श्री सद्गुरू मधुसूदन महाराज
पुण्यतिथी महोत्सव, सोनगीर
धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील आनंदवन संस्थान अध्यात्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच ते भगवान श्रीकृष्णाचे मंदिर आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे केशवदत्त महाराज यांची तपोभूमी आहे.
श्री गुरू गोविंद महाराज
श्री गुरू गोविंद महाराज हे सोनगीरच्या आनंदवन संस्थानचे मूळ संस्थापक आहेत. ‘सर्वांवर प्रेम करा. प्राणीमात्रात परमेश्वर आहे. त्यांना दुखवू नका. नामातून उत्तम परमार्थ घडतो, सत्याचरण साधे जीवन, नामस्मरण यांमधून परमेश्वराची प्राप्ती होते’, अशी गुरु गोविंद महाराजांची शिकवण होती. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज यांचे ते समकालीन संत होते. १९२०मध्ये ज्येष्ठ वद्य षष्ठीला त्यांनी संजीवन समाधी घेतली.
श्री सद्गुरू केशवदत्त महाराज
श्री गुरू गोविंद महाराज यांच्यानंतर आनंदवनातील उत्तराधिकारी श्री सद्गुरू केशवदत्त उत्तराधिकारी झाले. १९०९मध्ये नर्मदा परिक्रमा अल्पवयातच पूर्ण करून ते आळंदीत आले. तेथेही तपोसाधना केली. ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व मिळवून संतांकडून ‘ज्ञानेश्वर हृदय’ पदवी प्राप्त केली. नंतर सोनगीरला श्री गोविंद महाराजांच्या सानिध्यात आले.
केशवदत्त महाराज ईश्वराभिमानी तसेच प्रखर देशाभिमानी होते. प्रखर स्वातंत्र्यसेनानी होते. ‘ही भूमी प्रभूची, संतांची आहे. मात्र आज पारतंत्र्यात आहे. या मातेला सोडवा, सुखाने नाम घ्या, हाताने कर्म करा.’ अशी त्यांनी शिकवण दिली. १९३२ मध्ये चारही पीठाच्या शंकराचार्यांसह मान्यवरांना संताना सर्व जाती-धर्मातील सर्वधर्म समभाव परिषद सोनगीरला त्यांनी घेतली.
संत श्री मधुसूदन महाराज
केशवदत्त महाराजांचे शिष्य आणि आनंदवनातील तिसरे महापुरुष उत्तराधिकारी, महान संत मधुसूदन महाराजांचा जन्म १९०४ मध्ये झाला. आपल्या गुरुवर त्यांची अढळ निष्ठा होती, तर शिष्यांवर अपार प्रेम. ते श्री विठ्ठलाचे, ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त, तसेच प्रखर राष्ट्रवादीही होते. आपल्या रोजच्या कर्मातूनच ते शिकवण देत. त्यांचे सहज बोलणे हाच उपदेश असे. सतत ‘हरी-हरी’, ‘राधे गोविंद’ नामस्मरणात ते रंगलेले असत. आजचे आनंदवन ही श्रींचीच प्रेरणा आणि कर्तृत्व होय. श्री गुरुगोविंद महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यांनी सुवर्णाचा कळस बसवला. भक्तनिवास उभारले. आपली समाधीची देहत्यागाची वेळ त्यांनी अगोदर सांगितली होती. त्याप्रमाणे सर्व तयारी करून त्यांनी ३० जानेवारी १९८५ रोजी ध्यान लावून देहत्याग केला. साधनेसह नित्य नामस्मरणातून सहज परमार्थ करावा, अशी त्यांनी शिकवण दिली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम, भागवत कथा ज्ञानयज्ञ, श्रींच्या समाधीवर लघुरुद्राभिषेक, कीर्तन, आदी कार्यक्रम दरवर्षी होत असतात.
लवकरच आपल्या सेवेत येत आहे – www.dnyanbatukaram.com