आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याचे
देहूकरांकडून मुख्यमंत्री शिंदे यांना निमंत्रण
देहू : जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या यंदाच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांची आज (दि. ११) मुंबईत भेट घेऊन देहूकरांनी त्याबाबतचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारले असून, या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे.
श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३३९व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान देहूत २८ जून रोजी होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन केली. त्यादरम्यान पावसाळी अधिवेशन सुरू असले तरीही दोन तासांसाठी का होईना, मी अवश्य येईन, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी संस्थानच्या विश्वस्तांना दिले.
संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, चोपदार नामदेव गिराम, खासदार श्रीरंग बारणे, वारकरी संप्रदायाचे अण्णा बोडके, आमदार भरत गोगावले आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि गाथा देऊन मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. तीर्थक्षेत्र देहू येथील मुख्य मंदिरामध्ये २८ जून रोजी तुकोबारायांच्या आषाढी वारी पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे.