संतांची चरित्रे लिहिणारे
आधुनिक काळातील महिपती
आधुनिक काळातील महिपती असे ज्यांना संबोधले जाते असे संतकवी दासगणू महाराज यांचे आज तिथी प्रमाणे पुण्यस्मरण. त्यांचे मूळ नाव गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील अकोळनेर येथे झाला. त्यांनी केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे महिपती’ म्हणून ओळखले जाते.
१८९३ मध्ये ते पोलीस खात्यात भरती झाले आणि १९०४ पर्यंत त्यांनी नोकरी केली. पोलीस खात्यात नोकरीला असलेल्या सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज यांचा ओढा मात्र परमार्थाकडेच होता. नोकरीत असताना त्यांना त्यावेळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहीसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली, की देवानेच आपल्याला वाचविले.
मग त्यांनी संपूर्ण जीवन अध्यात्माला अर्पण केले. त्याकाळी तमाशा हे करमणुकीचे साधन होते. त्यांनी तमाशासाठीही काव्यरचना केली. एकदा श्रीगोंद्याला दासगणूंची सद्गुरू वामनशास्त्री इस्लामपूरकर यांच्याशी भेट झाली. शास्त्रीबुवांनी मंत्रोपदेश देण्याचा आग्रह दासगणूंनी धरला. शास्त्रीबुवांनीही त्यांना शिवमंत्राचा उपदेश केला. तसेच पंढरपूरची वारी करण्यास सांगितले. त्यानंतर सद्गुरूंचा दास या भावनेने ते काव्यरचनेत स्वतःचा उल्लेख ‘दासगणू’ असा करू लागले. त्यांचे पहिले कीर्तन वर्ष १८९७मध्ये जामखेडच्या विठ्ठल मंदिरात झाले. त्यानंतर कीर्तनकार म्हणून आध्यत्मिक क्षेत्रात त्यांचे नाव झाले. त्यांनी पहिले नारदीय कीर्तन १९०६ मध्ये श्री साईबाबांचे सांगण्यावरून केले.
‘श्री साईनाथ स्तवनमंजिरी’ या स्तोत्राची रचना त्यांनी ९ सप्टेंबर १९१८ रोजी मध्य प्रदेशातील श्री माहेश्वर या क्षेत्री श्री साईबाबांचे महानिर्वाणाच्या अगोदर ३७ दिवसांपूर्वी केली. त्यानंतर साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष म्हणून दासगणू महारांजाची निवड झाली. श्री साईबाबा यांचे मानसपुत्र म्हणून त्याना ओळखले जाऊ लागले. तेथून पुढे १९४५ पर्यंत त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. शेगावच्या गजानन महाराजांचे चरित्र त्यांनी अत्यंत भक्तिभावपूर्ण, रसाळ पद्धतीने ओवीबद्ध केले. आज घरोघरी त्याची पारायणे होतात. संतकवी दासगणू यांनी सुमारे संतचरित्राचे २५ पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले.
श्री गजाननविजय ग्रंथ पद्यरूपात लेखनासाठीसाठी श्री. पांगारकर यांनी श्री. गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ ह. भ. प. संतकवी श्री दासगणू यांचे नाव सुचवले. त्यावेळी ते पंढरपूर येथे होते. शेगावहून संस्थानची मंडळीं दासगणूंना भेटण्यास आली आणि त्यांना श्री गजानन महाराजांचे चरित्र पद्य ओवीबद्ध रूपात लिहिण्याची विनंती केली. दासगणूंनी शेगाव येथे यापूर्वीच गजानन महाराजांचे दर्शन घेतले असल्याने त्यांनी होकार दिला.
श्री रतनसा सोनावणे यांनी दिलेली कागदपत्रे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणी कालक्रमानुसार त्यांनी संकलित केल्या. छगन बारटक्के दासगणू महाराजांना प्रसंग वाचून दाखवत आणि दासगणू महाराज तात्काळ तो प्रसंग ओवीबद्ध करत आणि लेखनिक भराभर लिहून घेत. त्या लेखनाचे जाहीर वाचन होई. तेव्हा ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होई. अशा रितीने वयाच्या ७४व्या वर्षी दासगणू महाराजांनी २१ अध्यायांचा, ३६६९ ओव्यांचा रसाळ आणि प्रासादिक ग्रंथ पूर्ण करून संस्थानाकडे सुपूर्द केला.
महाराजांची ग्रंथसंपदा
अमृतानुभव भावार्थमंजिरी, उपदेशपर पद्ये, उद्धवागमन, छात्रबोध, हितबोध, पासष्टीभावार्थदीपिका, पोवाडे, भक्तिरसायन, भजनावली, श्री गुरूचरित्र साराम्रूत, श्रीगोदामहात्म्य, श्रीगौडपादकारिका, श्रीईशावास्य भावार्थ बोधिनी व मंत्रार्थ, श्रीनागझरी महात्म्य, श्रीनारद-भक्तिसूत्र-बोधिनी, श्रीभक्तिलीलामृत (अर्वाचीन), श्रीभक्तिसारामृत, श्रीसंतकथामृत, श्रीमांगीशमाहात्म्य, श्रीविष्णुसहस्रनामबोधिनी, श्रीमध्वविजय, श्रीशंकराचार्य चरित्र, श्रीशंडिल्य भक्तिसूत्र भावदीपिका, श्रीशनिप्रताप, सुबोध लघुकथा, श्रीगजाननविजय. (शेगावच्या श्रीगजानन महाराजांच्या लीलाचरित्र वर्णन असलेला ग्रंथ.) दासगणू महाराजांनी जवळपास ८५ कीर्तनोपयोगी आख्याने रचली आहेत.
प्रिय गोदावरी नदीच्या काठी देह पडावा आणि श्रीपांडुरंगाने चरणी जागा द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. पवित्र संत चरित्रे लिहिणाऱ्या या आपल्या भक्ताची ही इच्छा पांडुरंगाने मान्य केली. शके १८८३, कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजेच संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांच्याच पुण्यतिथीच्या दिवशी (सोमवार, दि.२६/११/१९६२) श्रीविठ्ठलाने आपल्या या निष्ठावंत भक्ताला पंढरपुरातच स्वतःच्या चरणी विसावा दिला. महाराज पंचतत्वात विलीन झाले.
श्री दासगणू महाराजांच्या थोर कार्याला ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन.