पालखी सोहळ्याचे जनक
तपोनिधी नारायण महाराज
आज श्रावण शुदध चतुर्थी. पंढरपूरला जाणाऱ्या पायी पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी श्री नारायण महाराज देहूकर यांची पुण्यतिथी.
– ह. भ. प. प्रशांत महाराज मोरे, देहू
तपोनिधी नारायण महाराज देहूकर हे संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव. त्यांचा जन्म तुकोबांच्या सदेह वैकुंठगमनानंतर तीनचार महिन्यांनी मातोश्री जिजाबाई यांच्या पोटी झाला. अर्थातच नारायण महाराज यांना त्यांचे वडील तुकोबांचे प्रेम आणि सहवास लाभला नाही. तुकयाबंधु कान्होबाराय यांनी त्यांचा खूप प्रेमाने सांभाळ केला.
विश्वंभर बाबा हे या घराण्याचे मूळपुरुष. त्यांच्याही आधीपासून घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा अखंड चालू होती. महिपती लिखीत तुकोबांच्या चरित्रातही हे नमूद आहे. विश्वंभर बाबांच्या आई त्यांना म्हणतात –
तुझ्या वडिलो वडिली।
निर्धारी चालविली पंढरीची वारी।।
त्याशी सर्वथा अंतर न करी।
तरीच संसारी सुफळपण।।
याच विश्वंभर बाबांनी सर्वात प्रथम एकत्रित विठ्ठल रखुमाईच्या स्वयंभू मूर्तींची स्थापना आपल्या वाड्यात केली. त्यांच्या पूर्वजांपासून चालू असलेली पंढरीची वारी तुकोबांनी दिंडी सोहळ्याच्या स्वरूपात त्यांचे चौदा टाळकरी आणि काही वारकऱ्यांच्या समवेत अखंड चालू ठेवली.
पंढरीची वारी आहे माझे घरी।
आणिक न करी तीर्थव्रत॥
तुकोबांच्या सदेह वैकुंठगमनानंतर कान्होबारायांनी आणि तुकोबांचे पुत्र महादेवबुवा, विठ्ठलबुवा यांनी हा पंढरीला जाणारा दिंडी सोहळा अखंडपणे सुरू ठेवला. परंतू वृद्धापकाळामुळे तुकयाबंधु कान्होबारायांनी या वारीची धुरा तुकोबांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराजांकडे सोपविली. तेही काही वारकऱ्यांसमवेत पंढरीची वारी करू लागले. काही वर्षांनंतर त्यांना मनोमन वाटू लागले, की या वारीत आपल्यासोबत भागवत धर्माचा पाया घातलेले ज्ञानोबा माऊली आणि भागवत धर्माचे कळस ठरलेले तुकोबाराय असतील, तर पंढरीची वारी अधिक परिपूर्ण आणि भक्तीरसपूर्ण होईल. हे श्वास आणि उच्छवास बरोबर असतील, तर या जीवनाचे सार्थक होईल.
या अनुषंगाने नारायण महाराजांनी १६८५मध्ये जेष्ठ वद्य सप्तमी या दिवशी पालखी सोहळा चालू केला. देहूत संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत घेऊन ते आळंदीला जात. तेथे माऊलींच्या पादुका पालखीत विराजमान करीत. अशा प्रकारे एकाच पालखीत जगद्गुरू तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन हा पालखी सोहळा पंढरपूरला मार्गस्थ होई. नारायण महाराज सोहळ्यात कीर्तन भजन करत. ।।ज्ञानबातुकाराम।। हा आज वारकरी सांप्रदायात सुरू असलेला भाव भक्तीचा गजर नारायण महाराजांनीच सुरू केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १६८० मध्ये झालेल्या निधनानंतर औरंगजेब आपले काही लाख मुघल सैनिक घेऊन महाराष्ट्रात पाय रोऊन बसला होता. त्याने येथे उच्छादाच्या परिसीमा पार केल्या होत्या. अशा काळात नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू करून वारकरी सांप्रदयात मोठे धाडसाचे पाऊल उचलले होते. छत्रपती संभाजी महाराज हे नेहमी देहूला दर्शनाला येत. त्यामुळे त्यांचे नारायण महाराजांशी जिव्हाळ्याचे नाते होते. छ्त्रपती संभाजी महाराजांनी या पालखी सोहळ्यास मुघलांचा काही उपद्रव होऊ नये म्हणून संरक्षण प्रदान केले होते. धर्मवीर संभाजी महाराजांच्या १६८९ च्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी हे संरक्षण पुढे चालू ठेवले होते.
या रे या रे लहान थोर। याति भलते नारीनर॥ अशा प्रकारे सकल वारकरी सांप्रदायाला, सर्व जाती पातींना, लहान थोरांना आणि स्त्री- पुरुषांना हवा हवासा वाटणारा भक्तीचा परमोच्च आनंद देणारा पालखी सोहळा नारायण महाराजांनी सुरू करून अखिल जगतामध्ये इतिहास घडवला. वारकरी सांप्रदयातील शेवटचे संत पिंपळनेरचे संत निळोबाराय यांनाही नारायण महाराजांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले. थोडयाच कालावधीमध्ये त्यांच्या योगदानामुळे ते वारकरी सांप्रदायातील सकल वैष्णवांना जीव की प्राण वाटू लागले.
सकल वैष्णवा वाटे जीव प्राण। तो नारायण देहूकर॥ अशा परम पवित्र, संत तपोनिधी उपाधी पात्र, तुकोबा पुत्र नारायण महाराज देहूकर या थोर विभूतीस नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन!🙏 💐 मस्तक हे पायावरी। या वारकरी संताच्या॥ राम कृष्ण हरी🙏