सुमारे चारशे वर्षांची
पर्यावरणपूरक परंपरा
सिंदखेडराजा :
शेंदूर लाल चढायो
अच्छा गजमुख को
गोंदील लाल बिरजे
सूत गौरी हर को…
या प्रचलित आरतीचे रचयीता गोसावी नंदन स्वामी यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा ४०० वर्षांपासून अखंडितपणे येथील श्री गोसावी नंदन गणपती संस्थानात सुरू आहे.
काळ्या मातीची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती येथे दरवर्षी स्थानिक मूर्तिकार तयार करतात.१० दिवस उत्सव आणि ११व्या दिवशी विसर्जन असे या उत्सवाचे स्वरूप आहे.
आख्यायिका : गोसावी नंदन यांचे मूळ नाव वासुदेव. ते मूळचे बीड येथील. त्यांच्या घरात श्री गणेशभक्तीची परंपरा होती. पुढे त्यांनी गणपतीची उपासना म्हणून ज्ञान मोदक हा ग्रंथ लिहिला. तो आजही वाचला जातो. वासुदेव यांनी पुणे येथील मोरया गोसावी (चिंचवड संस्थान) यांचे शिष्यत्व पत्करले. श्री गणेशाची आराधना हेच आयुष्य असलेल्या वासुदेव यांचे गोसावी नंदन हे नाव रूढ झाले.
पर्यावरण पूरक मूर्ती
काळी माती, गावत, जवस, ताग आणि नैसर्गिक रंगांपासून येथे दरवर्षी गणेशाची मयुरारुढ मूर्ती तयार केली जाते. स्थानिक मूर्तिकार परंपरेने ही मूर्ती तयार करतात. ही मूर्ती तयार करण्याची देखील एक परंपरा आहे. गोकुळ अष्टमीपूर्वी राहेरी येथून पूर्णा नदीची पवित्र माती मंदिरात आणली जाते. कुंभार बांधवांकडून माती शास्त्रशुद्ध पद्धतीने रांधून घेतली जाते. गोकुळ अष्टमी या पावन मुहूर्तावर गोळा (माती) पूजन करून मूर्ती तयार करण्याला सुरुवात केली जाते.
मूर्तिकार
पूर्वी संस्थांचे अध्यक्ष दिवंगत शरदराव मुळे, निंबाळकर सर, त्रिंबक गुरु पाठक हे मूर्ती तयार करायचे. आता ही परंपरा नव्या पिढीतील कलाकार गजानन सोनुने, शाम मुळे, गजानन मेहेत्रे, अनिकेत खरात आणि १० वर्षांचा समर्थ सोनुने हे या मूर्ती कार्यात अग्रेसर आहेत.
फोटो आणि माहिती सौजन्य : गोसावी नंदन गणपती संस्थान, सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा