श्री गोंदवलेकर महाराज यांचे गुरू
नांदेडमधील श्री तुकारामचैतन्य
श्री विठ्ठलाचे उपासक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे गुरू श्री तुकारामचैतन्य ऊर्फ तुकामाई यांची आज पुण्यतिथी. तुकामाई मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील येहळे या गावाचे रहिवासी. त्यांचे वडील काशिनाथपंत आणि आई पार्वतीबाई हे श्री दत्तात्रयाचे उपासक होते. त्यांच्या पोटी मार्च १८१३ मध्ये एका अजानबाहू, तेजस्वी डोळ्यांच्या मुलाने जन्म घेतला. त्याचे नाव त्यांनी तुकाराम ठेवले. हे तुकाराम पुढे विठ्ठलाचे उपासक बनले.
तुकाराम चैतन्य नामकरण
तुकामाईंच्या येहळे या गावापासून जवळछटा उमरखेड या गावात चिन्मयानंद नावाचे थोर पुरुष राहत होते. एकदा ते पंढरपूरहून परतीच्या मार्गावर येहळे या गावात मुक्कामाला राहिले. त्यांना ते पहाटे नदीवर स्नानाला गेलेले असताना नदीकाठावर एक युवक ध्यानस्थ बसलेला दिसला. दोघांची दृष्टादृष्ट होताच चिन्मयानंदांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून, त्याला आशीर्वाद दिला. आता तू ‘तुकाराम चैतन्य’ झालास. तुला इतरांना अनुग्रह देता येईल असे सांगितले. श्री तुकामाय हे नाथपंथीय होते. ते लोकांना संतसेवा करावी, सतत नामस्मरण करावे, परमेश्वरावर श्रद्धा ठेवून त्याला अनन्यभावाने शरण जावे असे सांगत असत.
त्यांचे गुरुबंधू रावसाहेब शेवाळकर कळमनुरीला राहत होते. एकदा तुकाराम चैतन्य बंधूकडे गेले होते. त्यांनी शेवाळकरांना सांगितले, ‘आज देवाला आमरसाचा नैवेद्य करा’. दिवस आंब्याचे असूनही रावसाहेबांच्या झाडाला एकही आंबा लागलेला नव्हता. त्यांना आमरसाचा नैवेद्य कसा करावा, अशी काळजी वाटू लागली. योगायोग असा, की ते निघून गेल्यावर एक बाई तुकामाईंच्या दर्शनाला आल्या आणि त्यांनी संत तुकामाईंपुढे आंबा ठेवला. तुकामाईंनी लगेच, त्या बाईंना तुमच्याकडे जेवढे आंबे असतील तेवढे रावसाहेबांना द्या, असे सांगितले. तिनेही प्रेमाने गाडीभर आंबे पाठवले आणि संपूर्ण गावाला त्या दिवशी आमरसाचे जेवण मिळाले!
श्री गोंदवलेकर महाराजांना अनुग्रह
अनेक जण त्यांच्याकडे शिष्यत्व स्वीकारण्यास येत असत, मात्र ते त्यांची कठोर परीक्षा घेत. त्या परीक्षेत उतरलेले त्यांचे शिष्य शिरोमणी म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज होत. एका रामनवमीला गुरुशिष्य स्नानाला गेले असताना, त्यांनी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला, लगेच त्यांची समाधी लागली. त्यांची समाधी उतरल्यावर, संत तुकामाईंनी त्यांना ‘ब्रम्हचैतन्य या नावाने संबोधले आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा मंत्र दिला. त्यांनी ‘त्या मंत्राच्या साहाय्याने भक्तांना मार्गदर्शन करा आणि परमार्थाची आवड लोकांमध्ये निर्माण करा, लोकसेवा करा’ असा उपदेश केला. त्यानुसार ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी आचरण ठेवले. आज देश परदेशातील हजारो भाविकांनी गोंदवलेकर महाराजांचा तो नामजप चालवला आहे. जून १८८७ मध्ये येहेळगाव येथे तुकामाईंनी देह ठेवला. त्या ठिकाणी त्यांची समाधी उभारण्यात आली.
येहळेगाव येथे समाधी मंदिर
श्री तुकामाईंनी आपल्या येहळेगाव मठाची संपूर्ण मालमत्ता स्वतः श्री गुरुगृही जाऊन उमरेडच्या श्री चिन्मयमूर्ती संस्थानचे तत्कालीन मठाधिपती श्री सच्चिदानंद महाराज यांच्याकडे गुरुचरणीं अर्पण केली. त्यामुळे श्री चिन्मयमूर्ती मठाधिपतींच्या अखत्यारीतच दोन्हीही मठांचे संपूर्ण व्यवस्थापन, उत्सव, दैनंदिन कार्यक्रम पार पाडले जातात. विद्यमान मठाधिपती श्री माधवानंद महाराजांनी उमरखेड, येहळेगाव मठांसह संस्थानच्या अधिन असलेल्या सर्वच मठ, मंदिरांचा जिर्णोद्धार करून कायापालट केला आहे. या मठांमध्ये भक्तांसाठी निःशुल्क भोजनप्रसाद आणि निवासाची उत्तम व्यवस्था केलेली आहे. मठातील नित्य, नैमित्तिक पूजनअर्चन, निवास, भोजन प्रसादाशिवाय वार्षिक उत्सव, महोत्सव , शेतीवाडी आदी पाहण्यासाठी सेवाधारी मंडळी आहेत. येथील प्रमुख हे दिवाणजी आहेत. येथे दर महिन्याच्या एकादशीला आणि दर सोमवारी नियमाने वाऱ्या करणारे हजारो भक्त आहेत. येथील उत्सवांनाही भक्त मोठी गर्दी करतात.
वैशिष्ट्यपूर्ण नैवद्य
येहळेगाव येथील १५ ते २० नांगरे कुटुंबियांच्या घरची पहिली भाकरी किंवा पोळी, भाजी, ठेचा, चटणी किंवा तूप-साखरेचा नैवेद्य सकाळी मठात येतो. तसेच गाय किंवा म्हैस व्यायल्यास पहिले दूध (खरवस) मठाला अर्पण केले जाते. पंचक्रोशीतील भाविक, भक्त मंडळी आपल्या शेतातील उत्पादित झालेल्या शेतमालाचा काही भाग नियमाने दरवर्षी श्री तुकामाईंच्या चरणी अर्पण करतात. मठात भगवंताचे नामस्मरण, भजन, कीर्तन, पूजनअर्चन, विवेकसिंधु , ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोध पठण आणि मोठ्या प्रमाणावर अन्नदान अखंडपणे सुरू असते. जनतेला सन्मार्गाला लावणाऱ्या श्री तुकारामचैतन्य ऊर्फ तुकामाई यांना पुण्यतिथीनिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन.
Happy to read detailed information. Wish to visit yehalegaon