संत तुकाराम महाराजांचे
गुरू सद्गुरू बाबाजी चैतन्य
नाथ, दत्त आणि चैतन्य संप्रदायांचे प्रवाह एकत्र येऊन वारकरी संप्रदायाची चंद्रभागा निर्माण झाली. नाथ संप्रदाय ज्ञानेश्वर माऊलींच्या माध्यमातून, दत्त संप्रदाय संत एकनाथांच्या, तर चैतन्य संप्रदाय संत तुकाराम महाराजांच्या माध्यमातून वारकरी विचारधारेत आला. तुकोबारायांना अनुग्रह देणारे चैतन्य संप्रदायाचे बाबाजी चैतन्य महाराज यांची आज पुण्यतिथी.
राघव चैतन्य यांचा प्रभाव कर्नाटकातही
राघव चैतन्य-केशव चैतन्य-बाबाजी चैतन्य-संत तुकाराम महाराज अशी गुरुपरंपरा आहे. राघव चैतन्य हे सिध्द पुरुष होते. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला जुन्नर, पुणे आणि बसव कल्याण, गुलबर्गा भागात त्यांची कीर्ती पसरली होती. त्यांचा शिष्यसंप्रदायही मोठा आणि सर्वधर्मीय होता. त्यांचे गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येथील समाधीस्थान हिंदू, मुस्लीम, जैन, लिंगायत आणि इतर धर्मीयांचेही श्रद्धास्थान आहे. श्री राघव चैतन्यांचे शिष्य श्री केशव चैतन्य यांची समाधी पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे आहे, तर श्री केशव चैतन्य यांचे शिष्य श्री बाबाजी चैतन्य यांची समाधी गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यहाळी येथे आहे. काही संशोधकांनी केशव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य हे एकच, असे म्हटले आहे, तर काही विद्वानांनी हे दोन सत्पुरुष असल्याचे म्हटले आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या श्री बाबाजी चैतन्यांच्या सोबत श्री केशव चैतन्य आणि श्री राघव चैतन्य यांच्या नावांचा उल्लेख केला आहे.
चैतन्यलीला हा चैतन्य संप्रदयाचा मुख्य ओवीबद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथाचे लेखक कृष्णदास यांनी केशव चैतन्यांच्या समाधीची बरीच सेवा केली. त्यामुळे श्री केशव चैतन्यांनी दर्शन देऊन त्यांना उपदेश दिला, असे सांगतात. उध्दव चिद्घन हे संत तुकारामांच्या समकालीन होते. त्यांनी एका अभंगात गुरुपरंपरा सांगितली आहे. लतीबशहा मुसलमान। रामदास भक्त पूर्ण।।
राघव चैतन्य केशव चैतन्य बाबा चैतन्य तुकोबा॥
वाचे वदे श्रीचिध्दन। झाला निमग्न उध्दव॥
तर संत बहिणाबाईंच्या गाथेत
पुढे विश्वंभर शिवरुप सुंदर।
तेणे राघवी विचार ठेवीलासे॥
केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य।
झालासे प्रसन्न तुकोबासी॥
एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी।
म्हणोनी बहिणी लाधलीसे॥
असा गुरुपरंपरेचा उल्लेख केला आहे.
तर संत महिपतीने आपल्या ‘भक्ती लीलामृत’ ग्रंथात संत तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा आणि गुरु उपदेशाची माहिती दिली आहे.
राघव चैतन्य भक्त वैष्णव।
तयासी शरण चैतन्य केशव।।
बाबा चैतन्य माझे नाव।
तुकयासी देव बोलले॥
केशव चैतन्य राघव चैतन्य।
बाबाजी आपुले सांगितले नामाभिधान।।
रामकृष्णहरी मंत्र जाण। मजकारणे सांगितला॥
माघ शुध्द दशमी साचार। सुदिन पाहून गुरुवार।
माझा करुनी अंगिकार। गेले सत्वर सदगुरु॥
राघव चैतन्य यांची ओतूरमध्ये उपासना
राघव चैतन्य दत्त सांप्रदायिक होते. त्यांचे मूळ नाव रघुनाथ होते. त्यांच्याबद्दल कथा सांगतात, की गिरनार पर्वतावर अनुष्ठान केल्यानंतर श्री दत्तात्रेयांनी त्यांना जुन्नरजवळील ओतूरच्या वनात जाण्यास सांगितले. तेथे योग्य वेळी व्यासगुरू भेट देऊन उपदेश करतील, असे सांगितले. त्यावेळी हे वन तपोवन म्हणून प्रसिद्ध होते. तेथे त्यांनी पार्थिव लिंग स्थापन करून कडक तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होवून व्यासांनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांचे नाव राघव चैतन्य ठेवले. तसेच ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ हा मंत्र दिला. राघव चैतन्य नंतर शिवभक्ती करू लागले. समाधी घेण्यापूर्वी ते आळंदला सोमेश्वराच्या देवळात राहिले. त्यांच्या समाधीजवळ शिवलिंगाचीच स्थापना करण्यात आलेली आहे. ओतूरच्या कपर्दीकेश्वराबद्दल राघव चैतन्य यांच्याशी जोडलेली एक कथा सांगितली जाते. १५ व्या शतकात त्यांनी ओतूरला मांडवी नदीकिनारी घनदाट अरण्यात महर्षी व्यासांचे दर्शन व्हावे म्हणून बारा वर्षे अनुष्ठान केले. नदीच्या तीरावर वाळूचे शिवलिंग तयार करीत असताना त्यांना एक कवडी मिळाली. आपल्या तपश्चर्यचे फळ म्हणजे कवडी मिळाल्यामुळे. महाराज अतिशय दुःखी झाले. त्यांनी ती कवडी फोडली. त्यात एक अतिशय तेजस्वी, सुंदर स्वयंभु शिवलिंग मिळाले. महाराजांच्या प्रेरणेने या लिंगाचे कपर्दीकेश्वर हे नामकरण करुन या ठिकाणी लोकांनी मंदिर बांधले. तसेच नवव्या शतकातील शिलाघर राजवंशातील नववा झंझ या राजाने प्राचीन शिवलिंगावर सुंदर मंदिर उभारले होते. १२व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुध्दा या तपोभूमीचा उल्लेख केला आहे.
केशव चैतन्य यांची ओतूरमध्ये समाधी
राघव चैतन्य यांचे शिष्य केशव चैतन्य. त्यांचे मूळ नाव विश्वनाथ होते. त्यांचे वडील नृसिंह निजामशाहीत नोकरीला होते. त्यांना लोहगडची किल्लेदारी मिळाली होती. निजामशहा आणि आदीलशहा यांच्या संघर्षात विश्वनाथ यांना लोहगड सोडून ओतूर येथे यावे लागले. तेथे त्यांची भेट राघव चैतन्य यांच्याशी झाली. त्यांनी राघव चैतन्य यांच्याकडून दीक्षा घेतली. संन्यास दीक्षेनंतर त्यांचे नाव श्री केशव चैतन्य झाले. संन्यास ग्रहणानंतर एक दोन वर्षे ओतूरमध्ये राहून ते गुरू राघव चैतन्य यांच्यासोबत तीर्थयात्रा केली. श्री राघव चैतन्यांनी आळंदला समाधी घेतल्यावर ते १५६३ ला ओतूरला परत आले. ओतूरमध्ये त्यांचा बराच शिष्यवर्ग तयार झाला. तेथे गंगेच्या वाटेवरच त्यांनी एक मठ बांधला. वैशाख वद्य द्वादशी रविवार दिनांक २० मे १५७२ रोजी त्यांनी समाधी घेतली.
श्री बाबाजी चैतन्यांचा तुकोबारायांना उपदेश
श्री केशव चैतन्यांच्या शिष्य वर्गात मुख्यत: कर्नाटक आंध्रमधील बरीच मंडळी होती. त्यातीलच बाबाजी चैतन्य यांनी आपणाला स्वप्नात अनुग्रह दिला, असा उल्लेख तुकोबारायांनी केला आहे.
सद्गुरु राये कृपा मज केली।
परी नाही घडली सेवा काही॥
सांपडविले वाटे जाता गंगास्नाना।
मस्तकी तो जागा ठेवीला कर॥
भोजना मगाती तूप पावशेर।
पडीला विसर स्वप्नामाजी॥
काय कलहे उपजला अंतराय।
म्हणोनीया काय त्वरा झाली॥
राघव चैतन्य केशव चैतन्य।
सांगितली खूण मालिकेची॥
बाबाजी आपले सांगितले नाम।
मंत्र दिला रामकृष्णहरी॥
माघ शुध्द दशमी पाहुनी गुरुवार।
केला अंगिकार तुका म्हणे॥
हा स्वप्नातील गुरुपदेश १६३३ ते १६४३ च्या दरम्यान झाला.
सर्व जातीधर्मातील शिष्य
बाबाजींचा शिष्य समुदाय सर्व जातीधर्मांमधील होता. त्यांचा जीवनाचा बराच काळ आळंद – मान्यहाळ – बसव कल्याण – गुलबर्गा भागात गेला. बाबाजी हे बालब्रम्हचारी होते. त्यांचा जन्म घराण्याची माहिती उपलब्ध नाही. त्या भागातील प्रमुख शिष्यांमध्ये नरसप्पा, बाबण्णा हे मान्यहाळीचे, तर शेख सुलेमानशा राजापूरचे शिष्य आहेत. बाबाजींची समाधी, मठ मान्यहळीच्या उत्तरेस आहे. या मठालाच नरसाप्पा मठ म्हणतात. मठातील देवाऱ्हात शंख, बाण, पादुका आहेत. मठासमोरच बाबाजींच्या दर्ग्याचे आवार आहे. हिंदू, मुस्लिम समाज बाबाजींना श्रध्देने भजतो. मठाशेजारीच संत एकनाथ महाराजांचे नातू शिवराम स्वामींची समाधी आहे. बाबाजींचा समाधीकाल १६४१ ते १६४९ असावा. येथे वर्षातून दोन वेळा उरुस भरतो. बाबाजींनी आपल्याला स्वप्नात अनुग्रह देताना तूप मागितले, असा संत तुकाराम महाराजांनी अभंगात उल्लेख केला आहे. इथे बाबाजींच्या दर्ग्यात आजही दीपासाठी तूपच वापरले जाते. प्रसादातही तूपच वापरले जाते.
ओतूर येथे समाधी
ओतूरला मांडवी नदीकाठी कपर्दीकेश्वराच्या मंदिराशेजारी बाबाजी चैतन्य यांची समाधी आहे. ही संजीवन समाधी निजामशाही काळातील असल्याचे स्थानिक सांगतात. समाधिस्त चैतन्य महाराजांच्या अंगावर मुंग्यांचे वारूळ उभे राहिले. हेच वारूळ आजही या समाधी मंदिरात पाहायला मिळते. हे वारूळ नियमितपणे गाईचे शेण आणि पांढऱ्या मातीने सारवले जाते. अशी कथा सांगतात, की निजामाच्या सैनिकांनी या समाधी वारुळावर कुदळ चालविली. तेव्हा या वारुळातून भुंगे निघाले आणि त्यांनी सैनिकांवर हल्ला चढविला. त्यात अनेक सैनिक मृत्यू पावले. त्यांचे त्या ठिकाणी पीर तयार झाले आहेत. संत तुकाराम महाराज ओतूरला आल्यावर तेथील जानू तेली यांच्याकडे मुक्कामी राहिले. त्यावेळी त्यांना स्वप्नदृष्टांत झाला. त्यांच्या स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य महाराज आले. स्वप्नात त्यांनी तुकाराम महाराजांना ‘राम कृष्ण हरी’ हा मंत्र दिला. सकाळी मांडवी नदीवर स्नानासाठी जात असताना वाटेत त्यांना बाबाजी चैतन्य महाराज प्रत्यक्ष भेटले. त्याठिकाणी तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्य महाराजांनी प्रत्यक्ष ‘राम कृष्ण हरी’ या मंत्राची दीक्षा आशीर्वाद म्हणून दिली.
तेव्हापासून हा मंत्र वारकरी संप्रदायात रूढ झालेला आहे. ज्या ठिकाणी या मंत्राची दीक्षा दिली गेली त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे दगडी मंदिर उभारण्यात आले आहे. या वर्षी त्या मंदिराच्या समोरच नवे मंदिर बांधण्यात आलेले आहे. या नव्या मंदिरात तुकाराम महाराजांची उभी मूर्ती आहे. तसेच संत तुकाराम महाराज ज्या जानू तेल्याच्या घरी मुक्कामी राहिले होते, ती जागा आज जानू तेल्याची बखळ म्हणून ओळखली जाते. त्याठिकाणी देखील काही वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांचे छोटे मंदिर बांधण्यात आले आहे. सुमारे ४०० वर्षांपूर्वी भाऊसाहेब राजश्री पुजारी यांनी बाबाजींचे मंदिर बांधले. माघ शुद्ध दशमीला म्हणजेच चैतन्य महाराजांच्या पुण्यतिथीला येथे कीर्तन सप्ताह आयोजित केला जातो.
ओतूरवरून पंढरपूरसाठी पालखी
जुन्नरमधील एक वारकरी सत्पुरुष वै. कोंडाजीबाबा डेरे आणि वै. सहादूबाबा वायकर यांनी ओतूर ते पंढरपूर अशी बाबाजी चैतन्य महाराजांची पालखी सुरू केली. श्री बाबाजी चैतन्य महाराज सेवा मंडळातर्फे वारीची ही परंपरा चालविली जाते. या पालखी सोहळ्याला सुमारे ६० वर्षे झाली आहेत. ही पालखी अळकुटी, बेलवंडी, श्रीगोंदामार्गे पंढरपूरला जाते. तेथील श्री बाबाजी चैतन्य महाराज मठात पालखीचा मुक्काम असतो. अलिकडच्या काळात देहू ते ओतूर असा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची प्रेरणा संत तुकाराम महाराजांना देणाऱ्या महान सद्गुरू बाबाजी चैतन्य यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!