आदर्श वारकरी कीर्तनकार

सद्गुरू भोजलिंग महाराज

संत नामदेवरायांनी कीर्तनातून भारतभर संतविचार पोचवला. अलिकडच्या काळात नामदेवरायांचा वसा पुढे नेणारे सद्गुरू भोजलिंग महाराज म्हणजे एक आदर्श वारकरी कीर्तनकार होते. भोजलिंग महाराजांच्या चौथी पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या सांगोला तालुक्यातील घेरडी गावात त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने कीर्तनकार म्हणून महाराजांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा…

– ह. भ. प. नवनाथ तरंगे

काही न मागे कोणासी। तोच आवडे देवासी॥
देव तयासी म्हणावे। त्याचे चरणी लीन व्हावे॥

या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे निरपेक्ष भावाने कीर्तन सेवा करणारे काही मोजकेच कीर्तनकार असतात. त्या मोजक्या कीर्तनकारांपैकी एक असलेले आमचे सद्गुरु भोजलिंग महाराज. आयुष्यभर त्यांनी हजारो कीर्तनं केली ; पण त्यांना कोणताच मोह झाला नाही. एकाही कीर्तनातून त्यांनी बिदागी घेतली नाही. कीर्तनाच्या ठिकाणी जेवणही घेतलं नाही. साधा फुलांचा हारही घेतला नाही. नारळही घेतला नाही. इतक्या निरपेक्ष सेवाभावनेने आपलं अवघं आयुष्य कीर्तनातून वारकरी संप्रदायाची सेवा करण्यासाठी त्यांनी वाहिलं.

आईच्या संस्कारातून जडणघडण
भोजलिंग महाराजांचा जन्म घेरडी गावातला. घेरडी हे गाव सांगोला तालुक्यातलं. हा सगळा दुष्काळी माणदेशाचा भाग. या गावात वारकरी संप्रदाय जवळपास नसल्यातच जमा होता. विठ्ठल या दैवताची उपासनाही फार कोणी करताना दिसत नव्हतं. सहाजिकच त्यामुळे गावात वारकरी कीर्तन हा प्रकार फारसा नव्हता. असं असलं तरी महाराजांच्या घरात मात्र इतर सगळ्या देवांबरोबर पांडुरंगही होताच. त्याचं कारण महाराजांच्या मातोश्री. महाराजांच्या मातोश्रींना पोथ्यापुराणाची खूप आवड. गावातल्या ब्राह्मणांच्या वाड्यात त्या पोथी ऐकायला जायच्या. त्यांनीच पोथी वाचायला यावी म्हणून महाराजांना शाळेत जायचा आग्रह धरला. त्यासाठीच महाराज शाळेला गेले. पण शाळेची त्यांना गोडी लागली नाही. लिहीण्या-वाचण्यापुरतं शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली.

कीर्तनकार बाबाजी भोसलेंची प्रेरणा
महाराजांच्या जीवनात असा एक अनपेक्षित प्रसंग घडला की त्या प्रसंगाने महाराज वारकरी संप्रदायाकडे वळले. तो प्रसंग असा होता की त्यांच्या गावात बाबाजी भोसले नावाचे एक सत्पुरूष कीर्तनासाठी आले होते. ते गाडगेबाबांच्या परंपरेतले. त्यांच्या कीर्तनानं गावातले अनेकजण प्रभावित झाले होते. त्यापैकीच एक होते शांतीनाथ जाधव. ते महाराजांचे खास दोस्त. त्यांनी महाराजांना कीर्तनासाठी यायचा आग्रह धरला. नुसता कीर्तनाचाच नाही तर त्यांना गुरू करण्याचाही आग्रह केला. महाराज संसारात आणि शेतामळ्यात रमलेले. त्यांना ते फारसं पटलं नाही. त्यांनी ते सगळं धुडकावून लावलं. पण त्यामुळे त्यांचा मित्र नाराज झाला. त्यांनी बोलणं बंद केलं. शेवटी नाईलाजाने महाराजांनी त्या मित्राच्या आग्रहाखातर कीर्तनाला जायचं मान्य केलं. त्यानुसार शांतीनाथ जाधव आणि महाराज बाबाजी भोसलेंच्या कीर्तनाला गेले. कीर्तन ऐकून प्रभावित झाले. भक्तीमार्गाकडे वळावं असं त्यांना वाटू लागलं. अधून मधून ते पंढरपूरलाही जाऊ लागले. तिथली कीर्तनं ऐकू लागले. त्यातूनच त्यांना कीर्तनाची आवड निर्माण झाली.

वाचन, श्रवण, पठण, चिंतन
एके दिवशी महाराजांनी कीर्तन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी तुकोबांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि इतर संतांचे साहित्य वाचायला सुरूवात केली. त्यातले अभंग, ओव्या आणि दोहे ते पाठ करायचे. त्यांनी कीर्तनं ऐकण्यासाठी दर महिन्याच्या वारीला पंढरपुरला जाणं चालू केलं. वारीला गेल्यानंतर ते वेगवगळ्या फडावर जायचे. तिथली कीर्तनं ऐकायचे. ही कीर्तनं बहुधा गाडगेबाबांच्या परंपरेतल्या कीर्तनकारांची असायची. गाडगेबाबांची कीर्तनपद्धत ही नामदेवांच्या मूळ वारकरी कीर्तनपद्धतीशी जुळणारी आहे. त्या कीर्तनात मुख्यत्वे तुकारामांच्या अभंगांचा आणि कबीरांच्या दोह्यांचा समावेश असतो. महाराज पंढरपूरला जात तेव्हा ते कैकाडीबाबांची कीर्तनं ऐकायचे. गाडगेबाबांच्या कीर्तनपद्धतीला वारकरी संप्रदायात कैकाडीचालीची कीर्तनं असं म्हणतात. गाडगेबाबांचे सहकारी म्हणून कैकाडीबाबा महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. त्यामुळेच त्या कीर्तनपद्धतीला ‘कैकाडीचालीची’ कीर्तनं म्हटलं जात असावं. महाराजांवर त्या कीर्तनशैलीचा प्रभाव होता. गाडगेबाबा आणि त्यांच्या अनुयायांच्या कीर्तनाचा श्रोता मुख्यत्वे ग्रामीण भागातला असायचा. त्यामुळे त्यांना कळेल अशा सोप्या ग्रामीण ढंगातली कीर्तनं हे या कीर्तनपद्धतीचं वैशिष्ट्य. महाराज याच पद्धतीने सुरूवातीच्या काळात कीर्तनं करू लागले.

कीर्तन साथीदारांचे ‘जुगाड’

कीर्तन करायचं महाराजांनी ठरवलं पण त्यांना साथीदार कोण मिळणार? कारण गावात कोण वारकरी नव्हतं. कुणाला टाळ वाजवता येत नव्हता. पखवाज वाजवता येत नव्हता. कीर्तनासाठी किमान चार-सहा टाळकरी, एखादा पखवाज वाजवणारा आणि विणेकरी अशा काही माणसांची गरज होती. त्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं की आपल्या गावातल्या होलार समाजातली काही माणसं ही लग्नात वाद्यं वाजवण्याचं काम करतात. ती लोकं वाद्यं वाजवतात म्हणजे त्यांना ताल आणि सुर थोडाफार कळत असल्यानं ते कीर्तनाला साथ देऊ शकतील असं महाराजांना वाटलं. महाराजांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना कीर्तनात साथ देण्याची विनंती केली. त्यावर ते लोक म्हणाले,’आम्ही लग्नातले वाजंत्री. आम्हाला टाळ,पखवाज आणि विणा कसा वाजवता येईल?’ त्यावेळी महाराज म्हणाले तुम्हाला जसं जमेल तसं वाजवा. त्यांनी त्यावेळी महाराजांना होकार दिला पण त्यांच्या काही अटी होत्या. ते म्हणाले, आम्हाला लग्नात वाजवण्याचं निमंत्रण आलं की त्यादिवशी आम्ही कीर्तनाला येऊ शकणार नाही. महाराज म्हणाले, ठीक आहे. कारण ते लोक आपल्या गरजा वाजंत्री व्यवसायातून पूर्ण करत असत. त्यामुळे महाराजांनी सांगितलं ज्यादिवशी वाजंत्र्याचं काम नसेल तेव्हा कीर्तनला या. कारण कुणाचाही संसार मोडून किंवा कुणाला त्रास देऊन कीर्तन करणं हे महाराजांच्या विचारात बसत नव्हतं. उलट महाराजांना असं वाटायचं माझ्या वारकऱ्यांनी संसार व्यवस्थित करावा. त्यानी संसार करुन मगच परमार्थाच्या वाटेला लागावं. ‘पंढरीचा वारकरी। धन्य तो संसारी॥’ ही महाराजांची शिकवण होती. महाराजांनी कधी कोणाला असं सांगितलं नाही की तुम्ही संसार सोडा आणि परमार्थ करा. त्यामुळेच महाराजांनी त्यांना कीर्तनासाठी यायला सांगितलं.

पहिलं कीर्तन दलित वस्तीत
महाराजांचं पहिलं कीर्तन एका दलित वस्तीत म्हणजे वेशीबाहेरच्या महारवाड्यात झालं. या कथित अस्पृश्यांच्या वस्तीत त्यांचं कीर्तन सुरु झालं. मोडक्या-तोडक्या शब्दात आणि जमेल तशा पध्दतीने पहीलं कीर्तन त्यांनी केलं. त्यांच्या साथीदारांनी टाळ आणि पखवाज वाकडा-तिकडा कसाही वाजवून कीर्तनाला रंग भरला. कीर्तनात संतांच्या कथा, विनोदी उदाहरणं, लोकांच्या हिताचा उपदेश आणि अभंग-दोह्यांची प्रमाणं यामुळं कीर्तनाची वाहवा झाली. लोकांना कीर्तन प्रचंड आवडलं. कीर्तनाचा ग्रामीण बाज लोकांना भावला. कीर्तनात विद्वता कमी पण रसाळपणा जास्त होता. कैकाडी बाबांची कीर्तनपद्धत असल्यानं ती बहुजनाभिमुखच होती. या पहिल्या कीर्तनात ज्यांनी टाळ वाजवला त्यात महादेव गेजगे, तुकाबुवा गेजगे आणि आणखी एक पोतराज असलेले तुकाराम गेजगे असे काही साथीदार होते. त्याबरोबरच गेणा बाबा गेजगे यांनी या कीर्तनात पखवाज वाजवण्याचं काम केलं. या प्रसंगानंतर गावभर महाराजांच्या कीर्तनाचा बोलबाला झाला. गावातून त्यांना कीर्तनाची निमंत्रणं येऊ लागली.

ढोलवादक बनला पखवाज वादक
कीर्तनाच्या निमंत्रणाची संख्या वाढत चालली होती. त्यावेळी घडलेला एक प्रसंग फारच इंटरेस्टींग आहे. एकदा घेरडीतल्या कोंडीबा कोळी यांच्या घरी कीर्तन होतं. त्यांनी महाराजांना कीर्तन करा म्हणून सांगितलं. आता कीर्तनाला जायचं म्हणजे पखवाजी आणि टाळकऱ्यांना सांगावं लागणार. म्हणून महाराजांनी त्यांना सांगितलं की उद्या आपल्याला कीर्तनाला जायचंय. पण त्या सर्वांना त्याच दिवशी लग्नात वाजंत्र्याचं काम आलं होतं. त्यामुळे उद्या कीर्तनासाठी यायला आम्हाला जमणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी महाराजांच्या मनात विचार आला की आपण इतर टाळकरी कसेही जमा करू पण पखवाज वाजवायला कोणीही येणार नाही. जे पखवाज वाजवत होते त्यांनी आधीच सांगितलं होतं की वाजंत्र्याचं काम आलं की आम्ही येणार नाही. महाराजांचा नाईलाज झाला. त्यावेळी महाराजांनी पखवाज वाजवण्यासाठी आनंदा घुटूकडे यांना सोबत घ्यायचं ठरवलं. त्याचं कारण होतं आनंदा घुटूकडे यांना उत्तम ढोल वाजवता येत होता.

त्यांना महाराजांनी विनंती केली की आज तुम्ही कीर्तनात पखवाज वाजवायला यावं. त्यांनीही लगेचच होकार दिला. त्यांनाही वाटलं की आपण ढोल वाजवतो तर पखवाज वाजवणं फार काही अवघड नाही. महाराजांसह हे सर्व साथीदार कीर्तनाच्या ठिकाणी गेले. कीर्तन सुरू झालं. पखवाज वाजवणाऱ्यांना पखवाजावर थाप कशी मारायची एवढंही माहित नव्हतं. त्यांचा या अगोदर पखवाजाशी काहीच संबंध आला नव्हता. पण ते धाडशी होते. त्यांनी तसाच पखवाज वाजवायला सुरूवात केली. ढोल जसा वाजवत होते तसाच ते पखवाज वाजवायला लागले. टाळ थोडे जोरात वाजले की हे पखवाज जोरात वाजवायचे आणि टाळ हळू वाजले की पखवाजही हळू वाजवायचे. कीर्तन चालू होतं. पखवाजाच्या आणि टाळाच्या आवाजाने कीर्तन दणाणून गेलं. लोकांनाही पखवाज आणि टाळातलं फारसं काही कळत नव्हतं. त्यामुळे त्यांनाही त्या कीर्तनाची गोडी लागली. कीर्तन झाल्यानंतर ज्यांच्या घरी कीर्तन होतं ते कोंडीबा कोळी महाराजांच्या जवळ आले. त्यांनी महाराजांना कीर्तन एकदम भारी झाल्याचं सांगितलं. आजवर गावातल्या भजनात अनेक पखवाज वाजवणारे बघितले पण तुमच्या पखवाज वाजवणाऱ्याला जोडच नाही. पखवाज खूप भारी वाजला आणि कीर्तनही भारी झालं असं त्यांनी सांगितलं.

बैलांमागे कीर्तनाचा सराव
या काळातली कीर्तनं ही या पद्धतीने होत असत. इतक्या अडचणीतून महाराजांनी गावातल्या लोकांना कीर्तनाची गोडी लावली होती. महाराज संतांचे अभंग, ओव्या आणि दोहे पाठ करायचे. देवांच्या आणि संतांच्या कथा पाठ करायचे. कीर्तनाचा सराव व्हावा म्हणून शेतात कामं करताना बैलांमागं एकटेच कीर्तन करायचे. याच काळात त्यांचा आणखी एक मित्रही कीर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. तो ही दिवसभर कीर्तनाचा सराव करायचा. भलेमोठे ग्रंथ वाचायचा. रात्री लोक कीर्तनाला जमले की तो मित्र कीर्तनाला उभा रहायचा. त्याच्याकडे पाठांतर भरपूर होतं पण सभाधीटपणा नव्हता. तो कीर्तनाला उभा राहिला की ‘आज सेवेला अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकारामांचा’ एवढं म्हटलं की त्याला पुढे काही बोलताच यायचं नाही. अडखळत अडखळत कसंबसं तुकारामांचं नाव घेतलं की घाबरून खालीच बसायचा. मग त्यानंतर महाराज कीर्तनाला उठायचे. त्यांचं पाठांतर थोडं कमी पण सभाधीटपणा होता. लोकांना तीन-चार तास कीर्तनात गुंतवून ठेवण्याची कला त्यांना अवगत होती. ते सहजपणे कीर्तन करायचे. लोकांना ते प्रचंड आवडायचं.

या काळात महाराजांच्या कीर्तनाची सगळीकडे वाहवा होत होती. एकदा त्यांचं अनंतराव डोंगरे यांच्या वाड्यात कीर्तन होतं. अनंतराव डोंगरे म्हणजे घेरडी गावातलं मोठं प्रस्थ. त्यांच्या वाड्यात महाराजांनी कीर्तन केलं. कीर्तनात संतांचे अभंग- दोहे आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सांगितल्या. ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचा अर्थ उलगडून दाखवला. अनंतरावांना कीर्तन आवडलं. एके दिवशी त्यांची महाराजांच्या वडिलांशी म्हणजे आबांशी भेट झाली. अनंतराव आबांना म्हणाले,’ तुझ्या पोटी हिरा जन्माला आला आहे. आपल्या आठ-दहा खेड्यात त्याच्यासारखा कुणी नाही. त्यानं आमच्या वाड्यातल्या कीर्तनात ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचा अर्थ सांगितला. आजवर आपल्या गावात हे कुणालाच जमत नव्हतं.’ अशारितीने महाराजांचं सगळीकडे कौतुक होत होतं.

सोंगी भारूडकारांची साथसंगत
हळूहळू त्यांची ओळख घेरडीचे भोजा बुवा म्हणून अनेक गावात होऊ लागली. मग त्यांची आसपासच्या गावात कीर्तनं होऊ लागली. एकदा त्यांना कीर्तनाचा बुक्का आला. (ग्रामीण भागात कीर्तनाचं निमंत्रण देण्याला ‘बुक्का देणं’ म्हणतात) घेरडीतल्या कुरणातील महादेव मंदीरातल्या श्रावण महिन्याच्या सप्ताहात तिथल्या लोकांनी महाराजांचं कीर्तन सांगितलं. महाराज त्या कार्यक्रमासाठी गेले. कीर्तन केलं आणि कीर्तन झाल्यावर तिथे शिंदेवाडीच्या (शिंदेवाडी ही वाकी घेरडीतली)भारूडकरांचा सोंगी भारूडाचा कार्यक्रम होता. तो भारुडाचा कार्यक्रम पाहायला महाराज थांबले. गजानन शिंदे व साथीदारांचा भारूडाचा कार्यक्रम सुरु झाला. त्यामध्ये जे कलाकार होते त्यांना पखवाज आणि टाळ व्यवस्थित वाजवता येत होता. ताल आणि सुर कळत होता. हे सगळे कलाकार बघून महाराजांना वाटलं की हे जर माझ्या कीर्तनाला साथ देण्यासाठी आले तर कीर्तनाला अजूनच रंग येईल.

भारूडाचा कार्यक्रम संपल्यानंतर महाराजांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना आपण कीर्तनकार असल्याचं सांगितलं. त्याबरोबरच कीर्तनात साथीला येण्याची विनंती केली. ‘तुम्ही पखवाज भारी वाजवता, तुमचे अभंग पण पाठ आहेत आणि त्याच्या चालीही अगदी सुरात म्हणता. तुमची जर साथ मिळाली तर अजूनच भारी होईल ‘ असं महाराजांनी म्हटलं. त्यावर या मंडळीनी गळ्यात माळ नसल्यानं कीर्तनाला कसं येणार असं विचारलं.
अंतरी निर्मळ वाचेसी रसाळ।
तया गळा माळ असो नसो ।।
जर तुमचं मन शुद्ध असेल तर तुम्ही माळ घातली काय आणि न घातली काय सारखंच आहे. तुम्ही माळ घातली तर चांगलंच पण नाही घातली तरीही तुम्ही विठ्ठल भक्ती करु शकता. महाराजांना हा संतविचार माहीत होता. त्यामुळे त्यांनी माळेची अट घातली नाही. मग त्या शिंदेवाडीच्या मंडळींनी कीर्तनाला येण्यासाठी होकार दिला. ही शिंदेवाडीकरांची आणि महाराजांची पहिली भेट.

दारू, चोरीपासून मुक्तता
महाराजांच्या भावाचं शिंदेवाडीच्या जवळ एक शेत होतं. तिथं शेतात कामासाठी आलो की आपण दर सोमवारी कीर्तन करत जाऊ असं महाराजांनी शिंदेवाडीच्या भारूडकार मंडळींना सांगितलं. त्यानंतर दर सोमवारी महाराज शिंदेवाडीला कीर्तनासाठी जाऊ लागले. एकदा महाराज कीर्तनाला गेले त्यावेळी जिथं कीर्तन होतं तिथंच बाजूला दारू काढण्याचा अड्डा होता. गजानन शिंदे हे त्या मंडळीतले म्होरक्या होते. त्यांनी महाराजांना बसायला सांगितलं. बसल्यानंतर गजानन शिंदे यांनी तिथल्या एका व्यक्तीला महाराजांसाठी पहिल्या धारेची दारू आणायला सांगितली. त्यावर महाराज म्हणाले की माळ घातल्यानंतर दारु प्यायची नसते. त्याला गजानन शिंदे यांनी प्रत्युत्तर असं दिलं की दारूत फक्त हिवराची साल आणि गूळ असतो. आता हिवराची साल ही झाडाचीच साल आहे आणि गूळ तर सप्त्यातल्या खिरीत आपण वापरतो. मग दारू प्यायला काय अडचण आहे? त्यावेळी महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं की वारकऱ्यांना तामस आहार चालत नाही. वारकऱ्यांना माळ घातल्यानंतर काही बंधनं आहेत. ती बंधनं पाळली पाहिजेत. शिंदेवाडीच्या या मंडळींचा दारु काढणं हा व्यवसायच होता. त्याबरोबरच त्यापैकी बरेचजण मारामाऱ्या आणि छोट्या-मोठ्या चोऱ्या देखील करत होते. आसपासच्या गावात व पंचक्रोशीत त्यांची छोटी गुंडगिरीच होती. लोक त्यांना भयंकर घाबरत असत. अशा माणसात जाऊन महाराजांनी विठ्ठल नामाचा महिमा सांगितला. रामायणातल्या कथा ते कीर्तनातून सांगत असत. या कथा-कीर्तनांमधून त्यांनी शिंदेवाडीच्या या मंडळींवर वारकरी विचारांचे नैतिक संस्कार केले. त्यांना व्यसनापासून दूर केलं. त्यांच्या ज्या वाईट सवयी होत्या त्या सांगून त्यांना चांगलं जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. तिथल्या लोकांना महाराजांच्या कीर्तनाची आवड निर्माण झाली.

कीर्तनासाठी वाट्टेल ते…
महाराज दर सोमवारी शिंदेवाडीला कीर्तनासाठी जात असत. महाराजांच्या घरापासून ते शिंदेवाडीपर्यंत साधारणपणे दहा-बारा किलोमीटर अंतर होतं. त्यावेळी महाराजांना घरची सर्व कामं करुन जायला लागायचं. घरची शेतातली सगळी कामं होईपर्यंत उशीर व्हायचा. शिंदेवाडीपर्यंत जाण्यासाठी त्याकाळी वाहनं नसायची. त्यामुळे महाराज दहा-बारा किलोमीटर अंतर चालत आणि कधीकधी अक्षरशः पळत जायचे. पळत जाताना अंगाला भरपूर घाम यायचा. अंगावरचे सगळे कपडे घामाने भिजायचे. काही काळानंतर ते अंगावरले कपडे पिळून आणि झटकून नंतर घालायचे. असं करत करत ते कीर्तनाच्या ठिकाणी पोचायचे. तिथली मंडळी जागीच असायची. उजेडासाठी मशाली पेटवलेल्या असायच्या. महाराज दोन-तिन तास कीर्तन करायचे. कीर्तन संपलं की परत माघारी पळत घरी यायचे. हे सगळं करताना रात्र उलटून गेलेली असायची.

महाराजांना कीर्तनासाठी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत होता हे त्यांच्या एका प्रसंगावरून आपल्याला दिसतं. तो प्रसंग फार इंटरेस्टींग आहे. महाराजांना शिंदेवाडीला कीर्तनाला जायचं होतं. घरची शेतातली सगळी कामं होतीच. महाराज दिवसभर घरची शेतातली कामं करायचे आणि कीर्तनाला जायचे. पण घरातील काही लोकांना त्यांनी कीर्तनाला गेलेलं आवडत नव्हतं म्हणून ते त्यांना कीर्तनाला जाऊ देत नसत. विरोध करत असत. महाराज मात्र काहीही झालं तरी कीर्तनाला जायचंच या विचारांचे. कीर्तनाला जाण्यासाठी त्यांनी एक नामी युक्ती शोधून काढली. ते रात्री बैलं शेतात घेऊन जायचे. बैलांना राखण्यासाठी बैलांजवळच झोपतो म्हणून रानातच झोपायचे. अंथरूण आणि पांघरुण घेऊन ते रानात जायचे. कीर्तन असेल त्या दिवशी अंथरूणावर जोंधळ्याच्या कडब्याच्या पेंढ्या ठेवायचे आणि मग त्यावर पांघरुण घालायचे. हे कशासाठी तर घरचं कुणी आलं तर महाराज झोपले आहेत असं वाटून निघून जावं म्हणून. अशारितीने घरचे झोपल्यानंतर पेंढ्यावर पांघरूण घालून महाराज रात्री शिंदेवाडीला कीर्तनाला जायचे आणि घरचे झोपेतून उठायच्या अगोदर परत घरी यायचे. असा हा क्रम दर कीर्तनाच्या वेळी असायचा. त्यामुळे महाराज रात्री शिंदेवाडीला कीर्तनाला जातात हे घरी माहीत नसायचं.

एके दिवशी कीर्तनाला जाण्यासाठी त्यांनी नेहमीप्रमाणे अंथरूण-पांघरूण घेतलं. बैलांना घेऊन शेतात गेले. बैल बांधले. अंथरूणावर पेंढ्या ठेवल्या. त्यावर पांघरूण घातलं आणि घरातले सगळे झोपले आहेत याची खात्री झाल्यानंतर ते कीर्तनाला निघाले. महाराज तिकडं कीर्तनाला गेले खरे पण इकडे महाराजांनी बांधलेला बैल सुटला. सुटलेला बैल शेतातून घराकडे आला. बैलाच्या आवाजाने घरचे जागे झाले. त्यांना वाटलं महाराज बैल घेऊन घरी आले की काय म्हणून महाराजांच्या वडिलांनी महाराजांना हाका मारायला सुरुवात केली. पण कुणीच ओ देईना म्हणून ते शेतात आले. त्यांना तिथे महाराज झोपल्यासारखे दिसले. त्यांनी परत हाक मारली पण महाराज काही उठत नव्हते. एवढा जागसुद असणारा माणूस एवढ्या हाका मारल्या तरी कसा काय उठेना असा प्रश्न त्यांना पडला. म्हणून ते जवळ आले आणि पांघरुण काढलं तर ज्वारीच्या पेंढ्या होत्या. महाराज तिथे नव्हते तर ते होते शिंदेवाडीतल्या कीर्तनात. महाराजांची कीर्तनावर अशी निष्ठा होती. त्या निष्ठेतूनच त्यांनी आयुष्यभर कीर्तनं केली.

कीर्तनकार घडविण्यासाठी परिश्रम
कोणत्याही परिस्थितीत त्यांनी कीर्तनाला जायचं सोडलं नाही. महाराजांच्या सोबत जे कीर्तनातले अनेक साथीदार होते त्या बहुतेकांच्या घरी गरिबी होती. त्यांना कीर्तनाची आवड होती पण गरिबी असल्यामुळेे दोनवेळचं जेवणही मिळणं कठिण असायचं. त्यांनी कुठेतर मजुरी केली की मगच पोटाचा प्रश्न मिटायचा. या लोकांनी कीर्तनाला यावं म्हणून महाराज सणासुदीला आणि अधून मधून घरी जेवायला बोलवायचे. काहीना ज्वारी आणि मका असे धान्य द्यायचे. अनेकदा तर महाराज स्वत:च्या शेतातील मक्याची कणसं देत असत. गावातला एकजण पखवाज वाजवत होता. त्याला त्या काळात स्वतःचा धंदा उभारण्यासाठी १०,००० रूपयांची मदत करायची तयारी महाराजांनी दाखवली होती. एकदा महाराजांनी गावातील लोकांना टाळ आणि पखवाज वाजवायला यावा म्हणून एक शिक्षक नेमला होता. या शिक्षकाचं मानधन त्यांनी स्वखर्चातून दिलं. आपल्या गावात चांगले गायक, वादक आणि कीर्तनकार घडावेत असं त्यांना वाटायचं. म्हणून त्यांनी अनेक प्रकारचं कष्ट घेतलं.

या काळात होणारी त्यांची कीर्तनं ही सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे कैकाडीचालीत होत होती. पण नंतर त्यांनी कीर्तनाची पद्धत थोडीफार बदलली. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांच्या घरी त्यांच्या मातोश्रींपासून एक कर्नाटकातली दिंडी जेवणासाठी यायची. त्या दिंडीतल्या लोकांनी महाराजांची कीर्तनं बघून त्यांना वासकर पद्धतीने कीर्तन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते वासकर फडावर जाऊन तिथली कीर्तनं ऐकू लागले. वासकर फडातली कीर्तनं ऐकून त्यांनी त्या पद्धतीनुसार कीर्तन करायला सुरूवात केली. हळूहळू आसपासच्या गावात व पंचक्रोशीत महाराजांच्या प्रेरणेने अनेक मंदिरं उभारली जाऊ लागली. अनेक ठिकाणी सप्ताह होऊ लागले. त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सप्ताहांची सुरुवात व्हायची. त्यामुळे अनेक गावातल्या सप्ताहात पहिल्या दिवसाची कीर्तनसेवा महाराजांची असायची. आजही त्यांची परंपरा गुरूवर्य विठ्ठल महाराज बंडगर आणि ज्ञानेश्वर महाराज बंडगर हे पार पाडत आहेत. महाराजांच्या कीर्तनाला लोकांची खूप गर्दी असायची. अनेक लोक बैलगाड्यातून कीर्तनाला जमायचे. महाराजांचे अनेक टाळकरी शनीवारच्या मारूती मंदिरातील कीर्तनासाठी दिंड्याने येत असत. ज्ञानाबा तुकाराम असा नामघोष करत अनेक वाड्या वस्त्यांवरून कीर्तनासाठी दिंड्या यायच्या. महाराज कीर्तनासाठी अनेकदा चालत, बैलगाडीतून आणि सायकलवरही जायचे. पुढच्या काळात वाहनांची सुविधा झाली त्यावेळी कीर्तनासाठी स्वतंत्र वाहन सुरू झालं. कीर्तनावरची भोजलिंग महाराजांची निष्ठा सिद्ध करणारा एक प्रसंग अनेक ठिकाणी ऐकायला मिळतो. एकदा महाराजांना हणमंत गावचा कीर्तनाचा बुक्का आला. दिवाळीतल्या सप्ताहात पहिल्या दिवसाची कीर्तनसेवा महाराजांकडे होती.

त्या काळात भरपूर पाऊस आला. महाराजांनी पाऊस थांबण्याची थोडावेळ वाट बघीतली पण पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे महाराज सायकल घेऊन कीर्तनाला निघाले. घरापासून हणमतगावापर्यंत साधरणपणे सतरा ते अठरा किलोमीटरचं अंतर आहे. महाराज पडत्या पावसात जवळ्यापर्यंत आले पण पाऊस जोराचा झाल्यामुळे जवळा गावच्या नदीला खूप पाणी आलं होतं. पाणी संरक्षक दगडा वरुन वाहत होतं. महाराज तिथे पोहचले आणि त्यांनी पाण्याचा अंदाज लावला. सायकल उचलली आणि महाराजांनी पाण्यातून वाट काढत नदी पार केली. पाण्यात काटेरी काट्या होत्या. ते सगळं सहन करत महाराज नदीपलीकडे गेले. हा सगळा प्रकार झाला तेव्हा रात्री साडे अकरा – बारा वाजले होते. तेव्हा ते तिथे पोचले. खूप उशीर झाल्यामुळे महाराजांची वाट पाहून ती मंडळी निघून गेली. मंदिरात विण्याला पहारा देणारी दोन-चार माणसं होती. त्यांनी महाराजांना बघितलं आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी महाराजांना विचारलं की एवढा पाऊस आणि अंधार असताना तुम्ही कसं काय आलात, त्यावेळी महाराजांनी घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. त्यानंतर महाराजांनी त्या दोन – चार जणांसमोरच कीर्तन केलं.

अलीकडच्या काळात जर एखादा कीर्तनकार गावात बोलवायचा झाला तर त्याची आधी सगळी सोय करावी लागते. त्यांना कडक इस्त्री केलेले कपडे, गाडी, कीर्तनाला भरपूर श्रोते, व्यवस्थित सांऊड सिस्टम, रुचकर जेवण, चांगले वादक, गायक आणि भरपूर मानधन असलेलं पाकीट ही आताची कीर्तनकार मंडळी पाहिली असता त्या पार्श्वभूमीवर भोजलिंग महाराजांचं वेगळेपण उठून दिसतं. महाराजांनी हजारो कीर्तने केली पण कोणत्याही कीर्तनाचे पैसे घेतले नाहीत. जिथं कीर्तन केलं तिथं पाणीही पिले नाहीत. कारण जगतगुरू तुकोबारायांनी कीर्तनकाराना काही बंधने घातली होती. तुकोबाराय म्हणतात
जेथे कीर्तन करावे। तेथे अन्न न सेवावे।।
बुका लावू नये भाळा। माळ घालू नये गळा।।
तट्टा वृषभासी दाणा। तृण मागो नये जाणा।।
तुका म्हणे द्रव्य घेती। देती तेही नरका जाती।।
या उक्ती प्रमाणाने महाराजांचं वर्तन होतं. त्यांनी आयुष्यभर कोणाचा एकही रुपया घेतला नाही. अन्न आणि पाणीही घेतलं नाही. दोन तासाच्या कीर्तनापेक्षा २२ तासाचं आचरण महत्त्वाचं असतं हे भोजलिंग महाराजांच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं.

ठरलेल्या कीर्तनात बदल नाही
महाराजांची काही कीर्तनं दरवर्षी ठरलेली असायची. यात ते बदल करायचे नाहीत. दुसरा कितीही मोठा कार्यक्रम असला अथवा निमंत्रण देणारा कितीही जवळचा असला तरी महाराज अगोदल ठरलेल्या कीर्तनासाठीच जात असत. जवळपास वीस ते पंचवीस गावात त्यांना सप्ताहातल्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा असायची. कोणत्याही संताची पुण्यतिथी असेल किंवा देवांची जयंती त्यादिवशीच्या कीर्तन सेवाही ठरलेल्या असायच्या. जसं दत्त जयंतीला घेरडीतलं कीर्तन, गोरोबा काकांच्या पुण्यतिथीला तरंगेवाडीतलं कीर्तन असायचं. त्याचप्रमाणे तुकाराम बीज, एकनाथ षष्ठी, चोखामेळा पुण्यतिथी, राम नवमी आणि हनुमान जयंती अशी विविध नैमित्तीक कीर्तनं ते करत असत.

अनेकदा दत्त जयंतीला अथवा तुकाराम बिजेला एकाचवेळी अनेक ठिकाणी त्यांनी कीर्तनासाठी यावं असा आग्रह असायचा. त्यावेळी महाराज प्रत्येकाला वेगवेगळा वेळ द्यायचे. खरंतर जयंती अथवा पुण्यतिथी दुपारी बारा वाजता करण्याची पद्धत आहे. त्यामुळे महाराजांनी दुपारी बारा वाजता आपल्याकडेच यावं म्हणून अनेकजण आग्रही असायचे. त्यावेळी महाराज दिवसभरात कोणत्याही वेळी जयंती अथवा पुण्यतिथी साजरी केली तरी चालते असं सांगून त्यांची समजूत घालायचे. दुपारी उत्सव साजरा न करता अन्य वेळी केला तर जे पाप लागतं ते मला लागू द्या असं महाराज म्हणायचे. अमुक वेळीच तो उत्सव साजरा झाला पाहिजे असा हट्ट धरण्यात काही अर्थ नाही हे महाराज समजावून सांगायचे. आपण त्या देवाचा अथवा संतांचा त्या दिवसभरात कधीही उत्सव साजरा करू शकतो हे महाराज पटवून द्यायचे.

महाराजांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कीर्तनासाठी भरपूर श्रोते असावेत असा त्यांचा कधीच आग्रह नव्हता. दर शनीवारी घेरडीतल्या मारुती मंदिरात महाराजांचं कीर्तन ठरलेलं असायचं. नंतरच्या काळात अनेकदा या कीर्तनासाठी कुणीच यायचं नाही. पण प्रसंगी महाराज मात्र एकट्या मारूतीरायाला कीर्तन सांगून येत असत. महाराजांचे कीर्तनासाठीचे काही नियम ठरलेले असायचे. त्यात महाराजांनी कधीच बदल केला नाही. महाराज दरमहा शुद्ध एकादशीला वारीसाठी जात असत. दशमी, एकादशी आणि द्वादशी हे तिन दिवस महाराज पंढरपुरातच असत. तिथे त्यांचं एकादशीला कीर्तन असायचं. त्यावेळी ते कीर्तनासाठी ‘हेची व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास।।’ हाच अभंग घ्यायचे. एकादशीचं कीर्तन कुठेही असो त्यांचा हाच अभंग कीर्तनसेवेसाठी ठरलेला असायचा. अलीकडच्या काळात त्यांचा शिष्य समुदाय खूप वाढला होता. अनेक ठीकाणी त्यांचे मोठे कीर्तनाचे कार्यक्रम झाले. आज सद्गुरु भोजलिंग महाराज घेरडीकर फड खूप विस्तारलेला आहे कारण त्यामागं महाराजांची वारकरी संप्रदायावरची निष्ठा आणि त्यासाठी घेतलेलं कष्ट.

आज सद्गुरु भोजलिंग महाराज घेरडीकर फडावर अनेक कीर्तनकार, वादक, गायक आणि भरपूर टाळकरी तयार झाले. मी एक त्यांचा शिष्य आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी वादन, गायन, कीर्तन-प्रवचनं करतो. महाराजांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. जीवन कसं जगावं याची शिकवण दिली.

(‘वैराग्यबीज’ या सद्गुरू भोजलिंग महाराज स्मृती विशेषांकातून साभार)

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *