महाराष्ट्रात राहतात सात्त्विक,

अनाचार न करणारे लोक

महाराष्ट्रात सात्त्विक प्रवृत्तीची माणसं राहतात, जी अनाचार करत नाहीत आणि इतरांनाही करू देत नाहीत. ‘सात्विक तेथे अनाचाराची बुद्धी न उपजे आपण अनाचार ना करी आणिकासी करू न देई’. थोडक्यात महाराष्ट्र म्हणजे ‘महंत राष्ट्र, म्हणजे थोर, निर्दोष, सगुण’, असं वर्णन गुर्जर शिवबास या चक्रधर स्वामींच्या शिष्यानं करून ठेवलं आहे.

– डॉ. श्रीरंग गायकवाड.

(कृपया, आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा…🙏)
मुळात आपलं महाराष्ट्र राज्य १ मे १९६० रोजी अस्तित्त्वात आलं ते मराठी भाषिक प्रदेश म्हणून. महाराष्ट्रातले आपण सर्वजण जी मराठी भाषा बोलतो आहोत, ती भाषा घडविली आहे संतांनी. त्यामुळं आपण आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संतांच्या या उपकारचं स्मरण केलं पाहिजे. विद्वेषाला पोषक ठरणाऱ्या वातावरणाची निर्मिती भोवती होत असताना, संतांचे प्रेम, बंधुभाव, समता, एकोप्याच्या विचारांचं आपण आचरण करायला हवं.

ज्ञानेश्वर माऊलींची क्रांती
संस्कृतमधली भगवद्गीता प्राकृतात म्हणजे मराठीत आणून संत ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषाच सर्वसामान्यांची भाषा आहे हे ठणकावून सांगितलं आणि मराठी भाषेत ज्ञाननिर्मिती करण्यास चालना दिली. स्त्री-शूद्राला ज्ञान ग्रहणाचा अधिकार आहे, असं सांगितलं. एवढंच नाही तर, ‘माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’ एवढी मराठी भाषेत ताकद असल्याचं सांगून मराठी माणसांचा आत्मविश्वास वाढविला.

‘ज्ञानदीप लावू जगी…’
संत नामदेवांनी तर अभंग हा लोकछंद निर्माण करून कीर्तनाच्या माध्यमातून ‘ज्ञानदीप लावू जगी’ अशी प्रतिज्ञाच केली होती. ती पूर्ण करण्यासाठी ते देशभर फिरले. विविध जातींमधून संत घडविले. संत जनाबाईसारख्या अनाथ स्त्री संतांच्या खांद्यावर वारकरी चळवळीची धुरा सोपविली. पंजाबमधील शीख धर्माचा पाया घातला. संत कबीर, संत रोहिदास, संत मीराबाई या उत्तरेतील संतांना प्रेरणा दिली. पंढरीच्या विठ्ठलाचा समता, बंधुभावाचा संदेश देत खरा ‘महाराष्ट्र धर्म’ त्यांनी देशाला सांगितला.

मराठी काय चोरापासून आली?
ही संत परंपरा पुढे नेताना संत एकनाथ महाराज यांनी
‘संस्कृत भाषा देवाने निर्माण केली आणि मग प्राकृत अर्थात मराठी भाषा काय चोरापासून निर्माण झाली? असा सवाल केला आणि लोकभाषेत साहित्य निर्मिती केली. लोककला, लोकपरंपरा, लोकभाषा यातील रुपकं वापरून मराठी भाषा खेळकर केली. संत ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी संपादित करून मूळ रुपात आणण्याचं कामही त्यांनी केली.

 

 

तुका झालासे कळस
संत तुकाराम महाराजांनी तर सर्व संतांच्या या कार्यावर कळस चढविला. वारकरी त्यांच्या अभंग गाथेला ‘पंचम वेद’ असं म्हणतात. आज प्रत्येक मराठी माणूसाला एक तरी मराठी अभंग येतोच. ‘ज्याला तुकोबांचा एक तरी अभंग पाठ आहे, तो मराठी माणूस’ मराठी माणसाची व्याख्या आचार्य अत्रे यांनी केली होती.

नाथ पंथीयांनी घातला पाया
१३ व्या शतकात वारकरी संतांच्याही अगोदर नाथ, महानुभव, लिंगायत, जैन आदी पंथानी या मराठी भाषेची पायाभरणी केली होती. लोकभाषेत ज्ञान देण्याची भूमिका नाथ पंथीयांनी घेतली. गोरक्षनाथ यात आघाडीवर होते. म्हणून तर त्यांची मंदिरे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात दिसतात. त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक एकोपा, सलोखा सांगितला. त्यांचीच परंपरा वारकरी संतांनी पुढे नेली.
चक्रधर स्वामींनी सांगितला नकाशा
आपल्या आधुनिक महाराष्ट्राच्या सीमा १९६०मध्ये अधोरेखित झाल्या असल्या तरी महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींनी त्या १३ व्या शतकातच सांगून ठेवल्या आहेत. ज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खान्देश, विदर्भ, मराठवाडा यातील सर्व मराठी भाषिक प्रदेश म्हणजे महाराष्ट्र असं त्यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे ते स्वतः गुजराती होते. पण आपल्या शिष्यांना त्यांनी महाराष्ट्री असावे। कानडा देशा तेलंगा देशा न वसावे।
असेही बजावले होते. त्यांच्या शिष्यांनीही ही गुरुआज्ञा तंतोतंत पाळली होती. महाराष्ट्रात राहून मराठीच बोलावं असा आग्रह त्यांनी धरला होता. आचार्य नागदेव म्हणाले होते,
पंडित केशवदेवा तुमचा
अस्मात्‌ कस्मात्‌ मी नेणे गा।
मज चक्रधरे निरूपली मऱ्हाटी तियासी पुसा।।
पंडित केशवदेव, तुमचे अस्मात-कस्मात हे असले संस्कृत आम्हांला कळत नाही. चक्रधरांनी आम्हांला मराठीतच बोलावे, लिहावे असे सांगितले आहे. तेव्हा तुम्ही मराठीतूनच काय ते बोला.

भागवत, रानडे आदींचे मोलाचे कार्य
अलिकडच्या काळात वि. का. राजवाड्यांसारख्या इतिहासकारांनी ‘संताळे, टाळकुटे’ अशी हेटाळणी करत संतांचे कार्य दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला. पण राजाराम शास्त्री भागवत, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या विद्वानांनी संतांचे महाराष्ट्र घडविण्यातील योगदान अधोरेखित केले. छत्रपती शिवराय यांनी राजभाषा म्हणून मराठीचा आग्रह धरणे हा त्यांच्यावरील संतांचा प्रभावच अधोरेखित करतो. तुकाराम महाराजांनी तर अगदी ‘पाईकीचे अभंग’ लिहून स्वराज्यासाठी स्वामिनिष्ठ, लढाऊ मावळे घडविले. शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य निर्माण होण्यासाठी इथल्या समाजाची पूरक अशी मशागत संतांनी केली होती. समाजामध्ये एकोपा, सलोखा, समता, बंधुता त्यांनी निर्माण केली होती. स्त्री-शूद्र, अठरा पगड जातींतून संत निर्माण केले होते.
‘महाराष्ट्रात जन्माला येणे दुर्लभतर’
भारतात जन्मात येणे ‘दुर्लभ’ असेल तर महाराष्ट्रात जन्माला येणे ‘दुर्लभतर’ आहे, असे ते मोठ्या गर्वाने म्हणत. ज्ञानेश्‍वर, नामदेव, तुकोबा, विनोबा आणि गाडगेबाबा यांसारखे ज्ञानी, समतावादी, मानवतावादी संत ज्या महाराष्ट्रात झाले तिथल्या धुळीचा भाग्यवंत टीळा आपल्या भाळी आहे, या भावनेने अत्रे गहिवरत. महाराष्ट्र म्हणजे विविध जातीधर्माच्या लोकांना एकत्र ठेवणारं, समता, बंधुभाव, एकोपा, सलोखा, प्रेम या संत विचारांच्या धाग्यांनी अलवारपणे विणलेलं भरजरी वस्त्र आहे. आपल्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी हे एकोप्याचे धागे उसविण्याचे प्रयत्न काही मंडळींनी केले, पण त्यांना यश आले नाही आणि भविष्यातही कदापी येणार नाही. ऐक्याची ही वीण या संतांनी घडविलेल्या महाराष्ट्रात अधिकाधिक घट्ट होत जाईल, यात शंका नाही. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! जय महाराष्ट्र!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *