पालखीच्या प्रस्थानापासून ते
आळंदीत परतेपर्यंतचा प्रवास
‘पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत’ या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंभरबाबा हे देखील वारी करत होते, तसेच संत ज्ञानेश्वरांचे पणजोबा त्र्यंबकपंत हे देखील पंढरपूरची वारी करत होते. वारीची पंरपरा ही अनादी काळापासून सुरू आहे.
– राजाभाऊ चोपदार
नंतरच्या काळात संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत चोखोबाराय, संत गोरोबा काका, संत मुक्ताबाई आदी सर्व संत मांदियाळीने पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये क्रांती केली. त्या काळी वेदप्रामाण्यानुसार ज्ञानग्रहण, ज्ञानदान करण्याचा अधिकार स्त्री-शूद्रांना नव्हता. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवदगीता प्राकृत अर्थात मराठीमध्ये सांगितली. त्यातून ज्ञानार्जन, ज्ञानग्रहण, ज्ञानदानाचा अधिकार सर्व समाजाला दिला. सर्व संत मांदियाळीनं समतेचं प्रतीक असणारा पंढरपूरचा पांडुरंग हे आराध्यदैवत मानलं. ज्ञानेश्वरी, संत नामदेवांची गाथा असेल, एकनाथ महाराज यांचे भागवत असेल किंवा तुकोबांची गाथा असेल, या सर्व ग्रंथाला प्रमाण मानून सर्व वारकरी संप्रदायाची रचना होत गेली.
तपोनिधी नारायण महाराजांचे कार्य
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।।
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।
असा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहून ठेवला आहे. त्यात नामदेवराय महाराजांपासून सर्व संतांच्या योगदानाचा उल्लेख आहे. हे भागवत धर्मरुपी मंदिर सर्वांच्या माध्यमातून बांधलं गेलं. तुकोबारायांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी संतांच्या पादुका पालखीत घालून नेण्याचा प्रघात सर्वप्रथम सुरू केला. ते तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन आळंदीला येत असत. सोबत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन एकत्रित सोहळा स्वरूपात जाण्याची पंरपरा त्यांनी सुरू केली. पायी वारीची परंपरा ही त्या अगोदरपासूनची आहे. पायी वारीला सोहळ्याचे स्वरूप नारायण महाराजांनी दिले. नारायण महाराजांच्या पश्चात पुन्हा श्री गुरू हैबतबाबांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार आजच्या माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वरूप दिसून येते. १८३५ पासून सुरू झालेली ही परंपरा आज वैभवाला पोहोचली आहे.
हैबतराव बाबांचा पुढाकार
श्री हैबतबाबा पूर्वी शिंदे सरकारच्या पदरी सरदार म्हणून कार्यरत होते. विरक्ती येऊन ते आळंदीला आले आणि त्यांनी माऊलींचा सोहळा सुरू केला. सोहळा सुरू केल्यानंतर हैबतबाबा यांनी शिंदे सरकारकडे या सोहळ्याला संरक्षणासाठी राजाश्रय देण्याची विनंती केली. कारण पूर्वी वाटेतील वारकर्यांवर भिल्लाच्या टोळ्यांकडून आक्रमण होत असे. त्यादृष्टीने राजाश्रय असावा असा आग्रह धरल्यानंतर शिंदे सरकारांनी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अंकली गावचे त्यांचे जावई श्रीमंत शितोळे सरदार यांना माऊलींच्या सोहळ्याला राजाश्रय देण्यास सुचविले. तेव्हापासून देवाचा तंबू, नैवद्याची व्यवस्था, जरी पटका, दोन अश्व, हत्ती आदी सर्व व्यवस्था शितोळे सरकारांनी केली. आज हत्ती वगळता सर्व काही व्यवस्था आजतागायत शितोळे सरकारकडून होते. शितोळे सरकारांचे अश्व माऊलींच्या सेवेसाठी अंकलीपासून पायी आळंदीला येतात. माऊलींचे प्रस्थान आळंदीतून ज्येष्ठ वद्य अष्टमीला होते. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सप्तमीला हे अश्व आळंदीला पोहोचतात आणि प्रस्थानाची लगबग सुरू होते.
अशी आहे ‘प्रस्थाना’ची प्रक्रिया
ज्येष्ठ वद्य अष्टमीला दुपारी चार वाजता पालखीचे प्रस्थान होते. पूर्वी प्रस्थानाअगोदर सर्व दिंड्यांना मंदिरात प्रवेश मिळत असे. परंतु कालानुरूप समाज वाढत गेला, परिणामी मंदिराची जागा अपुरी पडू लागल्याने सर्वांना प्रवेश मिळणे अशक्य होऊ लागले. त्यामुळे काही वर्षांपासून पुढच्या २७ आणि मागील २० दिंड्यांना प्रस्थानाच्या वेळी मंदिरात प्रवेश देण्यात येतो. उरलेल्या दिंड्या बाहेर क्रमाने थांबत असतात. पुढील आणि मागील दिंड्या मंदिराबाहेर पडतील, त्यानुसार या दिंड्या मंदिरात प्रवेश करतात. प्रदक्षिणा करून आपापल्या ठिकाणी जातात. चोपदार दिंड्यांना शिस्तबद्धपणे आत सोडतात. त्यानंतर श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अश्वांना निमंत्रित केले जाते. नंतर शितोळे सरकार, निंबाळकर सरकार, शिंदे सरकार यांना सन्मानाने निमंत्रित केले जाते. हैबतबाबांच्या ओवरीत स्थानापन्न केले जाते. तिथून त्या सर्वांना निमंत्रित करून समाधीजवळ नेले जाते. समाधीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम हैबतबाबांच्या प्रतिनिधींकडून माऊलींची आरती होते. संस्थानाच्या विश्वस्तांच्या वतीने आरती होते आणि संस्थानाच्या विश्वस्तांचे प्रतिनिधी माऊलींच्या पादुका हैबतबाबांचे प्रतिनिधी किंवा शितोळे सरकारच्या ताब्यात दिल्या जातात. त्या वीणामंडपात स्थानापन्न केल्यानंतर सर्व मानकर्यांना मानाचे श्रीफळ हैबतबाबांच्या प्रतिनिधीच्या वतीने दिले जाते. त्यानंतर आरती होते. मग पालखी ।।ज्ञानबातुकाराम।।च्या गजरात निघते.
वारीचा मार्ग शेकडो वर्षांचा
मंदिर प्रदक्षिणा करताना सिद्धेश्वर मंदिरातील सिद्धेश्वराचा निरोप घेऊन पालखी पुढे निघते. (सिद्धेश्वर मंदिर हे पूर्वीपासून येथे आहे. माऊलींच्या आईवडिलांनी या सिद्धेश्वराची सेवा केलेली आहे.) सिद्धेश्वराचा मंदिर जो कळस आहे, तो निरोपासाठी हलतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे, सर्वजण तो पाहण्यासाठी मंदिरामध्ये गर्दी करतात. सिद्धेश्वराचा निरोप घेतल्यानंतर पालखी पुढे निघते. सर्वप्रथम पहिल्या दिवशी आजोळघरी म्हणजे गांधीवाडा येथे पालखीचा पहिला मुक्काम असते. मग दसऱ्या दिवशी पालखी पुण्याकडे निघते. पुण्यामध्ये दोन दिवस पालखीचा मुक्काम असतो. नंतर मग दिवे घाटमार्गे पालखी एकादशीच्या दिवशी सासवडला जाते. सासवडला दोन दिवस मुक्काम होतो.
त्यानंतर जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी असा मजल दरमजल मुक्काम करत पालखी आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूरला पोहोचते. हा मार्ग वर्षानुवर्षांचा आहे. त्यात काही बदलदेखील झाले आहेत. पूर्वी नीरा नदीवर पूल नव्हता. तेव्हा ही पालखी शिरवळमार्गे लोणंदला जात असे. परंतु नीरा नदीवर वाल्ह्याचे अभियंता कृष्णराव मांडके यांनी त्याकाळी श्रद्धेपोटी पूल बांधला. अजूनही तो जुना पूल म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या मांडके घराण्याला पालखीला पंखा हलविण्याचा मान दिला गेला आहे. पालखीतील मान हे ज्यांनी त्यांनी त्या त्या वेळेला दिलेल्या योगदानानुसार त्यांच्या सेवा लक्षात घेऊन निर्माण झाले आहेत.
पालखी सोहळ्यासोबत सासवड पासून ते वाखरीपर्यंत, पंढरपुरामध्ये ठरलेली मानाची कीर्तने असतात. ही कीर्तने, जागरांची परंपरा पूर्वांपार चालत आलेली आहे. माऊलीची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करते, त्यावेळी सर्व आळंदीकर पालखीला निरोप देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात. अनेक लोक हौसे-नवसे-गवसे प्रकारचे असतात. आळंदी ते पुणे दरम्यान चालणारे अनेकजण असतात. पहिल्या दिवशी तरी पालखी सोहळ्याचा आनंद घेऊ, असा त्यामागचा विचार असतो. असे अनेकजण अगदी सासवडपर्यंत चालत येतात. बाकी नियमाचे वारकरी असतात.
पालखी सोहळ्याच्या शिस्तीची प्रशंसा
पालखी सोहळ्यासोबत एक शिस्त आहे, जिला वारंवार अनेक लोक सलाम करतात. सोहळ्यातील लाखो लोकांचा जनसमुदाय कंट्रोल कसा होतो, वा त्याचे नियोजन कशा प्रकारे होतो, याची अनेकांना उत्सुकता असते. अनेक सुशिक्षित लोकांनादेखील त्याचे आश्चर्य वाटते. आपला एखादा छोटासा समारंभ करायचा असेल तरी आपली किती गडबड उडते. परंतु लाखोंचा जनसमुदाय पालखीबरोबर जातो, तो अगदी शिस्तीत. याला टीमवर्क असे म्हणता येईल. कारण प्रत्येकजण आपआपली सेवा ठरलेल्या हुकुमाप्रमाणे करतो. म्हणजे वीणेकरी विण्याची सेवा करतो. टाळकरी टाळ वाजवण्याची सेवा करतात. पखवाजे पखवाज वाजवण्याची सेवा करतात. तुळशीवाले, हंडेवाले,पताकावाले आपापली सेवा करतात. ट्रकवाले, आचारी, वाढपे, तंबू ठोकणारे, चोपदार, बैलवाले, घोडेवाले, विश्वस्त हे सर्वजण आपाआपली सेवा चोखपणे बजावतात. या सर्व टीमवर्कचा एकत्र परिपाक म्हणजे शिस्तीत चाललेला हा सोहळा आहे. याचे नियोजन आहे ते एखाद्या मिल्ट्रीच्या शिस्तीप्रमाणे चालते.
सकाळी बरोबर सहाला पालखी निघते. चोपदारांनी पुकारलेल्या वेळेनुसार पालखी निघणारच. पुढे चार पाच किलोमीटरवर सकाळचा विसावा असतो. त्यानंतर दुसरा विसावा म्हणजे भोजनाचा विसावा. तो साधारणपणे दोन तासांच्या आसपास असतो. दोन तासांच्या कालावधीत जेवण करून पुढे निघाले पाहिजे. त्यासाठी त्याच्या अगोदर ट्रक पोहोचले पाहिजेत. पाण्याचा टँकर पोहोचला पाहिजे. स्वयंपाक तयार झाला पाहिजे आणि आलेल्या वारकर्यांना जेऊ घालून ट्रक आपल्या पुढे गेला पाहिजे. ही सर्व कसरत असते. ही सर्व कसरत सर्व वारकरी लीलया पार करत असतात. दुपारचे जेवण झाल्यानंतर पालखी निघाल्यानंतर दुपारचा एक विसावा असतो. त्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी सोहळा सायंकाळी सहा ते सातच्या आसपास पोहोचतो.
समाज आरतीचे विलोभनीय दृश्य
मुक्कामाच्या ठिकाणी पालखी जेव्हा पोहोचते, त्या ठिकाणी समाज आरती असते. ते दृश्य अतिशय विलोभनीय असते. मधोमध पालखी आणि त्याभोवती गोलाकार स्वरुपात सर्व दिंड्या उभ्या असतात. सायंकाळच्या वेळी भोवती सर्व लोक ।।ज्ञानबातुकाराम।।चा गजर करत असतात. सर्व मानकरी आपापल्या ठिकाणी उभे असतात. माऊलींच्या चोपदारांनी आपला चांदीचा चोप वर उंचावून होSSSS अशी ललकारी दिली, की सर्वत्र पिनड्रॉप शांतता होते. एवढी सारी शिस्त पाहून पोलिस अधिकारीसुद्धा तोंडात बोटे घालतात. कधी कधी एखाद्या दिंडीतून टाळ वाजत राहतो. तो तक्रारीचा टाळ असतो. चोपदार तेथे जाऊन त्यांची तक्रार ऐकून घेतात. त्या तक्रारीचे निराकरण लगेच होत असेल, तर ते केले जाते अन्यथा श्रीमंत शितोळे सरकारच्या पालावर बैठक बोलावली जाते. त्या बैठकीत त्याचे निराकरण केले जाते. त्यानंतर देवस्थानच्या तंबूत सर्व शासकीय अधिकार्यांसमवेत बैठक होते. दुसर्या दिवशीचे नियोजन काय आहे, या संदर्भात सर्व चर्चा होतात. त्याबरहुकूम सर्व नियोजन ठरते. त्यानंतर संध्याकाळी धूपारती होते. धूपारती झाल्यानंतर जागर होतो. जागरानंतर पहाटे माऊलींचा पवमान अभिषेक होतो. त्यानंतर श्रीमंत शितोळे सरकारच्या वतीने नैवद्य दाखवला जातो. त्यानंतर तीन कर्णे होतात. नंतर पालखीचे प्रस्थान होते. कर्णेकऱ्यांचाही एक मान आहे. चोपदार सांगतील तेव्हाच कर्णा वाजविला जातो. विसाव्याच्या ठिकाणी असेल, वा अन्य ठिकाणी कर्णा केल्यानंतरच पालखी थांबते वा, प्रस्थानास निघते. ही सर्व शिस्त अनुभवण्यासारखी, पाहण्यासारखी असते.
पालखीतील दिंड्याचा क्रम ठरलेला
पालखीतील दिंड्याचाही क्रम ठरलेला आहे. रथ मध्यभागी असतो. रथापासून पुढे २७ दिंड्या आहेत. १ ते २६ दिंड्या क्रमाने चालतात. त्यांच्यापुढे अश्व चालतात. अश्वांच्या पुढे २७ क्रमांकाची भोई समाजाची दिंडी चालत असते. आताच्या स्थितीत रथाच्या मागे २५१ दिंड्या आणि क्रमांक न दिलेल्या साधारण १५० दिंड्या अशा सुमारे ४०० दिंड्या पुढे २७ अशा ४२५ दिंड्या सोहळ्याबरोबर चालतात. सोबत हजारो ट्रक, इतर छोटी मोठी वाहने चालतात. मुक्कामाच्या ठिकाणी जेव्हा चोपदार चोप उंचावून होऽऽऽ अशी ललकारी देतात, त्याचवेळी हरवलेल्या वस्तूंची यादी पुकारली जाते. त्यात सोन्याच्या वस्तूंपासून, घड्याळ, मोबाईल अशा कोणत्याही हरवलेल्या वस्तू सापडल्या असतील, तर त्या वारकरी चोपदारांकडे आणून देतात.
दिवसेंदिवस सोहळ्यात वारकरी वाढत आहेत. त्यामुळे नागरिक चुकण्याचे प्रमाणही वाढत आहे. बर्याचदा असे होते, की आपली दिंडी विसाव्याच्या ठिकाणी नेमकी कुठे उतरली आहे, हे लक्षात येत नाही. त्यामुळे आमचे वडील श्री चोपदार गुरुजी यांनी सुमारे जवळ जवळ १५ वर्षे अथक परिश्रम करून सर्व दिंड्यांची सूची बनवली. त्यात कुठली दिंडी कुठे उतरते, कुठल्या विसाव्याच्या ठिकाणी कुठे मुक्काम करते, त्याची नोंद केली. वारीदरम्यान आपल्या दिंडीपासून हरवलेल्या लोकांना त्यांच्या दिंडीजवळ पोहोचण्याचे काम स्वयंसेवक करतात. गेली अनेक वर्षे ते स्वयंसेवक त्या त्या गावचे आहेत. त्याचबरोबर बंदोबस्तासाठी सुमारे ५०० पोलीस वारीमध्ये सहभागी होत असतात. ते देखील सांगतात की, आम्हाला वारकर्यांना शिस्त लावावीच लागत नाही. वारकरी हे शिस्तीतच चालत असतात. आम्हाला फक्त वाहनांच्या शिस्तीसाठी किंवा पालखीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या नियोजनासाठी कष्ट घ्यावे लागतात. चोपदारांनी वारकर्यांना सूचना केली, रस्त्याच्या बाजूने पाच पाचच्या लाईनने चाला, तर त्याप्रमाणेच सोहळ्यातील सर्व वारकरी अगदी घोड्यासहीत शिस्तीत चालतात. दिंड्यांचाही क्रम ठरलेला आहे. त्या क्रमानुसारच दिंड्या चालतात. सर्वात पुढे पताकाधारी असतात. त्यानंतर टाळकरी असतात. त्यात हंडाधारी आणि तुळशीवाल्या महिला असतात. वीणेकर्याच्या मागे महिला चालतात. महिलांच्या मागे मागच्या दिंडीचे पताकाधारी चालतात. एखादा माणूस दिंडीमधून रस्ता ओलांडत असेल, तर त्याला वारकरी अडवतात. खरे तर रस्ता ओलांडण्यासाठी पताकाधारींच्या पुढून जाण्यासाठी रस्ता दिला जातो. त्यासाठी मदतही केली जाते, मात्र मधोमध कुणालाही रस्ता ओलांडू दिला जात नाही. ही सोहळ्याची शिस्त नागरिकांना माहीत नसते. त्यामुळे वारकऱ्यांच्या वागण्याचे त्यांना आश्चर्य वाटते.
वारीमध्ये काळानुरूप बदल
वारीच्या स्वरुपात बदलत्या काळाप्रमाणे बदल होत आहेत. सुरुवातीच्या काळात बैलगाड्यासह वारी होत होती. चुलीवर स्वयंपाक व्हायचा. आता बैलगाड्यांची जागा ट्रक्सनी घेतलेली आहे. मधल्या काळात लाकडी जळणावर चालणाऱ्या चुली जाऊन रॉकेलवर स्वयंपाक होऊ लागला. आता स्वयंपाक गॅसवर होतो. वारीदरम्यान पूर्वीच्या काळी रात्रीच्या वेळी उजेडासाठी गॅसच्या बत्त्या वापरल्या जायच्या. आता त्याची जागा जनरेटर्सनी घेतली आहे. सुविधादेखील वाढत आहे. पूर्वी विहिरीचे पाणी शेंदून पाणी आणून स्वयंपाक करावे लागत होते. आता दिंड्यांबरोबर टँकर आहेत. शासनदेखील सोहळ्यादरम्यान २५ ते ३० टँकर पुरवते. पण स्वयंसेवी संस्थांचे सुमारे २०० टँकर वारीबरोबर असतात. शासनाच्या दोन अँम्ब्युलन्स आरोग्य विभागाच्या पालखीसोबत असतात. पण त्याचबरोबर वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थाच्या ५०-६० अँम्ब्युलन्स असतात. त्यामुळे शासनासोबतच अनेक स्वयंसेवी संस्था, लोक स्वयंस्फूर्तीने वारीबरोबर मदत करण्यासाठी सज्ज असतात.
दिंड्यांना लोकाश्रयाचा आधार
हा सर्व सोहळा लोकाश्रयावर होत असतो. प्रवासात आपण बाहेर लॉजवर राहलो तर, दिवसाला किमान एक हजारांचा खर्च येतो. हा 20 दिवसांचा लाखो लोकांच्या राहण्याचा खर्च भागविण्यासाठी आम्ही कॉन्ट्रीब्युशन घेतो, ज्याला वारकरी भिशी म्हणतात. ती एक हजारांपासून ते २० हजारांपर्यंत असते. त्यातूनच हा २० दिवसांचा खर्च भागवला जातो. त्यात संपूर्ण खर्च भागेल असे नाही. काही ठिकाणी लोकाश्रयही मिळतो. कुणी पंगत, कुणी नाश्ता अशा स्वरूपात मिळणार्या लोकाश्रयावर ही वारी पूर्ण होते. यात जात, धर्म, वंश भेद काही चालत नाही. सर्व जण एकोप्याने चालतात. महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील लोकही वारी सोहळ्यात येत असतात. आजकालच्या युगामध्ये कमीत कमी साधनांत जीवन कसे जगावे, हे शिकायचे असेल, तर वारीत येऊन पाहावे. वारी ही म्हातारपणी करावयाचा विषय नसून तरुणपणातच करण्याची गोष्ट आहे. अनेक लोक म्हणतात, चार तासांत आम्ही पंढरपूरला जाऊ शकत असू, तर १८ दिवस वाया का घालवायचे? तर, आपल्याला पंढरपुरात जाऊन देवाची भेट घ्यायची असते. आपल्याला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची असेल, तर कुणी तरी माध्यम निवडावे लागते. तिथे आपल्या कुणी ओळखीचे आहे का, सचिव ओळखीचे आहेत का, स्थानिक कुणी आमदार आहेत का, त्यांच्यामार्फत आपल्याला वेळ घ्यावी लागते आणि त्यांच्या वेळेत आपल्याला भेटायला जावे लागते. देवाला भेटायला जायचे असेल, तर त्याचे माध्यम आहेत संत. या संतांच्या सोबत आपल्याला जायचे असते.
काया, वाचा, मनाचे तप
दुसरी गोष्ट, आम्ही जे पायी चालत जातो त्याचा उद्देश कायिक, वाचिक, मानसिक तप झाले पाहिजे, असाही असतो. काया म्हणजे शरीर, वाचिक म्हणजे मुख आणि मानसिक म्हणजे मनाने. कायिक असते म्हणजे काय, तर आपण पायी चालत जातो त्याला कायिक तप म्हटले जाते. वाचिक म्हणजे भगवंताचे नाम सतत आपल्या मुखात राहिले पाहिजे आणि मानसिक तप म्हणजे इतर कुठलाही विचार न करता भगवंताचा विचार करत गेले पाहिजे. अशा अवस्थेत जर गेलो तर, आपला भगवंत निश्चित भेटणार. मग त्या मूर्तीचे दर्शन करा अथवा नका करू. पंढरपूरला गेल्यावर सर्वांचे दर्शन होतेच असे नाही. काहींना चरणस्पर्श दर्शन होते, काहींना मुखदर्शन होते, काही कळस, भूमीचे दर्शन घेतात. काहीजण फक्त चंद्रभागेचे स्नान करून धन्यता मानतात. हा आनंद वर्णन करून कोणाला समजणार नाही. त्यासाठी त्याची अनुभूती घेणे गरजेच आहे.
तरुणांनी यात आवर्जून आले पाहिजे, असे मला वाटते. या ठिकाणी स्त्री-पुरुष भेद देखील नाहीसा होतो. एवढा मोठा जनसमुदाय या वारीत असतो, त्यांच्यासाठी लागणारी शौचालयाची पुरेशी व्यवस्था होत नाही. त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या मोकळ्या जागांचा उपयोग जरी स्त्री आणि पुरुष दोघेही शौचालयासाठी करत असले तरी, त्यांच्याबाबती कधी आजपर्यंत दुर्घटना घडलेली नाही. कारण वारी करणार्या प्रत्येक माणसाच्या मनात तशी इच्छाच होत नाही. हा सगळा संतविचारांचा प्रभाव आहे. माणूस वारीला स्वच्छ मनाने जातो. वारीत लहान-मोठा भेद राहत नाही. ‘पाया पडे जन एकमेकां’.
वारी करणाऱ्याला प्रतिष्ठा
वारीत अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. ग्रामीण आणि शहरी जीवनाचा मिलाफ वारीत दिसतो. अनेक भाविक वारकर्यांना शोधत येतात. त्यांना घरी घेऊन जाऊन प्रसाद घेण्याचा आग्रह धरतात. अगदी एखादा वारकरी वारी करून आपल्या गावी परत गेला, तर त्याच्याकडून आणलेला प्रसाद घेऊन अगदी देवाप्रमाणे त्या व्यक्तीला मान देतात. त्याचा सन्मान करतात. अशा पद्धतीने वारी करणार्यालाही प्रतिष्ठा मिळते. शिक्षक आणि वारकरी हे दोन लोक कधी खोटे बोलणार नाहीत, अशी समाजाची अजूनतरी
धारणा आहे. त्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने अनेक लोक वारकरी पोशाखात येतात. साहजिकच वारकर्यांची बदनामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे खरा वारकरी कोणता हे ओळखता आले पाहिजे. त्याचा भाव पाहिला पाहिजे. अनेक जण पायी चालणे आम्हाला होईल का नाही, असा विचार करतात. परंतु आपण वारीकडे पाहिले तर, अनेक ज्येष्ठ नागरिक मैलोन् मैल चालताना दिसतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. आम्ही गंमतीने म्हणतो, तुम्ही वारीच्या वाटेवर नुसते उभे राहिलात, तरी वारकरी तुम्हाला ढकलत ढकलत पंढरपूरपर्यंत घेऊन जातील.
उभे रिंगण आणि गोल रिंगण
पालखी सोहळ्यात रिंगण असा एक प्रकार असतो. रिंगणे दोन प्रकारची आहेत. गोल रिंगण आणि उभे रिंगण. उभी रिंगणे पालखीबरोबर तीन होतात. लोणंद ते तरडगाव यांच्यामध्ये चांदोबाचा लिंब या ठिकाणी, त्यानंतर बाजीरावाची विहीर या ठिकाणी आणि पंढरपूर येथील पादुकांजवळ. अशी तीन उभी रिंगणे रस्त्याच्या मधोमध होतात. मधोमध सर्व सोहळा उभा राहतो. सर्व वारकऱ्यांना चोपदारांनी इशारा केल्यानंतर दोन्ही बाजूला वारकरी उभे राहतात आणि मग मधून अश्व सोडले जातात. ते अश्व पालखीला उजवी घालून परत येतात, पालखीचे दर्शन घेतात, तिथे अश्वाचा सन्मान केला जातो. ते पुन्हा पुढे येतात आणि मग उडी किंवा आरती होते. त्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ होतो. याच प्रकारे वाटेत चार गोल रिंगणे होतात. पहिले गोल रिंगण सदाशिव नगर किंवा पुरंदावडे या ठिकाणी होते.
दुसरे खडूस फाटा या ठिकाणी होते. तिसरे ठाकूरबुवांची समाधी येथे होते आणि चौथे सर्वात मोठे असणारे गोल रिंगण वाखरीत बाजीरावाची विहीर या ठिकाणी होते. या गोल रिंगणाची रचना अशी असते की, सर्वात मधोमध पालखी ठेवली जाते. पालखीच्या भोवती पताका धारकांचे कडे केले जाते. पताकाधारकांच्या कड्याच्या बाहेर तोंड करून बसलेले प्रेक्षक असतात. त्याच्या बाहेर घोडे पळण्यासाठी मोकळा ट्रॅक असतो. त्याच्या पाठीमागे आतमध्ये तोंड करून प्रेक्षक बसलेले असतात. सर्वात बाहेरच्या बाजूला सर्व दिंड्या गोलाकार रीतीने उभ्या राहून आपापल्या ठिकाणी भजन, वेगवेगळे खेळ करत असतात. या रिंगणामध्ये प्रत्येक घटकाला माऊलींन अभिवादन करण्याचा अधिकार दिलेला आहे.
यामध्ये हंडेवाले, तुळशीवाल्या महिला असतात. त्या पालखीभोवती प्रदक्षिणा मारतात. त्यानंतर अश्वदेखील प्रदक्षिणा मारतात. दिंड्यादेखील बाहेरून प्रदक्षिणा मारतात आणि भोपळे दिंडीचा एक मानाचा जरी पटका असतो त्याला चोपदारांनी इशारा केल्यानंतर ते तीन फेर्या मारतात. त्यानंतर अश्व धावण्यासाठी सोडले जातात. अश्वांनी तीन फेर्या मारून रिंगण पूर्ण केले, की रिंगणाची त्या ठिकाणी समाप्ती होते. रिंगणानंतर उडीचा कार्यक्रम होतो. तो उडीचा कार्यक्रम देखील अतिशय पाहण्यासारखा होतो. चोपदारांनी निमंत्रण दिलेल्या सर्व दिंड्यांमधील टाळकरी, वीणेकरी, पखवाजवादक, हंडेवाले, तुळशीवृंदावनधारी महिला पालखीजवळ जमतात. नंतर सर्वजण बसून तालावर भजन करतात आणि तो नादब्रह्म अनुभवण्यासाठी त्याठिकाणीच उपस्थित राहणे गरजेचे आहे. हल्ली याचा व्हिडिओ घेण्यासाठी गर्दी होते. रिंगणानंतर पालखी पुढे निघते.
वाखरीत पालख्यांची मांदियाळी
वाखरीतच महाराष्ट्रभरातून आलेल्या पालख्या एकत्र येतात. सर्व मानाच्या पालख्या ठरलेल्या क्रमानेच पंढरपुरात प्रवेश करतात. मानाच्या सात पालख्या मानल्या जातात. त्यामध्ये सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे. इतर सर्व पालख्यांना माऊलींनी पुढे घालायचे आणि सर्वात शेवटी आपण पंढरपुरात प्रवेश करायचा, अशी परंपरा आहे. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका आणि संत नामदेव महाराज सर्वात पुढे असतात. नामदेव महाराजांची पालखी सात नंबरला असते. ती पंढरपुरातच असते. पंढरपुरातून या सर्व संताना नेण्यासाठी ती सामोरी येते. सर्व पालख्या या क्रमाने बरोबर लागल्यानंतर चोपदार जाऊन नामदेवरांयाना निरोप देतात. नामदेवरायांची पालखी निघाली, की क्रमाक्रमाने सर्व पालख्या तिथून पुढे निघतात. पंढरपुरामध्ये पोहोचण्यासाठी जवळपास रात्रच होते.
मग दुसर्या दिवशी एकादशीला नगरप्रदक्षिणा होते. द्वादशीला बारस सोडल्यानंतर बहुसंख्य वारकरी आपापल्या गावी परततात. परंतु जे नियमाचे वारकरी असतात, ते काला झाल्याशिवाय परतत नाहीत. काला पौर्णिमेला असतो. पादुकांचे पौर्णिमेला आणि एकादशीला नगर प्रदक्षिणेच्या वेळी चंद्रभागा स्नान होते. काल्याच्या दिवशी चंद्रभागा स्नान, नंतर पांडुरंगाची भेट होते. त्यानंतर मग गोपाळपुरात काला होतो. काला करून पालखी दुपारी येते आणि मग दुपारी चारनंतर परतीचा प्रवास सुरू होतो. परतवारीला केवळ हजार ते बाराशे लोक माऊलींच्या पालखीसोबत असतात. आषाढ वद्य दशमीला पालखी आळंदीला पोहोचते. आषाढ वद्य एकादशीला नगरप्रदक्षिणा होऊन वारीची सांगता होते. बारस सोडून सर्व वारकरी आपापल्या गावी परतात…
सेवा आणि मानकरी
माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये विविध मानकरी आहेत. ज्या हैबतबाबांनी पालखी सोहळा सुरू केला, त्यांचे वंशज-प्रतिनिधी आहेत. त्यांना आदराने मालक असे संबोधले जाते. त्यांचा मान असतो. चोपदार यांचादेखील वंशपरंपरागत सेवेचा मान आहे. देवाला चवरी ढाळण्याचा मानदेखील आळंदीतील कुऱ्हाडे कुटुंबाला आहे. नंतर अब्दागिरी वाहण्याचा मान मुरूम आळीला आहे. तसेच बैलांचा मानदेखील आळंदीकरांना आहे. आळंदीतील सहा-सात घराण्यांना आलटून पालटून दरवर्षी या सेवेचा मान मिळतो. त्यानंतर एक नंबर दिंडीमध्ये वासकर महाराजांचा देखील मोठा मान आहे. श्रीमंत शितोळे सरकार यांना देवाचा तंबू, नैवेद्याची व्यवस्था, जरीपटका, दोन अश्व ही सर्व व्यवस्था शितोळे सरकारांकडे असते. त्यांचा देखील त्या पद्धतीने मान आहे. त्यानंतर पालखीला खांदेकरी असतात, कर्णेकरी असतात. ते आपापली सेवा आपआपल्या पद्धतीने, वंशपरंपरेने बजावत असतात.
इतर राज्यांतील वारकरी
महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक वारकरी, दिंड्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. कर्नाटक, आंध्रप्रदेश, चेन्नई, गोवा, गुजरात या राज्यांतून वारकरी येत आहेत. अलिकडच्या काळात पानिपतच्या युद्धादरम्यान जे आपले मराठा बांधव त्या ठिकाणी स्थायिक झाले, त्यांचे वशंजही आता वारीत सहभागी होण्यासाठी येतात.
फड परंपरा कशी असते?
वारीमध्ये भजन करत चालणाऱ्या वारकऱ्यांचा जो समूह असतो, त्याला दिंडी म्हणतात. अशा दिंड्या केवळ वारीपुरत्या असतात. फड परंपरा मात्र वर्षभर वारकरी आचारधर्म पाळत असते. सर्व प्रकारच्या वाऱ्या नित्यनियमाने फड करत असतात. पंढरपूरची शुद्ध वारी असेल, तर दशमी, एकादशी, द्वादशी असे तीन दिवस फडावर कार्यक्रम असतात. वद्य वारीला आळंदीमध्ये कार्यक्रम असतात. त्यानंतर त्यांच्याकडे आषाढी वारीव्यतिरिक्त तुकाराम महाराज बीज, नाथ महाराजांची षष्ठी, पैठणची वारी, निवृत्तीनाथांची त्रंबकेश्वरची वारी, आरण भेंडी येथील सावता महाराजांची वारी, तेरढोकीची गोरोबा काकांची वारी, अशा विविध वार्या फडांतर्फे केल्या जातात. त्यामुळे फडांमधील वारकरी वर्षभर सर्व व्यस्त असतात. त्या त्या ठिकाणी आपल्या सेवा बजावत असतात. हे फडही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. वारकरी परंपरेतील प्रसिद्ध आजरेकरांचा फड अगदी लोकशाही पद्धतीने चालतो. या फडाचा उत्तराधिकारी मतदानाद्वारे निवडला जातो. कराडकर फडाला गुरुपरंपरा आहे. म्हणजे तेथे गुरुचा शिष्य गादीवर बसतो. वासकर महाराज, देहुकर महाराज यांच्या वंशपरंपरेच्या गाद्या आहेत.
वासकर, देहूकर किंवा आजरेकर फडावर माळकरी होऊ इच्छिणाऱ्याला महाराज माळ हातात घेऊन विचारतात, जामीनदार कोण? म्हणजे त्या फडाचा पूर्वपरंपरेचा जो माळकरी आहे, त्याला नव्या माळकऱ्यासाठी जामीन ठेवतात. कारण नवा माळकरी पुढे नित्यनेम पाळेल याची जबाबदारी त्याच्यावर राहते. महाराज पुढचा प्रश्न विचारतात, तू कुठली वारी करणार? म्हणजे आमच्याकडे १२ महिने वार्या असतात. तू सर्व कराव्यात अशी अपेक्षा नाही. कुठली एक वारी तू सांग. चैत्र वारी, वैशाख वारी, ज्येष्ठ वारी, आषाढ वारी यापैकी एक वारी नवोदित माळकरी सांंगतो आणि नंतर आयुष्यभरासाठी त्या वारीचा संकल्प करतो. मग महाराज सांगतात, राम कृष्ण हरी म्हण, हरीपाठ म्हण, मांसाहार, मद्यपान करणार नाही, असं वचन दे. असे सर्व झाल्यावर मगच माळ घातली जाते.
आषाढी वारीतील वारकऱ्यांची संख्या
आळंदीहून निघणाऱ्या माऊलींचा पालखी सोहळा सुमारे तीन लाख लोकांपासून सुरू होतो आणि पंढरपुरात जाईपर्यंत त्यातील भाविकांची संख्या पाच लाखांवर जाते. एवढीच संख्या इतर सर्व पालख्यांची मिळून असते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी नंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीत वारकरी मोठ्या संख्येने असतात. महाराष्ट्रातील सुमारे शंभरहून अधिक पालख्या पंढरपूरला नित्यनेमाने येत असतात. अगदी नागपूरकडील हरमानाची पालखी सर्वात दूरून येणारी पालखी आहे. गोव्यामधूनही दिंड्या येत आहेत. विदर्भातून येणारी गजानन महाराजांची पालखी शिस्तबद्ध असते. त्या पालखीतील वारकऱ्यांची संख्याही मर्यादीत ठेवली जाते. महाराष्ट्राच्या सर्वच भागांतून पालख्या पंढरपूरला येत असतात.
आषाढी व्यतिरिक्त इतरही वाऱ्या
सर्वच वारकरी आषाढी वारीला येतातच असे नाही. ते चैत्री वारी, माघ वारी, कार्तिक वारी अशा वेगवेगळ्या वार्यांना येतात. वारकरी हा मुख्यत्त्वे शेतकरी आहे. त्यामुळे शेतीचा हंगाम सांभाळून तो वारीला येतो. त्यामुळे कर्नाटक, कोकण, गोवा येथील वारकरी आपला कामाचा हंगाम सांभाळून वारीला येतो. कालानुरूप पंढरपूर शहरदेखील वाढते आहे. पंढरपूर शहराच्या लगत सुमारे १० किलोमीटरचा नवीन विकास आराखडा तयार होत आहे. चंद्रभागेच्या पलिकडच्या गावांमध्येही वारकरी मठाला वगैरे जागा घेत आहेत. त्यामुळे शहरातील गर्दीही हळूहळू कमी होत आहे. सरकारही नदीपलिकडील ६५ एकर जागा वारकऱ्यांसाठी विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.
वारीतील आद्य पत्रकार रंधवे गुरुजी
माझे वडील कृष्णराव रंधवे चोपदार गुरुजी हे वारीतले पहिले पत्रकार. ते आपले काम सांभाळून पेपरला बातम्या पाठवायचे. त्याकाळी पालखी सासवडवरून जेजुरीला गेली, ही बातमी पालखी लोणंद किंवा फलटणला गेल्यानंतर यायची. अशा पद्धतीने तीन-चार दिवसांनी त्या बातम्या येत असत. काही काळानंतर बातम्यांचा मजकूर एसटीने पाठवला जाऊ लागला. पुण्यात स्वारगेट एसटी स्टँडमधून पेपरच्या ऑफिसातील कुणीतरी या बातम्या घेण्यासाठी येई. वडिलांनी वारीत पेपर वितरणाचेही काम केले. आता टीव्ही, डिजिटलच्या जमान्यात बातम्या क्षणार्धात जगभर जातात. हल्लीच्या पत्रकारांकडून एकच अपेक्षा आहे, की त्यांनी वारीतल्या सकारात्मक बातम्यांवर भर द्यावा. या थोर संत परंपरेला कुठे बाधा पोहचेल, असे वार्तांकन करणे टाळावे, अशी विनंती आहे.
(छायाचित्रे : फेसबुक दिंडी, माऊली वैद्य)