माऊली सासवडमध्ये असतानाच
सोपानकाका निघतात पंढरपूरला

आज जेष्ठ वद्य द्वादशी. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी आहे. याच दिवशी संत सोपानकाकांचा पालखी सोहळा त्यांच्या समाधी मंदिरातून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवतो आहे. त्यानिमित्त या पालखी सोहळ्याची सांगोपांग माहिती सांगणारा हा लेख…

 – अभय जगताप

ज्येष्ठ महिना लागला, की वारकऱ्यांना वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. माहेरवाशीण ज्या असोशीने माहेरी जाण्याची वाट पाहते त्याप्रमाणेच वारकरी वारीची वाट पाहत असतात.
चला रे वैष्णवहो जाऊ पंढरीसी।
प्रेमामृत खुणा मागू त्या विठ्ठलासी।।
अशा शब्दांमध्ये संत सोपान काकांनी वैष्णवांसह पंढरीला जाण्याचा मानस एका अभंगांमध्ये व्यक्त केला आहे. या संत सोपानकाकांच्या वचनाप्रमाणे सासवड येथून संत सोपानकाकांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाते. आषाढी पायी वारीची परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीपासून चालू आहे. पुढे संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी या पायीवारीला पालखी सोहळ्याची जोड दिली.

वै. धोंडोपंतदादा अत्रे यांचे योगदान

देहू, आळंदी पाठोपाठ इतर संत क्षेत्रावरून पालखी सोहळ्यांना सुरुवात झाली. तेव्हा सासवड येथून संत सोपानकाकांचा पालखी सोहळा काढण्याचा विचार साधारण १०० वर्षांपूर्वी देवस्थानचे तत्कालीन वहिवाटदार वै. ज्ञानेश्वर माऊली गोसावी यांनी केला. तेव्हा पंढरपूरचे फडकरी वै. धोंडोपंतदादा अत्रे यांनी या पालखी सोहळ्याची जबाबदारी उचलली. सोहळा सुरू झाला तेव्हा धोंडोपंतदादांकडे पालखी सोहळ्याची सर्व जबाबदारी आणि खर्च असे. तेच नारळ प्रसाद वाटत आणि गोसावी घराण्यातील पाच व्यक्तींची व्यवस्था करत. कालांतराने काही मतभेद झाल्यावर धोंडोपंत दादांनी यातून अंग काढून घेतले आणि सोहळ्याची जबाबदारी गोसावी मंडळींकडे आली. तेव्हापासून गोसावी मंडळींना मालक म्हणण्याचा प्रघात पडला.

सासवडमध्ये आलेल्या माऊलींना नैवद्य

ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा पूर्वी शिरवळ मार्गे पंढरपूरला जाई. वद्य एकादशीच्या दिवशी संत क्षेत्री मुक्काम असावा, या विचाराने पुढे माउलींचा सोहळा सासवड मार्गे पंढरपूरला जाऊ लागला. आळंदीवरून निघालेला माऊलींचा पालखी सोहळा जेष्ठ वद्य एकादशीला सासवडला दोन दिवसांसाठी विसावतो. अर्थात गर्दीमुळे माऊलींची पालखी सोपान काका मंदिरात मुक्कामी न येता गावाबाहेर स्वतंत्र ठिकाणी उतरते. दुसऱ्या दिवशी द्वादशीला संत सोपान काका संस्थानतर्फे ज्ञानेश्वर माऊलींना नैवेद्य पाठवला जातो. माऊलींचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी असतानाच जेष्ठ वद्य द्वादशीला संत सोपानकाकांच्या पालखीचे प्रस्थान होते. प्रस्थान म्हणजे प्रवासाला निघणे.

संत निवृत्तीनाथांचा समाधी दिवस

सासवड येथील पालखी प्रस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रस्थानाच्या वेळी मुख्य मंडपात भजन सुरू असते. ‘जय जय राम कृष्ण हरी’ या सांप्रदायिक भजनाने सोहळ्यास सुरवात होते. त्यानंतर रुपाचा अभंग होतो. जेष्ठ वद्य द्वादशी हा संत निवृत्तीनाथांचा समाधी दिवस. त्यामुळे रुपाचा अभंग झाल्यावर ‘धन्य धन्य निवृत्ती देवा’ हा अभंग होतो. त्यानंतर
माझ्या वडिलांची मीराशी गा देवा। तुझी चरणसेवा पांडुरंगा।। हा प्रस्थानाचा मुख्य अभंग होतो. यानंतर ।।ज्ञानबातुकाराम।। असा जयघोष सुरू होतो. याच वेळी इकडे गोसावींच्या घरात पादुकांना औक्षण केले जाते. त्यानंतर गोसावी मंडळी सोपानदेवांच्या पादुका केंजळे घरातील व्यक्तीकडे सुपूर्द करतात. केंजळे या पादुका समाधीपाशी नेऊन नंतर पालखीत आणून ठेवतात. यानंतर पूर्वी सर्व दिंडीकरी संतपर अथवा पंढरी वर्णनपर एकेक अभंग म्हणत असत.

पूर्वी पालखीसोबत दिंड्यांची संख्या १५ पर्यंत मर्यादित होती, तोपर्यंत ही प्रथा चालू होती. पुढे दिंड्यांची संख्या वाढल्यामुळे वेळेअभावी सर्वांना अभंग म्हणणे शक्य होत नसल्याने ही प्रथा बंद झाली आहे. यानंतर सर्व दिंडीप्रमुख आणि इतर मानकऱ्यांना नारळ प्रसाद दिला जातो. त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिरा बाहेर येते. नाक्यावर ग्रामस्थांतर्फे पालखीला निरोप दिला जातो. सर्वात पुढे नगाऱ्याची गाडी, त्यानंतर मोकळा आणि जरीपटक्याचा अश्व, त्यामागे रथापुढील दिंड्या, त्यानंतर रथ, रथामध्ये पालखी आणि मागे रथामागील दिंड्या असा सोहळ्याचा क्रम ठरलेला आहे. मोकळ्या अश्वावर कोणी बसत नाही. त्यावर सोपानकाका बसतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जरीपटक्याच्या अश्वावर एकच स्वार झेंडा घेऊन बसलेला असतो.

अशी असते दिंडीची रचना

दिंडी म्हणजे वारकऱ्यांचे एक युनिट. एका शाळेमध्ये ज्याप्रमाणे अनेक वर्ग असतात, त्याप्रमाणे एका पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या असतात. वारकरी सोहळ्यामध्ये चालतात म्हणजे यापैकी एखाद्या दिंडीमध्ये चालतात. प्रत्येक दिंडीमध्ये एक विणेकरी, एक पखवाज वादक आणि अनेक टाळकरी असतात. दिंडीच्या सुरुवातीला पताकाधारी वारकरी चालतात. पताका म्हणजे वारकरी झेंडा. हा झेंडा कावेने (गेरूने) रंगवलेला असतो. सोबत तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला आणि डोक्यावर पाण्याचा हंडा घेतलेल्या महिला वारकरी असतात. पूर्वी पाण्याचे टॅंकर, पाण्याच्या बाटल्या इत्यादी सुविधा नव्हती, तेव्हा हंडेवाल्या महिला वाटेत पाणी मिळाले, की हंडा भरून घेत. वाटचाली मध्ये दिंडीतील वारकऱ्यांना तहान लागल्यावर त्यांना पाणी देत. त्यांच्यामागे टाळकरी आणि शेवटी वीणेकरी असतो. विणेकऱ्याच्या मागे मोकळे चालणारे वारकरी असतात.

पालखी मार्गात झालेले बदल

प्रस्थानाच्या दिवशीच सोपानकाकांचा पालखी सोहळा ग्रामस्थांचा निरोप घेऊन मुक्कामासाठी पुढील गावी मार्गस्थ होतो. गावाबाहेरील नदी ओलांडून पुढे आल्यावर पुरंदरे यांच्या विसावा विठ्ठल मंदिरासमोर अभंग आणि आरती होते. पालखी मार्गामध्ये वेळोवेळी काही कारणांनी बदल करण्यात आले आहेत. पूर्वी सोपान काकांची पालखी पुरंदरच्या पायथ्याने शिरवळ मार्गे पंढरपूरला जात असे. पानशेत पुराच्या काळात सोपानकाकांच्या पालखी मार्गात बदल करण्यात आला होता. त्यानंतर काही वर्षांपूर्वी माऊलींचा आणि सोपानकाकांचा सोहळा सासवडहून एकाच दिवशी निघाल्याने पुन्हा मार्गात बदल करण्यात आला. सध्या पालखी सोहळा सासवड, पांगारे, मांडकी, निंबुत, सोमेश्वरनगर, कोऱ्हाळे बुद्रुक, बारामती, लासुर्णे, निरवांगी, अकलूज, बोंडले,भंडी -शेगाव, वाखरी या मार्गे पंढरपूरला जातो. सासवड ते पंढरपूर एकूण प्रवास १४ दिवसांचा असून तिथी क्षय अथवा वृध्दीने कधी १३ अथवा १५ दिवस होतात. या वाटचालीमध्ये रोज सकाळी काकडआरती होते. या काकड आरतीचे वैशिष्ट्य म्हणजे, भल्या पहाटे उठल्या उठल्या पारोशाने ही आरती करण्यात येते. त्यानंतर स्नान वगैरे करून नंतर पादुकांची महापूजा होते. यावेळी मुगाच्या खिचडीचा नैवेद्य होतो. दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी महानैवेद्य होतो.

दररोज दोन कीर्तने

वाटचालीमध्ये नैवेद्याची व्यवस्था पूर्वी देवस्थानकडे होती. तेव्हा गोसावी घराण्यातील स्त्रिया सोवळ्यामध्ये नैवेद्य बनवत. आता दुपारच्या विसाव्याच्या
ठिकाणी असलेल्या स्थानिक भाविकांकडे ही सेवा देण्यात आली आहे. सायंकाळी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर समाज आरती होते. सकाळची आरती मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत होते, तर समाज आरतीच्या वेळी सर्व दिंड्या उपस्थित असतात. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर समाज आरती होते. या ठिकाणी सर्व दिंड्या गोलाकार अथवा अर्धवर्तुळाकार पद्धतीने उभ्या राहतात. मध्यभागी पालखी ठेवली जाते. त्यानंतर चोपदार दंड उंचावतात. त्यावेळी भजन थांबते आणि सर्वत्र शांतता पसरते. कोणाचे काही हरवले असेल अथवा कोणाला काही सापडले असेल, तर त्या वस्तूंची यादी चोपदार त्यावेळेस जाहीर करतात. रात्रीचे कीर्तन, दुसऱ्या दिवशी निघण्याची वेळ इत्यादी सूचना दिल्या जातात. त्यानंतर आरतीला सुरुवात होते. हा सोहळा बघण्यासारखा असतो. बहुतेक सर्व पालखी सोहळ्यांमध्ये रात्री पालखी समोर एकदा कीर्तन होते. सोपान काकांच्या पालखी सोहळ्यात मात्र सकाळी पूजेच्या वेळी आणि रात्री अशी रोज दोन कीर्तने होतात. नंतर धुपारती होते. त्यानंतर जागर होतो. जागर म्हणजे रात्रभर चालणारे भजन.

गोल आणि उभी रिंगणे

पालखी सोहळ्यात सोमेश्वरनगर येथे गोल रिंगण, तर वाखरी आणि थोरल्या पादुका या दोन ठिकाणी उभे रिंगण होते. गोल रिंगणामध्ये सर्व दिंड्या पालखी भोवती वर्तुळाकार उभ्या राहतात. मध्ये घोड्यांना पळण्यासाठी मोकळा रस्ता सोडलेला असतो. या मार्गावरून आधी तुळशी वाल्या महिला, विणेकरी धावतात. त्यानंतर मोकळा आणि जरीपटक्याचा असे दोन्ही घोडे रिंगणामध्ये पळत तीन प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यानंतर वारकरी भजनाच्या ठेक्यावर विविध खेळ खेळतात. त्याला पावली असे म्हणतात. उभ्या रिंगणामध्ये दिंड्या आपापल्या जागीच उभ्या असतात. घोडे पुढच्या टोकापासून पालखीपर्यंत आणि तेथून मागच्या टोकापर्यंत पळत जातात आणि पुन्हा त्याच मार्गाने परत येतात. दोन्ही प्रकारच्या रिंगणामध्ये शेवटी थोडे पालखीपाशी येऊन देवाचे दर्शन घेतात. त्यांना प्रसाद म्हणून देवाला घातलेले हार घालतात.

बकऱ्यांचे रिंगण आणि बंधूभेट

याशिवाय मोतीबाग पिंपळी येथे बकऱ्याचे रिंगण होते. या रिंगणामधे परिसरातील शेतकरी आपली मेंढरं घेऊन येतात आणि पालखींभोवती गोल फिरवतात. अशा प्रकारे मार्गावरील लोक आपापल्या परीने सोहळ्यात सहभागी होऊन सेवा करत असतात. रिंगण बघण्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी होते. पालखी येण्याआधीच भाविक रिंगणाच्या मैदानावर येऊन जागा पकडून बसतात. सणसर आणि खंडाळी येथे भारुडांचा कार्यक्रम होतो. संत एकनाथ महाराजांनी अत्यंत मनोरंजक पद्धतीने भारुडामधून अध्यात्मिक उपदेश केला आहे. त्यासाठी विंचू, वेडी, भूत इत्यादी रुपके वापरली आहेत. त्या वर्णनाप्रमाणे सोंग घेऊन ही भारुडे सादर केली जातात.

आषाढ शुद्ध अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत टप्पा येथे सोपानकाकांच्या पालखीची आणि माउलींच्या पालखीची भेट होते. यालाच बंधू भेट असे म्हणतात. या भेटीच्या वेळेस दोन्ही संस्थानांकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो.

पंढरपुरात प्रवेशासाठी पाचवा क्रमांक

एकादशीच्या आदल्या दिवशी आषाढ शुद्ध दशमीला सोहळा पंढरपुरात प्रवेश करतो. वाखरी ते पंढरपूर ही शेवटची वाटचाल असते. यावेळेस शेवटच्या सात पालख्यांचा पंढरपुरात प्रवेश करण्याचा क्रम ठरलेला आहे. त्यात सोपानकाकांचा सोहळा पाचव्या क्रमांकावर असतो. सर्वात पुढे सातव्या क्रमांकावर पंढरपुरातून स्वागताला आलेले संत नामदेवराय, त्यानंतर संत मुक्ताबाई, त्यानंतर संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज आणि सर्वात शेवटी ज्ञानेश्वर माउली अशा क्रमाने पालख्यांचा पंढरपूर प्रवेश होतो. पंढरपूर येथे प्रदक्षिणा मार्गावर तांबड्या मारुतीजवळ संस्थानने पालखी मंडप उभारला आहे. आषाढ शुद्ध दशमी ते पौर्णिमेपर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपुरातील या मठात असतो.

एकादशी हा वारीचा मुख्य दिवस. एकादशीला सकाळी पादुकांची नित्य पूजा झाल्यावर पहाटे साडेपाच वाजता सोपानकाकांची पालखी नगर प्रदक्षिणेस निघते. वाटेमध्ये श्रींचे चंद्रभागा स्नान होते. यावेळेस पादुका पालखीमधून बाहेर काढून केंजळे घरातील व्यक्तीकडे देतात. केंजळे पादुका घेवून वाळवंटात येतात. येथे पादुकांना चंद्रभागा स्नान घालतात. उपस्थित भाविक सुद्धा देवाला स्नान घालतात. त्यानंतर पुन्हा पादुका पालखीमधे ठेवून नगरप्रदक्षिणा पूर्ण केली जाते. नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ‘देह जावो अथवा राहो’ हा अभंग होऊन आरती होते. त्यानंतर मानकऱ्यांना नारळ प्रसाद देतात. द्वादशीला सकाळी पारणे होते. रात्री खिरापत होते.

अमळनेरकर संस्थानतर्फे पूजा

सोपानकाकांची पालखी काही वर्षे अंमळनेरकर महाराजांच्या मठामध्ये उतरत असे. त्यामुळे आजही चतुर्दशीच्या दिवशी पादुका अमळनेरकर महाराजांच्या मठात नेल्या जातात. तेथे अमळनेरकर संस्थानतर्फे श्रींची पूजा होते. पौर्णिमेला सकाळी ६ वाजता पालखी गोपाळपूरला काला करण्यासाठी जाते. तेथे काल्याचे कीर्तन होऊन पालखी पुन्हा मठात परत येते. पौर्णिमेला पादुका विठ्ठल मंदिरात दर्शनास नेण्याची नवीन पद्धत गेल्या काही वर्षांत सुरू झाली आहे. त्यानुसार सोपानकाकांच्या पादुकाही मंदिरात दर्शनासाठी नेतात. त्यानंतर जेवण झाल्यावर दुपारी पालखीचा परतीचा प्रवास सुरू होतो. यावेळी पंढरीहुनी गावी जाता। खंती वाटे पंढरीनाथा।। हा अभंग म्हटला जातो.

परतीचा प्रवास ७ दिवसांचा

सोपानकाकांच्या परतीच्या प्रवासास सात दिवस लागतात. येताना अर्ध्या दिवसांमध्ये प्रवास पूर्ण केला जातो. परतीच्या प्रवासात पहाटे तीन वाजता काकड आरती होऊन पालखी निघते. पादुकांची सकाळची पूजा पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी सकाळी ८-९ च्या सुमारास होते. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ६ पर्यंत प्रवास होतो. आषाढ वद्य षष्ठीला सोपानकाकांचा पालखी सोहळा सासवडला परत येतो. यावेळेस गावाबाहेरील विठ्ठल मंदिरापाशी पालखी आल्यावर पूर्ण केला पूर्ण केला। पूर्ण केला मनोरथ।।
हा निळोबारायांचा अभंग होऊन आरती होते. त्यानंतर पालखी गावामध्ये येते. स्वागतासाठी गावकरी वाटेवर सडा रांगोळी घालतात. वाजंत्री लावून वाजत गाजत पालखी गावामध्ये आणतात. पालखी सोहळा मंदिरापाशी आल्यावर देवावरून दहीभात ओवाळून टाकतात आणि देवाला औक्षण करतात. त्यानंतर पालखी रथामधून बाहेर घेऊन मंदिरामध्ये आणली जाते. सभामंडपात आल्यावर देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो।। हा अभंग म्हणतात. नंतर आरती होते आणि मानकऱ्यांना नारळ प्रसाद दिला जातो.

परतवारीत माऊलींचा मुक्काम

त्यानंतर थोड्याच वेळात पंढरपूरवरून आळंदीला परत निघालेला माउलींचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी पोचतो. पंढरपूरला जाताना माउलींचा सोहळा गर्दी मुळे स्वतंत्र ठिकाणी उतरतो. परतीच्या प्रवासात मात्र माउलींच्या पालखीचा मुक्काम सोपानकाका समाधी मंदिरात असतो. रात्री माऊलींच्या पालखी सोहळ्यातर्फे सोपानकाकांसमोर कीर्तनसेवा होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे सप्तमीला सोपानदेव संस्थानतर्फे माऊलींना, तर माऊली संस्थानतर्फे सोपान काकांना नैवेद्य होतो. त्यानंतर माऊलींची पालखी हडपसरकडे मार्गस्थ होते. माऊलीच्या पालखीला निरोप दिल्यावर खऱ्या अर्थाने सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याची सांगता होते.

विविध सेवांचे मान

या पालखी सोहळ्यात विविध सेवांचे मान ठरलेले आहेत. देवस्थानचे अध्यक्ष ऍड. ह.भ.प. त्रिगुण महाराज गोसावी हे पालखी सोहळा प्रमुख आहेत. प्रस्थानाच्या वेळेस पादुका पालखीत ठेवण्याचा, पंढरपूर येथे श्रींना चंद्रभागा स्नान घालण्याचा मान केंजळे कुटुंबियांकडे आहे. सोमेश्वर येथे श्रींच्या पादुका केंजळे यांच्या घरी नेल्या जातात. तेथे केंजळेंकडून देवाला अभिषेक आणि नैवेद्य होतो. पालखी सोबत रथ, दोन घोडे, नगारा, चोपदार असा लवाजमा असतो. देवाचा घोडा परकाळे यांचा तर जरी पटक्याचा घोडा सोपानकाका सहकारी बँकेचा आहे. रथाला बैल केंजळे यांचे असतात. नगारा राजू काका कुलकर्णी यांचा असतो. रथाला फुलांची सजावट प्रस्थानाच्या दिवशी बाळासाहेब जगताप यांची असून इतर दिवशी संत सोपानकाका सहकारी बॅंकेतर्फे ही सेवा होते. ह. भ. प. सिद्धेश शिंदे आणि ह. भ. प. मनोज रणवरे हे सोहळ्यात चोपदार म्हणून सेवा पार पाडतात. चोपदारांच्या हातामधे चोप-दंड असतो. सोहळा शिस्तीत चालतो आहे ना हे बघण्याची जवाबदारी चोपदारांकडे असते.

वारकऱ्यांची संख्या वाढली

गेल्या १५ वर्षांत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यातील दिंड्यांच्या आणि भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या सोपानकाकांसोबत शंभरहून अधिक दिंड्या चालतात. सासवड येथील संत सोपानकाका सहकारी बँकेचा पाण्याचा टँकर आणि ॲम्बुलन्स असते. वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट वैद्यकीय सुविधा पुरवते. इतरही भाविक आपापल्या परीने सोहळ्यातील वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करत असतात. गेली दोन वर्ष कोरोनामुळे पालखी बसने मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत पंढरपूरला गेली होती. आता दोन वर्षानंतर पायी पालखी सोहळा होणार आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे.

1 thought on “संत सोपानकाका पालखी सोहळ्याची ह. भ. प. अभय जगताप यांनी लिहिलेली सविस्तर माहिती-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *