी माऊलींचा ‘कानी घालुनिया बोटे’ आणि तुकाराम महाराजांचा ‘आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी’ अभंग म्हटले. पखवाज ज्येष्ठ पुत्र वासुदेव महाराजांना वाजवण्यास सांगितला. सर्व कुटुंबास ज्ञानेश्वरीसमोर हरिपाठ म्हणावयास सांगितला, रात्री सर्व कुटुंब आणि मठातील नेहमीची माणसे यांना सोबत घेऊन जेवण केले. दुसऱ्या दिवशी फाल्गुन शुद्ध अष्टमीला सकाळची नित्य कामे आटोपली. सायंकाळी सहा वाजता सर्वांना ज्ञानेश्वरीजवळ जमा केले. स्वतः ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. प्रवचनाकरिता भगवद्गीतेतील आठव्या अध्यायातील १० वा श्लोक वाचला. ज्ञानेश्वरीतील ओवी ९८ आणि ९९ वाचली. त्यावर पाऊण तास अस्खलित प्रवचन केले. संत ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ सुरु केला.
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान। समाधी संजीवन हरिपाठ॥ असे पहाडी आवाजात म्हणत असतानाच त्यांचा आवाज हळूहळू शांत झाला. अवतार कार्य समाप्त झाले.
त्यांची परंपरा जोपासण्याचे काम ह. भ. प. वासुदेवदादा महाराज चवरेगुरुजी यांनी सांभाळली आहे. त्यांच्यासोबत भागवत महाराज चवरे भाऊ यांनी ही वैभवशाली परंपरा महाराष्ट्राबाहेरही पोहचवण्याचे कार्य करत आहेत. ह. भ. प. कृष्णा महाराज चवरे हेसुद्धा फडाच्या सेवेसाठी तत्पर झाले आहेत. पंढरीनाथ महाराजांच्या स्मरणाप्रित्यर्थ दरवर्षी एका निष्ठावंत वारकऱ्याला प. पू. पंढरीनाथ महाराज चवरे आंबेकर-आजरेकर वारकरी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पुण्यतिथीच्या निमित्ताने वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज यांना ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार अभिवादन!
(लेखनासाठी संदर्भ – श्री. रविंद्र वैजनाथ मुंडे, वडवणी, जिल्हा बीड)