माझा राम समाजातील
सर्वांना जवळ घेणारा
रामाबद्दल अनेक प्रवचनं, कीर्तनं, व्याख्यानं आणि कथा आहेत. कोणाच्या दृष्टीनं हा राम म्हणजे सद्गुणी, सदाचारी, एकवचनी, निष्ठावान आहे. तर, कोणाचा राम हा राजा दशरथ आणि तीन मातांचा सर्वोत्तम मुलगा आहे. काही जणांचा राम हा सीतेचा पती आहे. काही लोकांचा राम हा रावणाचा संहारक असा आहे. मी वाचलेला, अनुभवलेला आणि समजून घेतलेला राम थोडा वेगळा आहे. माझा राम हा सर्वांना जवळ घेणारा आहे. चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य असणारा आहे.
– प्रसाद खेकाळे
एक चांगला शिक्षक-प्रेरक आणि व्यवस्थापक आहे. ठीक आहे, काही लोक म्हणतात की राम-रामायण हे काल्पनिक आहे…राम होता, आहे किंवा नसेलही..वगैरे… पण, त्या कल्पनेतल्या रामाकडे गुणग्राहकता आहे. मॅनेजमेंटची अनेकोत्तम स्किल्स आहेत. आपण अगदीच नास्तिक होऊन “राम’ सोडून देऊ…पण, त्या काल्पनिक रामाकडून आपण सहज घेऊ शकतो, ती डेव्हलपमेंट स्किल्स जबरदस्त आहेत.. देव, देवपण स्वीकारा किंवा नको.. पण, हा ‘राम’ नक्की स्वीकारण्यासारखा आहे…
१. स्वत:चे पिता सम्राट होते. महान राज्य आणि घराण्याची परंपरा असतानाही रामाला विद्या देण्यासाठी गुरुजी घरी येऊ शकत होते. पण, राम गुरूकुलात जाऊन शिकला. राजकुमार असूनही विद्यार्थी दशेत सर्व सुखाचा त्याग केला. तिथं शिकून अयोध्येला परत आला. तिथंही राज्यकारभाराचे धडे घेतले. शिक्षण पूर्ण होऊनही आणखी नवीन शिकण्याची उमेद या रामाकडे होती…तो माझा राम आहे!
२. चक्रवर्ती साम्राज्याचं वैभवशाली सिंहासन खुणावत असताना दुसऱ्या बाजूला जेव्हा आदेश येतो, की ‘ही वल्कलं परिधान करा आणि १४ वर्षे वनवासाला जा…” तेव्हा कोणताही विचार न करता, हा राम सर्व वैभवाचा त्याग करतो आणि अवाक्षर न काढता, आदळआपट न करता, वाद न घालता वनवासी होतो…तो माझा राम आहे!
३. ऐश्वर्याचा त्याग करून धाकट्या भावाकडे राज्य सोपवून पत्नी, भावाला सोबत घेऊन वनवासात निघालेला आज्ञाधारी राम… तो माझा राम आहे!
४. इतक्या मोठ्या घराण्याचा राजकुमार जेव्हा वनवासाला निघतो, तेव्हा बाकीच्या राज्यांना, तिथल्या राजांना ही खबर नक्कीच समजली असेल. त्यांनी रामाची मदत करण्याचा प्रयत्नही केला असेल. राम जिथून जात होता, त्याच भागात त्याचं आजोळघर देखील होतं, असं म्हणतात. राम त्याच्या मामाची- नातेवाईकांची मदत घेऊ शकत होता. पण, तसं न करता राम चालत राहिला.. तो ठाम होता.. तो माझा राम आहे!
५. सीतेचं अपहरण झाल्यावर लंकेकडे निघालेल्या रामाला असंख्य लोक भेटले. त्यात रामाच्या सोबत गेले, ते कोण होते? त्यात राजघराणे किंवा त्या काळातील वतनदार कुटुंबातील एकही जण नव्हता.. ते होते पीडित, वंचित, शोषित..त्यांची निवडही रामाने कौशल्यपूर्वक केली होती. कारण, तो ज्याच्याविरुद्ध लढाई करण्यासाठी जात होता, तिथं धनिकांची-राजांची नाही, तर सदाचारी लोकांची गरज होती.. असे लोक निवडणारा… तो माझा राम आहे!
६. वानर सेनेचा प्रमुख बालीने त्याचा भाऊ सुग्रीवच्या पत्नीचं अपहरण केलं होतं. त्यांच्यात समेट घडवण्याची जबाबदारी रामावर आली होती. बाली आणि सुग्रीव, दोघंही रामाचे प्रशंसक. पण, जर अन्याय आणि दुराचारी लोक सोबत असतील, तर ती वृत्ती संपवणेदेखील पुण्यकारक आहे, अशी शिकवण देत बालीचा वध करणारा… तो माझा राम आहे!
७. रावणाशी युद्ध करण्यापूर्वी लंकेत पाठवण्यासाठी हनुमानाची निवड, हे रामाच्या मॅनेजमेंट स्किलचं आणखी एक उत्तम उदाहरण. प्रतिस्पर्ध्याचा आत्मविश्वास कसा खच्ची करायचा, हे शिकवणारा…तो माझा राम आहे!
८. रावणाशी युद्धप्रसंगी लक्ष्मणाला बाण लागला. तो मूर्च्छित झाला. तो जगण्याची आशा शून्य! पत्नीचं अपहरण झालेलं.. भाऊ अशा अवस्थेत! विचार करा की त्या प्रसंगी रामावर काय परिस्थिती ओढवली असेल? त्यालाही धीरोदात्तपणे तोंड देऊन हनुमानाला संजीवनी आणण्यासाठी पाठवणारा धीरगंभीर… तो माझा राम आहे!
९. रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण, जो सदाचारी होता.. रामाने त्याला जवळ केलं. शत्रूचा भाऊ असूनही अलिंगन दिलं.. विश्वास ठेवला..गुणग्राहकतेचं आणखी एक उदाहरण देणारा… तो माझा राम आहे!
१०. वनवासी झाल्यावरही रामापुढं भयंकर संकटं आली, येत राहिली.. त्या प्रत्येकाला राम सामोरं गेला. हतबल होऊन किंवा पळवाट त्यानं शोधली नाही. डावपेच योग्य ठिकाणी वापरले. तिन्ही मातांनी विनंती करूनही, कैकयीने माफी मागूनही वडिलांना दिलेल्या १४ वर्षांच्या वनवास वचनाची पूर्ती रामाने केली.. जेव्हा आयोध्येतून राम वनवासाला निघाला, तेव्हा तो ‘राजकुमार’ राम होता आणि वनवास पूर्ण करून परतला, तेव्हा ते ‘मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम’ झाले.. हाच माझा राम आहे!
(पत्रकार प्रसाद खेकाळे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार. हा पूर्ण लेख लिहिण्यासाठी डॉ. कुमार विश्वास यांच्या व्याख्यानाचा आधार घेतला आहे.)