पंढरीचा पांडुरंग आला

गोरक्षनाथांच्या भेटीला

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हे गाव प्रसिद्ध आहे, ते तेथील नागपंचमीच्या सणासाठी. पंचमीच्या दिवशी या गावात जिवंत नागांची पूजा करण्याची प्रथा आहे. हा सण म्हणजे गावचा मोठा उत्सव असतो. तर, गावचा दुसरा मोठा उत्सव म्हणजे, नागपंचमीचा सण सुरू करणारे श्री गोरक्षनाथ यांची यात्रा. आठ दिवस चालणारी ही यात्रा आजपासून म्हणजे वरूथिनी एकादशीपासून सुरू झाली आहे. आजच्या दिवशी पंढरीचा पांडुरंग गोरक्षनाथांच्या भेटीसाठी येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गावोगावच्या दिंड्या या दिवशी बत्तीस शिराळा गावी येतात. गोरक्षनाथांच्या दरबारात भजन, कीर्तनाचा एकच गजर होतो.

वरुथिनी एकादशीचे पावन पर्व
दरवर्षी चैत्र कृष्ण एकादशीला म्हणजेच वरुथिनी एकादशी हा या यात्रेचा पहिला दिवस असतो. या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून दिंड्यांसह हजारो भाविक यात्रेमध्ये येतात. विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांतील भाविक मोठ्या संख्येने गोरक्षनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येतात. या काळात शहरात हजारोंची गर्दी असते. यंदा कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षांनंतर ही यात्रा भरणार असल्याने घरोघरी आनंदोत्सव सुरू आहे.

१२ वर्षांनी भरते महायात्रा
या यात्रेतील महत्त्वाचा भाग म्हणजे येथे १२ वर्षांतून एकदा महायात्रा भरते. त्यावेळी उत्तरेतून कुंभमेळ्यातील साधू मंडळी इथे गोरक्षनाथांच्या दर्शनाला येतात. याशिवाय प्रत्येक एकादशीला येथे छोटी यात्रा भरते. तिलादेखील शेकडो भाविक आवर्जून येतात. असेही सांगितले जाते की, आषाढी एकादशीला दुपारी १२ वाजेपर्यंत पंढरपुरचा विठ्ठल साक्षात शिराळ्याच्या गोरक्षनाथांच्या मंदिरात असतो.

यात्रा काळात विविध कार्यक्रम
वरुथिनी एकादशीला गोरक्षनाथांना अभिषेक केला जातो. यावेळी संपूर्ण शिराळा नगरी टाळमृदुंगाने दुमदुमून जाते. संपूर्ण नाथमंदिर परिसराला जणू पंढरपूरचा साज चढतो. नाथांच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी शेकडो वारकरी दिंड्या दाखल होतात. त्यांचे स्वागत ग्रामपंचायत आणि गावकरी करतात. सकाळी ११ वाजता पालखी निघते. हिरालाल बाळकृष्ण परदेशी कुटुंबियांना या पालखीचा मान आहे. यात्रा कालावधीत मंदिर परिसरात भजन, कीर्तन, सोंगी भजन, भारूडाचे कार्यक्रम होतात. तालुक्याच्या सर्व गावातील बहुतांश भजनी मंडळीचा यात सहभाग असतो. शिवाय प्रत्येक दिंडी आपआपली राहुटी करून त्या ठिकाणी भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम करतात. यात्रेत कुस्त्यांचा फड रंगतो. यात्रा काळात येथे विविध प्रकारची दुकाने, मनोरंजन आणि अन्य उद्योग-व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. तालुक्यातील नागरिकांसाठी ही यात्रा म्हणजे पर्वणीच असते.

पंढरपूरप्रमाणे गोरक्षनाथ मंदिराचे महत्त्व
हे गोरक्षनाथ महाराजांचे मंदिर पंढरीच्या विठुरायाच्या मंदिराएवढेच पवित्र असल्याची वारकऱ्यांची भावना आहे. देशभ्रमण करणाऱ्या गोरक्षनाथांनी अनेक दिवस बत्तीस शिराळा गावात वास्तव्य केले होते, असे सांगतात. येथील जगप्रसिद्ध नागपंचमीची सुरुवात ही गोरक्षनाथ यांनीच केली, असेही गावकरी सांगतात. मंदिरामागे तोरण आणि मोरण नदीचा संगम आहे. विठ्ठ्ल रखुमाई मंदिर याच मंदिराच्या परिसरात आहे. शिवाय समर्थ रामदास यांनी स्थापन केलेले दक्षिणाभिमुख मारुतीचे मंदिर आहे. पूर्वी या परिसरात आयुर्वेदात महत्त्व असलेल्या गोरक्ष चिंचेचे अनेक भलेमोठे वृक्ष होते.

नाथ आणि वारकरी अनुबंध
मध्ययुगात देशभर प्रभाव असलेल्या नाथ संप्रदायातूनच वारकरी संप्रदाय विकसित झाला. त्याबाबतची गुरुपरंपराच श्री ज्ञानदेवांनी हरिपाठातून सांगितली आहे.
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा।
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला।
गोरक्ष वोळला गहिणीप्रती।।
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार।
ज्ञानदेवा सार चोजविले।।

नवनाथांपैकी श्री गुरू गोरक्षनाथ यांचा मोठा प्रभाव महाराष्ट्रावर आहे. ज्ञानदेवांनी त्यांचे ‘योगाब्जिनीसरोवर’ आणि ‘विषयविध्वंसैकवीर’ असे वर्णन केले आहे. त्या काळातील सर्व धर्म, पंथांवर गोरक्षनाथांच्या विचारांचा प्रभाव पडला. चक्रधर ते संत कबीर, गुरुनानक आदी सर्व महापुरुषांनी गोरक्षनाथांच्या विचारांचे अनुसरण केले. श्री गोरखनाथांनी विपुल ग्रंथलेखन केले. आत्मसाक्षात्कार म्हणजेच आत्मशुद्धी असा क्रांतिकारी विचार त्यांनी मांडला. शिवाय लोकभाषांमध्ये ज्ञानदान आणि लेखन, स्त्री-शूद्र समानता, हिंदू-मुस्लिम ऐक्य आदींचा प्रथम उद्घोष केला तो गोरक्षनाथांनी! म्हणून तर महाराष्ट्रात अजूनही घरोघरी ‘नवनाथांची पोथी’ वाचली जाते. मुलांना नाथांची नावे दिली जातात. गावोगावी उभारलेल्या मंदिरांमध्ये त्यांचा जयघोष होतो, उत्सव साजरा केला जातो. अशा या महापंडीत, महागुरू श्री गोरक्षनाथांना त्यांच्या बत्तीस शिराळ्याच्या यात्रेनिमित्ताने ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचा साष्टांग दंडवत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *