वारकऱ्यांचा कुटुंब वत्सल
आणि भक्त वत्सल श्रीराम
‘रामकृष्ण हरी’ हा वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र. साहजिकच श्रीराम आणि श्रीकृष्ण ही वारकऱ्यांची उपास्य दैवते. ही दोन्ही दैवते म्हणजे पंढरीच्या श्री विठ्ठलाचीच रूपे. रामकृष्णांचा उत्तर भारतात मोठा प्रभाव आहे. कारण अयोध्या आणि मथुरा ही त्यांची जन्मस्थळे उत्तर भारतातच आहेत. अर्थात या दोन्ही दैवतांचा, त्यांच्या रामायण, महाभारत या महाकाव्यांचा प्रभाव हा संपूर्ण भारतावर नव्हे जगातील अनेक देशांवर आहे.
या पार्श्वभूमीवर ‘वैष्णव’ म्हणवून घेणाऱ्या वारकरी संतांवर तो असणे साहजिकच होते. पण वारकरी संतांनी ही दोन्ही दैवतं महाराष्ट्रात रुजवताना त्यांची कुटुंबवत्सल, प्रेमळ, भक्तांचा सांभाळ करणारा देव अशी प्रतिमा अधोरेखित केली. धनुर्धारी आक्रमक योद्ध्यापेक्षा संतांनी मातृपितृभक्त, सदोदित सीता, हनुमंत, लक्ष्मण यांच्या सोबत असणारा कुटुंबवत्सल श्रीराम रंगवला. तसेच कौटुंबिक, सामाजिक नीतिमूल्ये जपणारा श्रीराम आपल्या साहित्यातून ठसवला.
संत नामदेवांचा मातृपितृभक्त श्रीराम
१३ व्या शतकाच्या दरम्यान व्रतवैकल्ये, कर्मकांडे यांच्या जाळ्यात सर्वसामान्य समाज अडकला होता. त्याला त्यातून काढून नामभक्तीचा सोपा मार्ग समतेची वारकरी चळवळ उभारणाऱ्या संत नामदेवांनी दाखवला.
नामाचा महिमा कोण करी सीमा।
जपावें श्रीरामा एका भावें॥
न लगती स्तोत्रें नाना मंत्रें यंत्रें।
वर्णिजे बा वक्त्रें श्रीरामनाम॥
असे सांगून केवळ नामजप केल्याने देव सहजासहजी भेटू शकतो, असा आत्मविश्वास नामदेवरायांनी दिला. उत्तर भारतात आयुष्यातील अनेक वर्षे घालविलेल्या संत नामदेवांनीच संत साहित्यातून पहिल्यांदा रामकथा सांगितली. मातापित्याची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकासाठी पंढरपूरला येऊन विटेवर उभा राहिलेला श्री विठ्ठल पंढरपुरात राहणाऱ्या नामदेवांच्या समोर होता. त्यामुळे
पितृवचनालागी मानोनी साचारी।
जाला पादचारी वनी हिंडे।।
अशी मातृपितृसेवेची महती सांगणारा राम त्यांनी अभंगातून सांगितला.
संत एकनाथांचा स्नेहाळू श्रीराम
नामदेवरायांनंतर संत एकनाथ महाराजांनी रामकथेच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांनी आचरणात आणलेला राजधर्म, पुत्रधर्म, पत्नीधर्म, सेवाधर्म सांगितला.या रामगुणांचे जो आचरण करेल,
राम नाम ज्याचे मुखी।
तो नर धन्य तिन्ही लोकी।।
असा माणूस धन्य होय, असे नाथबाबांनी सांगितले.
शिवाय
‘श्रीराम प्रेमवत्सलू। श्रीराम निरपेक्ष स्नेहाळू।
श्रीराम भक्तकाजकृपाळू। दीनदयाळू श्रीराम॥
असा भक्तवत्सल श्रीराम त्यांनी समाजाच्या हृदयावर ठसवला.
नैतिकता शिकवणारा तुकोबारायांचा श्रीराम
आपल्या अभंगांतून समाजाला नैतिकतेची शिकवण देणाऱ्या संत तुकाराम महाराजांनी तर आपल्या अभंगांतून श्रीरामाच्या जीवनातील आदर्श घटना सांगितल्या आहेत.
उच्छिष्ट ती फळे खाय भिल्लीणीची।
आवडी तयाची मोठी देवा।।
अशी शबरीची उष्टी बोरे प्रभू श्रीरामाने कशी आवडीने खाल्ली याचा दाखला देत
राम ह्मणतां तरे जाणतां नेणतां।
हो का यातिभलता कुळहीन॥
अशी केवळ रामनाम घेतल्याने जातीधर्म भेदाची भावना नाहीशी होते, असे तुकोबाराय सांगतात. श्रीरामाची सामाजिक, राजकीय नैतिकताही तुकोबाराय वारंवार सांगतात. लंका जिंकल्यानंतरही तिची अभिलाषा न धरता लंकेचे राज्य अगदी सहजपणे श्रीराम बिभीषणाला देऊन टाकतात. लंकाराज्य बिभीषणा। केली चिरकाळ स्थापना॥ औदार्याची सीमा। काय वर्णू रघुरामा॥ असे श्रीरामाच्या राजकीय नितीमत्तेचे वर्णन तुकोबाराय करतात. निष्णात धनुर्धारी असलेला महावीर राम तेवढाच मृदू, हळवा, कोमल हृदयाचा, कुटुंबवत्सल, पत्नीवर जीवापाड प्रेम करणारा होता. हे सांगताना ‘वनांतरी रडे ऐसें पुराणी पोवाडे’ असे सीताहरणानंतर मुसमुसून रडणाऱ्या श्रीरामाचे वर्णन तुकोबारायांनी आपल्या अभंगात केले आहे.
राम रहीम एकरुपता सांगणारा संत कबिरांचा श्रीराम
वारकरी संप्रदायामध्ये ‘ज्ञानाचा एका, नामयाचा तुका आणि कबिराचा शेखा’ अशी संत परंपरा सांगितली जाते. निर्गुण निरकार परमेश्वराची भक्ती करणाऱ्या संत कबिरांना श्रीरामाचा अवतार असणारा वारकऱ्यांचा ‘लेकुरवाळा’ विठू आवडला. त्यामुळे संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात मांडलेल्या समतेच्या खेळात ते सहभागी झाले, रंगून गेले. आषाढी वारीसाठी काशीहून पंढरपूरला दिंडी घेऊन येऊ लागले. अजूनही त्यांच्या कबीर पंथाची पांढरी पताका पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या गेरूभगव्या पताकेसोबत फडकत असते.
कबिरांनी आपल्या दोह्यांतून सांगितलेला
काशी काबा एक है। एकै राम रहीम।
मैदा इक पकवान बहु। बैठ कबीरा जीम।।
हा कबिरांचा समता, बंधुभावाचा विचार वारकऱ्यांनी स्वीकारला. म्हणून तर अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनाला गेल्यानंतर तेथून जवळच असलेल्या मगहर येथील संत कबिरांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी आवर्जून जातात. अशा या प्रेमाचा, बंधुभावाचा संदेश देणाऱ्या वारकऱ्यांच्या भक्तवत्सल प्रभू श्रीरामाला रामनावमीनिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!