बाबामहाराज यांच्या जाण्याने
कीर्तनातील सात्विकता हरपली
– समीर गायकवाड
‘माऊली ज्ञानेश्वर’ हे शब्द त्यांच्या वाणीमधून आले, की आणखी शोभिवंत वाटत, आशयघन वाटत! खेड्यापाड्यात गावाकडे त्यांचा हरिनाम सप्ताह असला, की बायाबापड्या डोळ्याला पदर लावून हमसून रडत असत. कारुण्य आणि भावोत्कटता हा त्यांच्या कीर्तनाचा आत्मा होता. कीर्तन प्रवचनादरम्यान ते जे दाखले देत, दृष्टांत सांगत असत ते ऐकताना समोरचे श्रोते भारावलेले असत.
कधी किंचित किनरा होणारा तर कधी तारसप्तकास पोहोचणारा स्वर ही त्यांच्या आवाजाची जादू होती. त्यांच्या कीर्तनात क्वचित नर्मविनोद असत, पण बाष्कळपणाला, पांचटपणाला तिथे थारा नसे. त्यांची स्वतःची अशी खास निरूपणाची शैली होती. त्यांचा वाद्यवृंद ही त्यांच्यासारखाच मृदू प्रकृतीचा असे. बोलण्यातलं माधुर्य, आवाजातला गोडवा, कीर्तनातली गेयता नि दाखले देतानाची तन्मयता यांचं एक अलौकिक मिश्रण होऊन जे काही साकार होई तो त्यांचा करिष्मा असे. त्यांच्या कीर्तन प्रवचनात छछोरपणा कधीही जाणवत नसे. धार्मिक अनुष्ठान नि अध्यात्मिक बाज असणारं त्यांचं निरूपण सात्विक अंगाने जाणारे असे. त्याचा आस्वाद घेतला की मन शांत होई. एक अनोखी शीतलता लाभे. मनातला अनेक संकट अडथळ्यांचा कोलाहल गढूळ पाणी शांत व्हावं इतक्या सहजतेने निवळत असे.
बाबामहाराजांचे प्रवचन ही भाविकांसाठी नामी पर्वणी असे.
त्यांच्या कार्यक्रमांना जसजशी गर्दी वाढू लागली तसतसे त्यांच्या विषयी दबक्या आवाजात किल्मिष पसरवणारी चर्चाही सुरु झाली. त्यावर त्यांनी त्यांच्या हयातीत स्पष्टीकरणही दिलं होतं. मात्र खऱ्या श्रद्धाळू वारकऱ्याने त्यांच्यावर कधीही सवाल केला नाही. त्यांच्या लेखी संत जितके पूजनीय होते तितकेच बाबामहाराजही वंदनीय झाले. हे प्रेम अन्य कीर्तनकारांना क्वचित लाभले. ते खऱ्या अर्थाने कीर्तनकारांचे अध्वर्यू होते.
महाराष्ट्रात कीर्तन नामस्मरण आणि नामसप्ताह यांची परंपरा अत्यंत दीर्घ असली, तरी स्वातंत्र्योत्तर काळात सर्वाधिक लोकप्रियता लाभली ती बाबामहाराजांना! त्यांच्या कीर्तनात कसलेही अभिनिवेश नसत हे यामागचे कारण असू शकेल. असे असले तरी त्यांनी संतांना अभिप्रेत असणारी सामाजिक जाणीव प्रगल्भ व्हावी यासाठी वैयक्तिक पातळीवर अतिव मेहनत घेतल्याचे फारसे ऐकिवात नाही, उतारवयात त्यानी यावर काम करायचे ठरवले होते मात्र शारीरिक व्याधींपायी ते जमले नसावे. मात्र यामुळे त्यांच्या श्रेष्ठत्वास बाधा येत नाही हे ही नमूद केले पाहिजे.
‘वरून कीर्तन आतून तमाशा’ असे आताच्या काळात कीर्तन प्रवचनाचे जे ओंगळवाणे स्वरूप आले आहे त्याच्या पूर्णतः विरुद्धार्थाचे सोज्वळ स्वरूपाचे त्यांचे प्रकटन असे. मृदूता, सात्विकता, विनयशीलता आणि निष्ठा यातून त्यांची संतांविषयीची आस्था जाणवे. त्यास बाजारू स्वरूप नव्हते. तेंव्हा कीर्तन म्हणजे ‘स्टॅन्डअप कॉमेडी शो’ झालेला नव्हता आणि कीर्तन म्हणजे ‘दोन फुल एक हाफ’ नि ‘चेसी बेंड टग्या धेंड’ असाही मामला नव्हता.
निव्वळ वारकरी संप्रदायाच्या निष्ठेला साजेसा असा तो नामसंकीर्तन सोहळा असे. त्यात माकडचाळे नव्हते की फाजील नकलाही नसत. स्त्रियांना टोचून बोलणे नसे की कोरडे राष्ट्रप्रेमही नसे! जे काही होते ते बावनकशी अस्सल भागवत परंपरेस शोभणारे होते! आता अपवाद वगळता सगळाच उल्हास उरला आहे. अशा विकाऊ नि खपाऊ काळात बाबामहाराज सातारकरांचे जाणे एका पिढीची धार्मिक श्रद्धा व्यक्त होण्याची संयमी पद्धत लोप पावण्यासारखे आहे! सद्यकाळी बाबा, बुवा लोकांना एक गेटअप मिळाला आहे, ती वेशभूषा केली की अपवाद वगळता कुणीही उठून बाबा होतो नि प्रवचने झोडीत सुटतो. ना अभ्यास ना व्यासंग ना आस्था! नुसता बाजार करून ठेवलाय! या बाजारगर्दीत बाबामहाराजांचे वेगळेपण ठसठशीत होते!
व्यक्तिशः माझा नि वारकरी संप्रदायाचा संबंध खूप उशिरा आला. मात्र आमचं घराणं वारकरी संप्रदायामधलं. १९७२च्या दुष्काळात आजोबांनी शेतातली उभी पिके जाळून पंचक्रोशीतल्या गावांना पाणी पुरवलं होतं, याची आठवण आजही गावातली सागवानी म्हतारी काढतात! आजोबा, चुलते, भावंडे वारकरी परंपरेनुसार जगतात. त्यामुळे घरातल्या सगळ्याच मंडळींचा तिकडे ओढा आहे.
बाबामहाराजांच्या स्वरात हरिपाठ ऐकणं हा माझ्या आईचा कित्येक वर्षांचा परिपाठ झाला होता. आता टेपरेकॉर्डर नाहीये, मात्र बाबामहाराजांच्या कीर्तन प्रवचनाच्या कॅसेट्स आहेत. त्या ऐकायच्या कशावर हा प्रश्न नाहीये! ते ऐकणारे जीव आता एकामागून एक विरळ होत चाललेत! आज जुन्या पिढीतला एक दुवा निखळून पडला! आई गेल्यानंतर जसे दुःख झाले होते, तसे दुःख या माणसाच्या जाण्याने झालेय. त्यांना कधी भेटलो नाही पण त्यांनी उद्गारलेली ‘माऊली ज्ञानेश्वर’ ही गोड लडिवाळ हाक कायम अंतःकरणात रुजून आहे! तारांगणात संतांच्या अंगणी आता त्यांचे कीर्तन रंगेल!
माझे जिवींची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।।
या पंक्ती त्यांच्या वाणीतून ऐकताना संतांनाही पुन्हा पंढरीत येण्याचा मोह होईल! माऊली ज्ञानेश्वरचरणी रुजू होण्यास एक गुढी आज अनंतास रवाना झाली…