संतांनी मानवतेच्या विचारांचं मंदिर उभारलं. त्याचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला, तर त्यावर कळस चढवला, संत तुकाराम महाराजांनी!
या वारकरी परंपरेला आणि एकूणच माणुसकी जपणाऱ्या विचार परंपरेला उजाळा देण्यासाठी
।।ज्ञानबातुकाराम।। या वार्षिक अंकाची सुरुवात करण्यात आली आहे.
१ जानेवारी २०२२ रोजी तुकोबारायांची तपोभूमी भामचंद्र डोंगर येथे या वार्षिकाच्या ‘बा तुकोबा’ या संत तुकाराम महाराजांवरील अंकाचं प्रकाशन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झालं.
संतविचारांच्या प्रसारासाठी व्यासपीठ म्हणून लवकरच www.dnyanbatukaram.com वेबसाईट लाँच होत आहे.
त्यानिमित्तानं संतांचे मानवतेचे विचार समाजात पोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती, संस्था यांच्याविषयीची माहिती देणारी ही दैनंदिनी…
सविस्तर माहितीसाठी आपण कृपया वेबसाईटला भेट द्यावी ही विनंती.🙏
दिनविशेष – दिनांक : २९ जानेवारी २०२२
अष्टगंध लावण्याची परंपरा सुरू करणारे
श्री संत बाळाभाऊ महाराज पितळे
मेहकर जि. बुलढाणा येथील संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे अर्थात श्वासानंद महाराज यांचा आज प्रणव अवतार महोत्सव. संत श्री बाळाभाऊ महाराज यांचा जन्म सन १८८८ मध्ये मेहकर येथे झाला. पंढरपूरला जाणारी पहिली दिंडी संत श्री बाळाभाऊ महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन, समरसता, दिंड्या, धर्मशुद्धी, गायत्री मंत्र सर्वांसाठी खुला करणे, नामसप्ताह यात पुढाकार घेतला.
वारकरी संप्रदायात अष्टगंध लावण्याची परंपरा संत श्री बाळाभाऊ महाराज यांनी सुरू केली. त्यांनी ज्ञानमंदिर हंस संप्रदायाचे गुरुपीठ स्थापन केले, असे संत श्री बाळाभाऊ महाराज यांचे ४ थे वंशज प्रा. डॉ. श्रीहरी पितळे यांनी सांगितले. संत श्री बाळाभाऊ महाराज यांना न्हावा, जि. जालना येथील आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराज यांची गुरुदीक्षा मिळाली. गुरुदीक्षा मिळाल्यानंतर संत श्री बाळाभाऊ महाराज यांनी नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा त्रिवेणी संगम असणारा हंस संप्रदाय रूढ केला.
४१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी शेकडो नामसप्ताह यज्ञ सोहळे आयोजित करून प्रत्येक चातुर्मासात पंढरपूरची पायी वारी हजारो वारकऱ्यांना घडवली. समाज परिवर्तनासाठी संत श्री बाळाभाऊ महाराज यांनी लक्षणीय कार्य केले. त्यांनी वाराणसी अर्थात काशी येथे १९३० मध्ये संजीवन समाधी घेतली. ज्ञानमंदिर परिसर मेहकर येथून प्रस्थान ठेवणारी पितळे महाराजांची दिंडी विदर्भातील ही पहिली दिंडी असून यात जवळपास शंभर वारकऱ्यांचा समावेश असतो. ही दिंडी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूर येथे पोहचते, असे प्रा. डॉ. श्रीहरी पितळे यांनी सांगितले.
विद्यमान हंस संप्रदायाच्या गुरूपीठाच्या गादीवर ॲड. रंगनाथ महाराज पितळे ऊर्फ बाबासाहेब हे विराजमान आहेत. महोत्सवामध्ये तीन दिवस, कीर्तन, प्रवचन तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाप्रसाद म्हणून गहू आणि गुळाची खीर दिली जाते.
#ज्ञानबातुकाराम
अधिक माहितीसाठी फेसबुक, यूट्युब, इन्स्टाग्रामवर, फॉलो करा.
https://www.facebook.com/dnyanbatukaram
https://www.youtube.com/channel/UCkQfL3iREr9-B6oQ6QQsoRQ
https://www.instagram.com/dnyanabatukaram/