
पंढरीच्या विठुरायाला वाचविणारे
संत श्री प्रल्हाद महाराज बडवे
पंढरपूरचं श्री विठ्ठलाचं मंदिर हे नेहमीच आक्रमकांच्या निशाण्यावर राहिलेलं आहे. १६५९ मध्ये महाराष्ट्रावर आलेल्या अफजलखानाच्या संकटापासून संत प्रल्हाद महाराज बडवे यांनी श्री विठ्ठलाची मूर्ती वाचविली. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये त्यांचे स्थान अढळ आहे. बडवे महाराजांची आज तिथीनुसार पुण्यतिथी आहे.
पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीपासून रावळाला प्रदक्षिणा करताना दक्षिण अंगाला निघाले की अगदी थोडं पुढे गेल्यावर चढ लागतो. या चढाचे शेवटीला आता पडझड झालेले, पण पूर्वीच्या दोन मजली अस्तित्वाच्या खाणाखुणा दर्शविणारी केवळ दगडी सुबक जोते दिसणारी इमारत दिसते. ती म्हणजेच संत प्रल्हाद महाराज बडवे यांची निवासाची जागा होय. श्रावण शुद्ध ५ शके १५४२ म्हणजे नागपंचमीच्या दिवशी प्रल्हाद महाराज यांचा जन्म झाला. पुढे ९८ वर्षांचे आयुष्य त्यांनी येथेच विठुरायाच्या चरणी अर्पण केले. पूर्वी विठ्ठल मंदिर आणि घर यात रस्ता नव्हताच. या घरातून एकदम मंदिरात जाता येत असे.
अफजलखानाच्या स्वारीपासून संरक्षण
१६५९मध्ये अदिलशाहीचा सेनापती अफजलखान विजापूराहून निघाला. अणदूर, तुळजापूर, पंढरपूर, फलटणमार्गे स्वराज्यावर चालून आला. वाईकडे जाताना त्याने अनेक देव आणि देवळं पाडली सपाटा लावला. अणदूर, तुळजापूर फुटले. अष्टभुजेची मूर्ती भंग झाली. हे दानव पंढरपुरावर येणार ही भीती होती. ती खरीच ठरली. आता विठूरायाचे कसे होणार? अशा चिंतेत जनता होती. ही चिंता निवारली प्रल्हाद महाराजांनी. त्यांनी देवमूर्ती अलगद कुणालाही न कळता मंदिरातून आपल्या घरात आणून ठेवली. तिथेच त्याची पूजा सुरू केली. खान पंढरीत आला. त्याने नदीकाठावर नासधूस केली. देव न मिळाल्याने तो चिडला आणि नुकसान करत त्याने पंढरपूर सोडले. हे संकट संपल्यावर देव पुन्हा मंदिरात आणला तो संत प्रल्हाद महाराज यांनी.
देव ठेवल्याचे स्मरण म्हणून रिक्त झालेल्या आपल्या घरातील कोनाड्यात महाराजांनी ५ चौरंग मांडून त्यावर भगवंताचे स्वरूप असणारे भागवत ठेवले. त्यापुढे भगवद् पादुका ठेवून पूजा मांडली. या घटनेच्या अनुलक्ष्याने महाराजांचे नातू अनंत रामाजींनी आपल्या एका अभंगात लिहिले की,
रक्षिल तोचि हरि। दृढ विश्वास धरी।।
राय परिक्षित अभिनव रूपे। रक्षियला उदरी।।
धृव प्रल्हाद गजेंद्र। बिभिषण यांचा सहकारी।।
पंढरियेतही प्रल्हादाचे। राहे स्वस्थ घरी।।
पौत्र अनंत तयाचा। त्याला कोण अपाय करी।।
त्या पडत्या काळात देव जिथे राहिले ते स्थान म्हणजे हे प्रल्हाद मंदिर होय. साधारण २५ बाय २५ फुटांचे दगडी जोते त्यावर तीन मजली सुंदर बांधकामाची इमारत, असे याचे स्वरूप. या जोत्याखाली मोठे तळघर. त्यात जाण्यासाठी दोन बाजूंना रस्ता. तळमजल्यावर उत्तराभिमुख प्रवेशद्वारातून आत जाता मध्यावर पिठासन त्यावर महाराजांच्या पादुका. तळघरात एका भिंतीत भव्य कमानदार कोनाडा दिसतो तो देव ठेवल्याचा आहे. कित्येक दिवस देवाचे वास्तव्यस्थान. तेवढेच मंगल. तेवढेच पावन. तेवढेच परमपवित्र.
वारकऱ्यांसाठी पूजनीय ठिकाण
त्यामुळेच पूर्वी काकड्याला देवाला उठवायला मंडळी आधी इथे यायची मग मंदिरात जायचे. तसेत माउलींच्या समाधी सोहळ्याचे आमंत्रण घेऊन येणारी संत हैबतबाबा आरफळकरांची दिंडी आळंदीहून चालत आल्यावर आधी येथेच येते. आरती करते, मगच विठोबाच्या देवळात जाते. तसेच कार्तिकीला समाधी सोहळ्याला जाणाऱ्या संत नामदेवराय, देहूकर, आप्पासाहेब वासकर, शिरवळकर, आरफळकर आदी परंपरागत फडकऱ्यांच्या दिंड्या येथे येऊन अभंग गातात आणि येथून देव आपल्या बरोबर घेवून पुढे प्रस्थान ठेवतात. प्रल्हाद महाराज बडवे यांच्या वारसांकडून गंगूकाकांना गाथाप्रसाद मिळाली ते हे स्थान. आजही अनेक वारकरी त्यामुळे इथे स्थान दर्शनाला येतात.
समश्लोकी ग्रंथ रचना स्थान
शिवराज्याभिषेकानंतर गागाभट्ट पंढरीत आले. त्यांनी महाराजांकडे वास्तव्य केले. त्यांना माउलींचा वारकरी तत्वज्ञान ग्रंथ अमृतानुभव प्रल्हाद महाराजांनी संस्कृतात समजावून देण्यासाठी समश्लोकी ग्रंथ रचला ते हे स्थान. इतके या स्थळाचे महात्म्य मोठे आहे. १९६०मध्ये महाराजांच्या या ठिकाळी बडवे मंडळींनी तीन मजली वास्तु महाराजांचे स्मृतिस्थान म्हणून उभारले. जिथे देव ठेवले त्या जागचा कोनाडा रक्षून तळघराचे बांधकाम केले. ज्याचे उद्घाटन मामा दांडेकर आणि प्रल्हाद महाराजांचे भक्त पुज्य आप्पासाहेब वासकरांनी केले. अनेक वर्षे तिथे संस्कृत अध्ययन केंद्र चालले. गीता अभ्यास केंद्रही चालले. यज्ञयागादी कार्ये, सण समारंभ झाले. बडवे महाराजांच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल भक्त संत प्रल्हाद महाराज बडवे प्रतिष्ठान सुरू करण्यात आले आहे. त्यामार्फत विविध सामाजिक कामे करण्यात येतात. संत प्रल्हाद महाराज बडवे यांच्या स्मृतींना
।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे त्रिवार अभिवादन..🙏
(हा लेख आशुतोष अनिलराव बडवे, पंढरपूर यांच्याकडून साभार)
लवकरच आपल्या सेवेत येत आहे – www.dnyanbatukaram.com
रामकृष्णहरि🙏🏻🙏🏻माऊली