प्रा. डॉ. विजय बालघरे यांनी ।।ज्ञानबातुकाराम।। वार्षिक अंकाच्या ‘बा तुकोबा’ या विशेषांकाची करून दिलेली ओळख….
“अनेकांना वाटतं वारकरी अकारण टाळ कुटत ‘ज्ञानबातुकाराम’ म्हणत वारीला जातात. त्या सर्वांनी समजून घ्यायला हवं, की ही दोन नावं म्हणजे आपलं जीवन जगण्याचे तत्वज्ञान आहे. सर्व संतांनी सांगितलेली समता बंधुता, न्याय, मानवता या दोन नावांच्या उच्चारणात आहे. ज्याला हे कळलं त्याला मराठी संस्कृती कळाली असं म्हणायला हरकत नाही”
१ जानेवारीला नवीन वर्षाचे औचित्य साधून डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी ।।ज्ञानबातुकाराम।। या वार्षिक अंकाचा ‘बा तुकोबा’ हा विशेषांक भामचंद्र डोंगरावर प्रकाशित केला. आजच्या अनागोंदीच्या काळात चंगळवादाच्या गोंगाटात नवीन वर्षाचे स्वागत अशा पद्धतीने करत, आपल्या मुळांकडे परत जात, मातीशी इमान राखणारी ही अत्यंत स्वागतार्ह अशी कृती आहे.
डॉ. श्रीरंग गायकवाड यांचे वडील ह. भ. प. निवृत्ती महाराज गायकवाड हे गेली ३८ वर्षे नित्यनेमाने दरवर्षी ज्ञानोबा तुकोबांच्या नावाचा आणि विचारांचा भामचंद्र गडावर जागर करत होते. मागील वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे चिरंजीव डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी आपल्या वडिलांची परंपरा खंडित न होऊ देता ‘माझ्या वडिलांची मिरासी’ ही प्रबोधनाची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. यातूनच ‘ज्ञानबातुकाराम’अत्यंत दर्जेदार असा अंक त्यातून निर्माण झाला. ‘ज्ञानबा तुकाराम’ टीममधील सर्वच सदस्य, संपादक मंडळातील सदस्य आणि या अंकातील विविध विषयावरील लेखक यांनी भरभरून लिहिले. असा दर्जेदार अंक आजच्या काळात काढणे ही अत्यंत अवघड बाब आहे.
परंतु डॉ. श्रीरंग गायकवाड आणि युवा संपादक उद्धव धुमाळे तसेच टीम ‘ज्ञानबातुकाराम’ यांनी हे शिवधनुष्य लीलया पेरले. खरंतर विविध क्षेत्रातील मान्यवर या उपक्रमामध्ये सहभागी झाले.
उपक्रमे वदे। तुका वर्माशी ते भेदे।। याची साक्षात प्रचिती यानिमित्ताने आली. पत्रकार, लेखक, संपादक, विचारवंत, स्थानिक गावकरी, स्त्रिया, यांचा यातील सहभाग उल्लेखनीय होता.
केवळ अध्यात्मिक जोखडात न अडकता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा विचार कृतीत उतरवणे आणि तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे खूप महत्त्वाचे कार्य आहे. हे यानिमित्ताने काही अंशी का होईना सुरू झाले असे म्हणता येईल. यानिमित्ताने न्यूज 18 चॅनेलचे संपादक महेश म्हात्रे, न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी मांडलेले विचार उद्बोधक आणि दिशादर्शक होते.
हा अंक ‘पाऊलखुणा’, ‘तत्ववेत्ता’, ‘संस्कृती पुरुष’ अशा तीन भागांत विभागला असून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा विविध दृष्टिकोनातून लेखकांनी विचार केलेला आहे. त्याचबरोबर ‘माझ्या वडिलांची मिरासी’, ‘ज्ञानबा-तुकाराम वारकरी परंपरा’ हे अनुक्रमे डॉ. श्रीरंग गायकवाड आणि सदानंद मोरे यांचे लेख विशेष उल्लेखनीय आहेत.
शिवाय ‘धन्य देहू गाव’, ‘सुवर्ण पर्वत तपोभूमी भंडारा’, ‘भामचंद्र तपोभूमी’, ‘अभ्यासभूमी’, ‘कर्मभूमी लोहगाव’, ‘गाथेचे तारणहार तुकारामांचे १४ टाळकरी’, ‘तुकोबा केवळ पांडुरंग’ हे लेख मातीशी तुकोबांची घट्ट वीण सांगणारे आहेत.
तत्त्ववेत्ता या विभागात ‘तुकोबा आणि जोतिबा संयोग’, ‘संविधान आणि तुकोबा’, ‘ऐसे कैसे झाले भोंदू’, ‘तुकोबा आणि शिवछत्रपती’, ‘भक्ती-शक्ती’, ‘लोकसखा’, तुकोबा आणि थोरो’, ‘तुकोबांचा अर्थ विचार’, ‘डाऊविरोधी आंदोलन’ हे लेख म्हणजे तुकोबांच्या तत्त्वज्ञानाची खोली आणि समकालीन वास्तव यांचा सर्वांगीण वेध घेणारे आहेत.
संस्कृतीपुरुष या सदरामध्ये ‘पाठराख्या- पत्नी, कन्या, शिष्या’, ‘पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराज’, ‘वारकऱ्यांचे तुकोबा’, ‘पर्यावरण विचार’, ‘वृक्षप्रेमी तुकाराम’ ‘फेसबुक दिंडी’, ‘डिजिटल तुकोबा’, ‘नाटक सिनेमातील तुकोबा’, ‘बहुभाषिक मराठी अभंग गायक’, ‘अभंग तुकयाचे’, ‘वैश्विक तुकोबा’, ‘जागर मानवतेचा’ आणि ‘बा तुकोबा’ ही महावीरभाई जोंधळे यांची कविता म्हणजे या अंकाचा कळसाध्याय आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून सुरुवातीला सर्व मंडळी गड चढून वरती ध्यान गुंफेपर्यंत पायी चालत गेली. भावी पिढ्यांना तुकोबांचा साक्षात्कारभूमीचा आणि ते ज्याठिकाणी अभ्यासासाठी, ध्यानधारणेसाठी बसत याची प्रचिती या निमित्ताने झाली. सर्वांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत अध्ययन गुहेमध्ये तुकोबांच्या नावाचा जयघोष करत खऱ्या अर्थाने तुकोबांची अभंग गाथा आजही मार्गदर्शक आहे हे समजून घेतले.
महेश म्हात्रे यांनी या भूमीतून मिळणारी ऊर्जा अनंत काळासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. म्हणून सर्वांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे स्मरण ठेवून त्यांचा विचार पुढे नेत कृतिशीलतेतून त्यांचा वारसा जपणे आवश्यक असल्याचे सांगितले. नंतर डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी वडिलांची मिरासी आणि ते म्हणत असलेला अभंग पहाडी आवाजात सर्वांसमोर सादर केला. न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी तुकारामांचे विचार कृतीत आणण्याची आणि स्थानिक भूमिपुत्रांनी हा समृद्ध वारसा जतन करण्याची आवश्यकता स्पष्ट केली. खरच समृद्ध झालो…
या अंकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संपादक
डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला अगदी थोडक्या आणि नेमक्या शब्दांमध्ये लेखाचे सार उलगडले आहे. तुकोबांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर, लेखांचे मर्म त्यांना सापडले आहे. याशिवाय प्रत्येक लेखातील पूरक बोलकी छायाचित्रे मनाचा ताबा घेतात. प्रत्यक्षात आपणासमोर त्या ठिकाणाची आणि काळाची अनुभूती देतात.
यानिमित्ताने गुरुवर्य डॉ. श्रीरंग गायकवाड यांची धडपड, मेहनत, वडिलांची मिरासी, वारसा जपण्याची वृत्ती त्यासाठी सर्वस्व झोकून देण्याचा धाडशी स्वभाव यांचा प्रत्यय आला. साथीला युवा संपादक उद्धव धुमाळे होतेच. सरांचा पाय फ्रॅक्चर आणि गळ्यात मोडलेला हात. तरीही हा उपक्रम करायचाच आणि काहीही करुन अंक काढायचा यासाठी त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. अशा अवस्थेत ध्यान गुंफेपर्यंत पायी चालले. एक दृष्टीने ही वारीचीच अनुभूती होती.
हा विचार पुढे न्यायला हवा. तुकोबारायांच्या विचारांचे आपण पाईक आहोत याची सातत्याने त्यांना जाणीव आहे. त्यांची ही धडपड माझ्या वडिलांची या भूमीशी असलेली अतूट वीण मला हे करायला लावते असं ते म्हणाले. त्यांनी जोडलेले असंख्य मित्र या कार्यामध्ये तुकोबांच्या टाळकऱ्यांप्रमाणे त्यांच्या मदतीला धावून आले.
“दुःखाचं हलाहल शांत करून चंद्राच्या शीतलतेने ज्यानं महाकवी तुकारामांना विश्व कल्याणाचा साक्षात्कार दिला तो सह्याद्रीचा तपोवृद्ध कातळ म्हणजे, भामचंद्र! तो
बुद्ध-तुकारामांच्या करुणेची साक्ष देत अजूनही उभा आहे.” अशा शब्दांत त्यांनी भामचंद्राची महती वर्णन करणाऱ्या माझ्या लेखाची ओळख करून दिली आहे.
– प्रा. डॉ. विजय बालघरे