राज्यभरातून गाड्या सोडण्याचे

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

मुंबई : पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा राज्यभरातून ५ हजार विशेष एसटी गाड्या सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. १५) सह्याद्री गेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत दिले. २५ ते ५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. तसेच वाखरी येथे २७ जून रोजी होणाऱ्या माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठीही २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने केलेल्या जादा बसेसच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत सोमवारी (दि. १५ मे) घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य शेतकरी आणि कष्टकरी जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. या काळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सहा विभागांतून गाड्या सुटणार
आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी महाराज नगर , नागपूर, अमरावती या सहा विभागांमधून गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात्रेसाठी सुमारे ५ हजार गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीतर्फे करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर विभागातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १०००, तर अमरावती येथून ७०० असे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

तात्पुर्ती बस स्थानके चार
एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुर्ती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

लातूर विभागातून १०२ गाड्या
लातूर विभागातून १०२ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. वारकऱ्यांच्या मागणीनुसार माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठीही विशेष बस सोडण्याचे नियोजन लातूर विभागाचे आहे. लातूर विभागाच्या लातूर, निलंगा, उदगीर, औसा आणि अहमदपूर या पाच आगारातून पंढरपूर यात्रेसाठी बसेस सोडल्या जाणार आहेत. १०२ बसेसचा एक लाख ८५ हजार ५४० किलोमीटरचा प्रवास होणार आहे. त्यातून महामंडळाला ८९ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. बार्शी-पंढरपूर, तुळजापूर-सोलापूर, निलंगा-सोलापूर -पंढरपूर, उदगीर-लातूर-सोलापूर-पंढरपूर या मार्गावरून वारकऱ्यांसाठी पंढरपूर यात्रा बसेस धावणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *