
वारकरी आणि दत्त संप्रदायाचा
समन्वय करणारे नाना महाराज
भाविक ज्यांना संत श्री एकनाथ महाराजांचा अवतार मानतात, ते श्री दत्तात्रय भक्त नाना महाराज तराणेकर यांची आज पुण्यतिथी. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये प्रामुख्याने कार्य केलेल्या नाना महाराजांचा जन्म मध्यप्रदेशातील उज्जैनजवळील तराणा या गावी १३ ऑगस्ट १८९६ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शंकरशास्त्री, तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. शंकर शास्त्री यांना वासुदेवानंद सरस्वती यांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. त्यामुळे भक्ती मार्गाची परंपरा नाना महाराजांच्या घराण्यात पिढीजातच होती.
बालवयातच दत्तभक्ती
बालवयातच नानांना दत्तसाधनेची ओढ वाटू लागली. घराजवळच श्री दत्तप्रभूंचे मंदिर होते. नाना महाराजांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी श्री गुरुचरित्राची कठोर पारायण साधना करून श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींकडून गुरूमंत्राची दीक्षा मिळवली. घरच्या वेदशाळेत वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वेदाभ्यास केल्यानंतर मौजीबंधन आणि गायत्री उपासनेनंतर नानांचा पुढील वेदाभ्यास इंदोर येथे नरहरशास्त्री यांच्याकडे झाला. प्रखर बुद्धीच्या जोरावर वेदविद्येत ते पारंगत झाले. त्यानंतर त्यांनी दत्तभक्तीचा प्रसार सुरू केला.
त्यानिमित्ताने अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. नर्मदा परिक्रमा, श्री दत्तात्रेयाचे ठिकाण असलेला प्रसिद्ध गिरनार पर्वत, बद्रिकेदार, काशी, मथुरा, गाणगापूर, शेगाव इत्यादी स्थळांच्या त्यांनी तीर्थायात्रा केल्या. नाना महाराजांच्या पूर्वजांना इंदोरच्या होळकर संस्थानाकडून घर, शेतजमीन आणि धर्माधिकारी पद मिळाले होते. पूर्वजांपासून त्यांच्या येथे असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती.
तीर्थस्थळांवर भाविकांसाठी सुविधा
धर्मविचार सांगतानाच नाना महाराजांनी तीर्थस्थळांच्या ठिकाणी भाविकांसाठी सोयीसुविधा उभारल्या. त्यांनी आपले आवडते स्थान श्री क्षेत्र गाणगापूर येथे संगमाच्या समोरच १९८४ मध्ये मोठी धर्मशाळा बांधली. त्या काळात भक्तांना संगमावर पारायण आणि इतर साधना करण्यासाठी शांत असे ठिकाण नव्हते. हे पाहून परमपूज्य नाना महाराजांनी भक्तांसाठी ‘साधना भवन’ ही वास्तू निर्माण केली. नानांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतील विविध ठिकाणी ३२ मोठे यज्ञ केले. यज्ञांमध्ये काही ठिकाणी पशूंना बळी दिला जात असे. ही प्रथा महाराजांनी बंद केली. ते संगीतातही पारंगत होते. अनेक नामवंत गायक त्यांचे मार्गदर्शन घेत. पंडीत कुमार गंधर्व, प्रभाकर कारेकर, सी. आर. व्यास, अजित कडकडे, आशाताई खाडिलकर अशी दिग्गज मंडळी नानांपुढे आपली कला सादर करीत असत.
आर्थिक दुर्बळांना मदत
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, अशा अनेक मुलांच्या मुंजी त्यांनी स्वत: लावल्या. त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती लिखित करुणात्रिपदी या भक्तीप्रद प्रार्थनेचा सर्व हिंदुस्थानभर प्रसार केला. सामूहिक त्रिपदी प्रार्थनेचे ते जनक समजले जातात. नाना महाराजांनी मुंबईत दत्त महाराज कविश्वर यांजकडून भागवत सप्ताह करवून घेतला. त्यांचे इतरही लहानमोठे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम त्यांनी घडवून आणले.
त्रिपदी परिवाराची स्थापना
नामस्मरणाचे महत्त्व आपल्या शिष्यांना समजावून देणे, जीवनात अध्यात्मिक प्रगती करण्यासाठी सतत मदतीचा हात देणे आणि अडचणीच्या वेळी योग्य मार्ग दाखविणे, यामुळे नानांचा शिष्यपरिवार विस्तारला आणि या साऱ्या शिष्यांना एकत्रित आणण्यासाठी नानांनी त्रिपदी परिवाराची स्थापना केली. आज देशात त्रिपदी परिवाराच्या १५० शाखा कार्यरत आहेत. त्यामध्ये निरनिराळे समाजोपयोगी ३५ प्रकल्पही चालू आहेत. मुंबई त्रिपदी परिवारात एका भक्ताने विलेपार्ले येथे नाना महाराज स्मृती सभागृह उभे राहिले आहे. या ठिकाणी वर्षाचे चारही उत्सव साजरे होतात.
वारकरी आणि दत्त संप्रदायाचा संगम
नाना महाराजांच्या इंदूर येथील आश्रमात गुरूपौर्णिमानिमित्त आयोजित कार्यक्रमात वारकरी आणि दत्त संप्रदायाचा संगम पाहायला मिळतो. साधारणतः २५ तास चालणार्या या कार्यक्रमात काकड आरती, सामूहिक उपासना, वेद अभिषेक, प्रतिमा पूजन, पादुका पुजन, करूणा त्रिपदी आणि भागवत पठण, अभंग, भारूडे, भजन, कीर्तन होते. अशा या जनतेला सन्मार्ग दाखविणाऱ्या महात्म्याने वयाच्या ९७ व्या वर्षी चैत्र शुद्ध दशमी, १६ एप्रिल १९९३ रोजी नागपूर येथे देह ठेवला. पुण्यतिथी निमित्ताने त्यांना ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!