शोषणरहित समाज व्यवस्थेची
संकल्पना तुकोबारायांकडून पूर्ण
महाराष्ट्राच्या लोकमानसावर गेली ४०० वर्षे अधिराज्य गाजवणारे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा आज वैकुंठ गमन दिन. श्री संत ज्ञानदेवांनी शोषणरहित समाज व्यवस्था निर्माण करण्याची संकल्पना पूर्ण शक्तीने पुढे नेली. राजा शिव छत्रपती यांना मार्गदर्शन, आशीर्वाद प्रदान करून श्री तुकोबांनी ही संकल्पना पूर्ण केली.
अखंड हिंदुस्तान पुढे श्री तुकोबांचे अनुयायी म्हणजेच वारकऱ्यांनी आपल्या छत्राखाली आणला. यातील ठळक अनुयायी म्हणजे श्री महादजी शिंदे उर्फ पाटीलबुवा. आधुनिक प्रजासत्ताकातील राज्यघटनेवर श्री संत तुकोबांच्या विचारांचा पूर्ण प्रभाव राहिला. याचे मुख्य कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर श्री तुकोबांच्या गाथ्याचा प्रचंड प्रभाव होता. समाजाप्रती अति मार्दवता व अन्यायाविरुद्ध प्रखर विरोध हे श्री तुकोबांच्या जीवनाचे सूत्र राहिले आहे.
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास।
कठिण वज्रास भेदू ऐसें।।
भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून श्री तुकोबांनी समाजाला नवीन प्रेरणा, उर्जा, आत्मशक्ती व चेतना प्रदान केली. ती चेतना आजही त्यांच्या वाङ्ममयातून समाजाला प्राप्त होत आहे. आजही २१ व्या शतकातील विज्ञानवादी युगात जगाला तुकोबांचे तत्त्वज्ञान आपलेसे वाटते. म्हणूनच जगातील विविध भाषांमध्ये त्यांचे विचार अनुवादीत झाले आहेत. युरोपातील कार्ल मार्क्स च्या साम्यवाद व समानतेच्या तत्त्वज्ञानाधीच २०० वर्षे तुकोबांनी त्याची मांडणी केली होती. त्याची भुरळ युरोपियन अभ्यासकांना पडली. म्हणूनच हिंदुस्थानातील पहिले वाङ्ममय इंग्रजी भाषेत अनुवादित झाले, ते म्हणजे श्री तुकोबांची गाथा होय.
महाराष्ट्रातील झोपडीत राहणाऱ्या माता माऊली व आलिशान बंगल्यात राहणारे लोक तुकोबांचे अभंग गातात हेच श्री तुकोबांच्या वाङ्ममयाचे सर्वदर्शी चिरतारुण्य व लोकमानसावरील प्रभाव दर्शवीत आहे. देव मानणाऱ्या व देव न मानणाऱ्या व्यक्तींना श्री तुकोबा आदर्श वाटतात हे त्यांच्या जीवन दर्शनाचे वैशिष्ट्य. श्री संत तुकाराम महाराज हे ‘लोकवैभव व संस्कृतीपुरुष’ म्हणून संबोधले जातात ते यास्तवच. अशा थोर संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपणा सर्वांना श्री तुकोबांच्या सदेह वैकुंठ दिनानिमित्त अनंत शुभेच्छा!काय वाणू आता न पुरे हे वाणी। मस्तक चरणी ठेवीतसे।। या श्री तुकोबांच्या वचनाने पूर्णविराम.
– ह. भ. प. श्री चैतन्य कबीरबुवा, श्री संत कबीर महाराज मठ, श्री क्षेत्र आळंदी देवाची.