एकादशीला अवघड चढण चढून

माउलींची पालखी सासवड मुक्कामी

सासवड : एकादशीचा उपवास असताना वारीच्या वाटचालीतील अवघड दिवे घाटाची चढण वारकऱ्यांनी माऊलींच्या पालखीसोबत विठ्ठल नामाच्या जयघोषात आज (दि. ३) दुपारनंतर पार केली. सोहळा संध्याकाळी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सासवड नगरीत दाखल झाला.

दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पुणेकरांचा निरोप घेत टाळ मृदंगाच्या तालावर ‘माऊली, माऊली, जयघोष करत पालखी सोहळा दुपारी पुढे सरकत होता. सारे जण विठू नामाच्या भक्तिरसात चिंब होऊन नाचत होते. न्याहारीसाठी पालखी सोहळा वडकी नाक्यावर विसावला होता. न्याहारीनंतर पाच बैलजोडीच्या सहाय्याने माऊलींनी दिवे घाट चढून सायंकाळी साडेसहा वाजता पुरंदर तालुक्यात प्रवेश केला.

झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तर दिवे येथील ग्रामस्थांनी पालखीचे उस्फूर्तपणे स्वागत केले. दिवे फाट्यावर प्रार्थमिक आरोग्य उपकेंद्र दिवे यांच्या वतीने वारकर्‍याची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत होती.

झेंडेवाडी येथील पुरंदर तालुक्यातील पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी पालखी विसावली. दिवसभर रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण होते. न थकता दिंडीतील वारकरी अभंग, भारुडे म्हणत, गात, नाचत घाट चढत होते. वारकर्‍यांमध्ये एक वेगळेच चैतन्य संचरले होते. पालखी सोहळा दरवर्षी एकादशीला पुरंदर तालुक्यात प्रवेश करतो यावेळी हमखास वरुणराजाचे आगमन होत असते, परंतु यावर्षी ढगाळ वातावरण होते.

सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पालखी झेंडेवाडी येथून निघून सासवड येथील पालखी तळावर साडेनऊच्या सुमारास विसावली. पालखीचा मुक्काम दोन दिवस सासवडमध्ये असणार आहे. नगरपरिषदच्या वतीने सोहळ्याची दोन दिवस मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.

परंपरेनुसार चालत आलेल्या संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या भेटीनंतर बुधवारी (दि. ३) दुपारी सासवड येथून संत सोपानदेवांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होईल. यासाठी देवस्थानच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली असून दुपारी सोपानदेव विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *