कृषी संस्कृतीतून घडले
जोतिबा आणि तुकोबा
तुकोबा आणि जोतिबा ही व्यक्तिमत्त्वे कृषी संस्कृतीतून घडली. सामाजिक स्थानातून येणारा न्यूनभाव फेकून देत, वर्णाश्रम व्यवस्थेला आव्हान देत हे दोन ‘बा’ उभे राहिले. ‘एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर वर्चस्व राहणे हे चातुर्वर्ण्यांचे मर्म आहे. या चातुर्वर्ण्यांविरुद्ध महाराष्ट्रात अनेक बंडे झाली. त्यात महाराष्ट्रातील साधू-संताचे बंड प्रमुख होते’, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले होते. तुकोबा ज्ञानावर मक्तेदारी सांगणाऱ्या वर्गाला उत्तर देताना मातीतून, कष्टातून आलेला अनुभव शब्दबद्ध करतात.
– प्रा. गणपत धुमाळे
अनुभवे आले अंगा। ते या जगा देतसे।।
येथे तुकोबाराया ज्ञानाला अनुभवाचे अधिष्ठान देतात.
नका दंतकथा येथे सांगू कोणी।
कोरडे ते मानी बोल कोण।।
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार।
न चलती चार आम्हापुढे।।
असा शब्द पंडित्यापेक्षा अनुभवावर भर देतात. महात्मा फुलेही चिपळूणकरांसारख्या भाषा शुद्धीच्या आग्रहाला बळी न पडता लोकभाषेत लेखन करतात. ‘गुलामगिरी’सारख्या ग्रंथाच्या रूपाने भारतीय समाजाचे राजकीय अर्थशास्त्रच मांडतात. म्हणून डॉ. सदानंद मोरे म्हणतात की, ‘त्या काळात मराठी कविता शेती-मातीचे अनुभव शब्दरूप घेतात. म्हणून त्यांच्या अभंगात पदोपदी शेतीचे अनुभवविश्व अवतरते.
मढे झाकुनिया करिती पेरणी।
किंवा
शेत आले सुगी सांभाळावे चारी कोण।
पिका आले परी केले पाहिजे जतन।।
अशा अभंगांतून तुकोबांनी शेतीमातीशी नाळ सांगितली. तसेच
बरे झाले देवा कुणबी केलो।
नाही तरी असतो दंभेची मेलो।।
अशा या अभंगांतून अहंगडातून मुक्तीही मिळवली.
दुसरीकडे जोतिबा शेतकऱ्यांच्या वेशात ब्रिटिश युवराज सभेत शेतकऱ्याच्या वेशात उपस्थित राहून शेतकरी-कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडतात आणि खऱ्या भारताचे चित्रण करतात.
ते म्हणतात –
सत्ता तुझी राणीबाई। हिंदुस्थानी जागृत नाही।।
जिकडे तिकडे ब्राह्मणशाही। डोळे उघडूनी पाही।।
म्हणजेच फुले कुणबी असल्याचे वास्तव स्वीकारून समग्र शेतकऱ्यांच्या वतीने आसूड ओढतात. येथे महात्मा फुले वर्णाश्रम व्यवस्थेला आव्हान देत असताना श्रमाचे श्रेष्ठ-कनिष्ठत्व नाकारून श्रमाचे महत्त्व अधोरेखित करतात.
स्त्री-पुरुष सर्व कष्टकरी व्हावे।
कुटुंबा पोसावे आनंदाने।।
असा संदेश देत ऐतखाऊ प्रवृत्तीवर हल्ला चढवतात.
जळो जळो तुमचे जिणे। उद्योग्या आधी ताजे खाणे।। स्वकष्टाने पोटे भरा। ज्योती शिकवी फजितखोरा।।
तुकोबा आणि जोतिबा या दोघांनीही प्रखर स्वरूपात ढोंगी साधू लोकांवर हल्ला चढवला आहे.
जसे तुकोबा म्हणतात –
अंगा लावूनी राख। डोळे झाकूनी करती पाप।।
दावूनी वैराग्याची कळा। भोगी विषयाचा सोहळा।।
तर जोतिबा म्हणतात –
स्नान संध्या नित्य टिळा टोपीवर।
घेतो मांडीवर जारीणीस।।
या दोघांची सामाजिक पार्श्वभूमी जशी सारखी त्याचप्रमाणे त्यांच्या अभिव्यक्ती आणि तात्त्विक भूमिकेत जवळीक दिसून येते. मात्र, महात्मा फुल्यांनी वारकरी संप्रदायावर केलेल्या टीकेमुळे उपरोक्त जवळीक लक्षात घेतली गेली नाही. खरे म्हणजे महात्मा फुले यांच्या समोरील प्रश्न आणि तत्कालीन वारकरी संप्रदाय यामध्ये मोठी तफावत होती. परिणामी फुल्यांना वारकरी संप्रदायावर टीका करणे आवश्यक होते; मात्र अभंग आणि अखंड या संकल्पनेतील साम्यता, दोघांनी मांडलेली भूमिका त्यातला बाज जवळीक अधोरेखित करणारा आहे. विशेष म्हणजे १८५७ ते १८६६ अशी साधारण ९ वर्षे महात्मा फुल्यांचा तुकाराम गाथेचा अभ्यास चालू होता, असे डॉ. सदानंद मोरे नमूद करतात. इतकेच नव्हे तर तुकारामतात्या पडवळ यांनी देहू परिसरात महात्मा फुल्यांबरोबर फिरून तुकोबांचे अभंग मिळवून प्रकाशित केले. म्हणूनच अखंडावर अभंगाचा प्रभाव असणे स्वाभाविकच म्हणावे लागेल.
सत्य असत्यासी मन केले ग्वाही।
मानीयेले नाही बहुमता।।
किंवा
तुका म्हणे सत्य पाळावे वचन।
अन्यथा आपण करू नये।।
अशा प्रकारे सत्याचा आग्रह धरणारे तुकोबा आणि
सत्य सर्वांचे आदी घर। सर्व धर्मांचे माहेर।।
अशी मांडणी करणारे सत्यशोधक जोतिबा ही त्यांच्यातील साम्यस्थळे होत. अभंग आणि अखंड यातील संबंधांवर सदानंद मोरे यांनी भाष्य केले आहे.
तुकोबा ज्या कारणांमुळे
भिक्षापात्र अवलंबणे। जळो जिणे लाजीरवाणे।।
असे म्हणतात. त्याच कारणाने फुले वारकऱ्यांना टाळकुटे म्हणतात. ही टीका फुले वर्तमान वारकरी संप्रदायावर का करतात, यावर भाष्य करताना राम बापट म्हणतात, ‘वारकरी संप्रदायाची मूळ प्रेरणा सामाजिक घडामोडींपासून अलिप्त अथवा विन्मुख राहण्याची कधीच शक्यता नव्हती. पण एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र हा संप्रदाय एक प्रकारच्या अध्यात्मिक आवर्तात सापडलेला दिसतो.’
वारकरी पंथाच्या विचारात जातीयता आणि अस्पृश्यता यांच्या विरोधात उभे राहण्याची बीजरूप क्षमता आहे. पण समकालीन वारकऱ्याची प्रवृत्ती मात्र ईश्वरसाधना आणि नामस्मरण यांच्यात दंग होती. बाहेरील कोणाला संप्रदायात प्रविष्ट होऊन नेतृत्व काबीज करणे अशक्य होते. संप्रदायाचा मूळ ब्राम्हण्यविरोधी रोख फिरवून त्याचे ब्राह्मणीकरण करण्याची प्रक्रिया त्याच सुमारास झाली होती. तेव्हा फुल्यांनी आपला मोर्चा वारकरी संप्रदायाकडे वळवला यात नवल नाही,’ असे राम बापट म्हणतात.
अंधश्रद्धेवर प्रहार करताना तुकोबा म्हणतात –
नवसे कन्यापुत्र होती। तरी का करणे लागे पती।।
तर जोतिबा त्याच प्रखरतेने म्हणतात –
जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती।
दुजा का करिती मुलांसाठी।।
ग्रहामाजी शनी आकाशी रमला।
तुझ्या पायी आला येथे कैसा।।
अशी भूमिका घेतात. म्हणून तुकोबा आणि जोतिबा यांच्यातील तात्त्विक वीण सारखी आहे. जो फरक दिसून येतो तो काळातील तफावतीमुळे.
(प्रा. गणपत धुमाळे यांच्या ।।ज्ञानबातुकाराम।। वार्षिकातील ‘बा तुकोबा’ या विशेषांकातील लेखाचा संपादित अंश.)