कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने
आळंदीत लाखो भाविकांची गर्दी
आळंदी : श्रीज्ञानदेवाचरणी।
मस्तक असो दिवसरजनी।।
केला जगासी उपकार।
तारियेले नारीनर।।
पातकी दुर्जन हीन याती।
चार अक्षरें तयां मुक्ती।।
संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगात केलेला हा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा गौरव. याप्रमाणे सर्वसामान्यांचा उद्धार करणाऱ्या माऊलींच्या चरणी माथा टेकण्यासाठी आज (दि. २० नोव्हेंबर) उत्पत्ती एकादशीच्या दिवशी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. आजच्या महापूजेचा मान दर्शनबारीत उभ्या असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील आरपीएफ जवान गोरक्ष बाळासाहेब चौधरी आणि आयटी कर्मचारी सविता गोरक्षनाथ चौधरी या दाम्पत्याला मिळाला आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२६ वा समाधी सोहळा आळंदीत सुरू आहे. त्यातील आजचा कार्तिकी अर्थात उत्पत्ती एकादशीचा महत्त्वाचा दिवस आहे. रात्री १२ ते पहाटे २ यावेळेत ११ ब्रम्हवृदांच्या वेदघोषात माऊलींची महापूजा (पवमान अभिषेक व दुधारती) करण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी दर्शनबारीत सर्वात पुढे असलेल्या आरपीएफ जवान गोरक्ष बाळासाहेब चौधरी आणि आयटी कर्मचारी सविता गोरक्षनाथ चौधरी या दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला.
यावेळी सीआरपीएफ जवान गोरक्षनाथ म्हणाले, ‘मी ‘सीआरपीएफ’मध्ये छत्तीसगड येथे कार्यरत असून सुट्टीनिमित्त गावी आलो होतो. आमचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी आलो होतो. एकादशीच्या दिवशी आम्हाला महापूजेचा आणि पहिले दर्शन घेण्याचा मान मिळाला हे आमचे भाग्य आहे. माझे वडील वारकरी आहेत. आई-वडिलांच्या पुण्याईने आम्हाला ही संधी मिळाली. सर्वांना सुखात ठेव, असे मागणे आम्ही माऊलींकडे मागितले.’
दरम्यान, एकादशीच्या निमित्ताने आळंदीत तीन लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. इंद्रायणी नदी घाट, परिसरातील मठ, मंदिरे, विविध धर्मशाळा या ठिकाणी हरिनाम गजर सुरू असून ‘माऊली, माऊली’च्या गजराने अलंकापुरी दुमदुमून गेली आहे.
माऊलींच्या मंदिरात दुपारी १२ ते १२.३० महानैवेद्य, १ वाजता श्रींची नगरप्रदक्षिणा, रात्री ८.३० वाजता धुपारती, रात्री १२ ते २ मोझे यांच्या वतीने जागर आदी कार्यक्रम आहेत.
दर्शनबारी मंदिराबाहेर पुलाच्या पलिकडे गेली असून दर्शनासाठी सुमारे सात तास लागत आहेत. भाविकांसाठी आळंदी नगरपरिषदेने २४ तास आरोग्यसेवा, पाणी, वीज आदी सुविधा दिल्या आहेत. इंद्रायणीकाठी महिला आणि पुरुष भाविकांची स्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण १४४ ठिकाणी बाथरूमची सुविधा देण्यात आली आहे. शहरात भाविकांसाठी एकूण ६७८ स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
कार्तिकी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात ८ सहायक पोलीस आयुक्त, ५० पोलीस निरीक्षक, १९३ उपनिरीक्षक, १२५० अंमलदार, २५० वाहतूक अंमलदार, ६५० होमगार्ड यांचा समावेश आहे. तसेच एसआरपीएफच्या ३ कंपन्या, एनडीआरएफच्या २ तुकड्या, बीडीडीएसची २ पथके दाखल झाली आहेत.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात २३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. लाऊडस्पीकरच्या माध्यमातून भाविकांना सूचना दिल्या जात आहेत. पोलीस पथके यात्रेत पेट्रोलिंग करत आहेत. भाविकांना काही समस्या आल्यास नजिकचे पोलीस मदत केंद्र किंवा ११२ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.