संत श्री बेंडोजी महाराज यांचा
६८५ वा संजीवन समाधी सोहळा
माघ शुद्ध सप्तमीसी। रथ सप्तमीचे दिवशी।
सुदिन पाहुन निश्चयेशी। समाधीसी घेतले।।
मग बुद्धपुरी गोसावी। महातेजस्वी अनुभवी।
ठेवणे ठेवोनी पदवी।। स्वरुपात समाधी।।
अवघ्या १६ व्या वर्षी संजीवन समाधी घेणाऱ्या संत श्री बेंडोजी महाराज यांचा ६८५ वा संजीवन समाधी सोहळा उत्सव आज सुरू होत आहे.
उत्सवातील मुख्य पूजा रथसप्तमीला असते. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून हा उत्सव सुरू होत असतो. घुईखेड ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती हे तीर्थक्षेत्र बेंडोजीबाबा संजीवन समाधीमुळे प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे लाखो भाविकांचा मेळा भरतो. उत्सवानिमित्त मोठी रेलचेल असते. धार्मिक कार्यक्रम असतात. पंचक्रोशीसह अन्य जिल्ह्यांतील भाविक येथे आवर्जून येतात.
…म्हणून ‘बेंडोजी महाराज’ अशी ओळख
असं सांगतात, की एका मेंढपाळाला जंगलात आठ वर्षांचा मुलगा सापडला. त्याच्या पाठीवर बेंड (गाठी) असल्यामुळे त्याला बेंडोजी म्हणून ओळखू लागले. इतक्या लहान वयातच बेंडोजी यांना ईश्वराच्या नामस्मरणात १०-१० दिवस अखंड समाधी लागायची. पुढे बुद्धपुरी चैतन्य महाराजांनी बेंडोजीबाबा यांना नाथ संप्रदायाच्या परंपरेत आणले. बेंडोजी महाराजांचा काळ इसवीसन १३०० ते १३५० पर्यंतचा असावा, असे सांगितले जाते. पण, त्याची अधिकृत नोंद नाही. शिवाय, महाराजांचे जन्मस्थानदेखील ज्ञात नाही.
या संजीवन समाधी उत्सवानिमित्त संत बेंडोजी महाराज संस्थांच्या वतीने सात दिवस पहाटे काकडा आरती, रामधून, सामुदायिक प्रार्थना, भागवत, खंजेरी भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होत असतात. या काळात अन्नदानदेखील केले जाते, असे घुईखेड येथील मंदिराचे सेवेकरी ह. भ. प. प्रथमेश महाराज गिरी यांनी सांगितले.
पालखीचा ४८ दिवसांचा प्रवास
पंढरपूर येथे अनेक वर्षांपासून बेंडोजी महाराज यांची पालखी दरवर्षी जाते. घुईखेड ते पैठण आणि तेथून आळंदी, ते पंढरपूर असा ४८ दिवसांचा प्रवास या वारीचा असतो. सध्या या दिंडीचा मान माऊली संतश्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसह विठ्ठल मंदिरात पुढून प्रवेश करणाऱ्या २१ मानकऱ्यांमध्ये १७ व्या क्रमांकाचा आहे. ही परंपरा अंदाजे १८९७ पासून असल्याचे सांगितले जाते. संत बेंडोजी महाराज संस्थानजवळ १३३७ साली तयार केलेला भालदार चोपदाराजवळ असणारा बिल्ला आजही आहे, असे स्थानिक वारकरी सांगतात.
लवकरच आपल्या सेवेत येत आहे – www.dnyanbatukaram.com