उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते

होणार एकादशीची महापूजा

सोलापूर : आषाढी-कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग।। या विठुरायाच्या प्रेमभावाला साद देत आषाढी वारीनंतर येणाऱ्या कार्तिकी वारीसाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. यंदाच्या प्रबोधिनी अर्थात कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.

गेल्या काही दिवसांपासूनच पंढरपूर भाविक आणि वारकऱ्यांनी फुलून गेले आहेत. गावोगावच्या दिंड्या विठुनामाचा गजर करत पंढरपुरात दाखल होत आहेत. मठ, धर्मशाळा, हॉटेल्स भाविकांनी गजबजली आहेत. मंदिर परिसर, वाळवंट आणि नदीपलिकडचे ६५ एकर मैदानही वारकऱ्यांच्या भजन, कीर्तन, टाळ-मृदंगाच्या गजराने दुमदुमून गेले आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे विठ्ठल मंदिरात महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची महापूजा होणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या सोबत सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, फलोत्पादन व रोहयोमंत्री संदीपान भुमरे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचीही उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्रभरातून तसेच कर्नाटक आणि अन्य प्रांतांतूनही कार्तिकी यात्रेसाठी भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. एकादशीच्या दिवशी सुमारे ४ लाख भाविक दाखल होतील, असा अंदाज आहे. यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा एसटी बसेस सोडल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेची सुविधा दिली आहे. खासगी वाहनांमधूनही हजारो वारकरी पंढरीत दाखल होत आहेत.

भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. दर्शन रांगेतून विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात पोहोचायला १२ ते १४ तासांचा अवधी लागत आहे. दर्शन रांगेत भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यात्रेकरूंच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. श्री विठ्ठल मंदिर नयनरम्य विद्युत रोषणाईने सजले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *