कैद्यांच्या अभंगांच्या आर्त सुरांनी
पोलिसांमधील माणूसही हेलावला
पुणे : “कुणी न येथे भला चांगला
जो तो पथ चुकलेला
जग हे बंदिशाला…”
असा भोग वाट्याला आलेल्या येरवडा तुरुंगातील कैदी आज भजनानंदात तल्लीन होऊन गेले आणि काही काळासाठी का होईना त्यांना कारागृहाचा विसर पडला… निमित्त होते, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित बंदीजनांच्या भजन स्पर्धेचे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्यातील कारागृहात असलेल्या बंदिजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग आणि भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात आज (दि. २१) ही स्पर्धा झाली.
कारागृहातील बंदिजनांच्या भजन, अभंग सादरीकरणाने तुरुंगातील वातावरणाने भक्तीरसाची अनुभूती घेतली. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या रचनांसह ‘देवा तुझ्या लेकराला लोटू नको दूर’ अशी आळवणी कानी पडताच कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांमधील भावूक माणसांचे मनही हेलावून गेले. यावेळी येरवडा कारागृहाच्या अधिक्षक राणी भोसले, उपअधिक्षक पल्लवी कदम, वरीष्ठ तुरुंग अधिकारी पी. एस. भुसारे, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, ह. भ. प. अच्युत महाराज कुलकर्णी, भजनसम्राट रघुनाथ खंडाळकर, संगीत विशारद ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संजीव मिसाळ, शंकर धुमाळ, कार्याध्यक्ष अश्विनी पाचर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती. कारागृहातील शिक्षक अंगद गव्हाणे, सुभेदार प्रकाश सातपुते यांनी स्पर्धेच्या संयोजनात सहकार्य केले.
भजन साहित्याची भेट
स्पर्धेतील सहभागाबद्दल येरवडा कारागृहातील संघास सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, १० जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगांची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फ्रेम आणि प्रबोधनात्मक तसेच प्रेरणादायी ८२ पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.
अभंग, भजन सादरीकरणासाठी स्पर्धक संघास २५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. ‘भेटी लागी जीवा, ‘नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी’ आदी अभंगरचना बंदिजनांनी मोठ्या भक्तिभावाने सादर केल्या. ‘भाविकासाठी उभा विठु कैवल्याचा गाभा’ हा भानुदास महाराजांचा अभंगही दाद मिळवून गेला. स्पर्धेत स्वरचित रचना असावी, अशी स्पर्धेची अट होती. त्याला अनुसरून एका बंदिजनाने रचलेले ‘येऊ दे विशाल हृदया करुणेचा पूर’ हे काव्य सादर करण्यात आले.
अध्यात्मातून आधार मिळवा
स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका प्रतिष्ठाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी विशद केली. जन्माला येताना कुणीही गुन्हेगार नसतो. अध्यात्माच्या प्रबोधनातून बंदिवानांच्या जीवनाला आधार मिळावा हा स्पर्धा आयोजनामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक व्यक्तीत सुप्त गुण असतात. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्येही ते दिसून आले आहेत. अशा व्यक्तींना स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल. हातून छोटी जरी चूक झाली असली, तरी अशा व्यक्तीला शिक्षा भोगावी लागते; पश्चातापाची वेळ येते. कारागृहाच्या चार भिंतींतधून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीगत सुधारणा हाच मार्ग आहे. अशा मार्गावर जाण्यासाठी अध्यात्माचा भक्तीचा मार्ग उपयुक्त ठरू शकतो, असे खाबिया म्हणाले.
बंदिजनांचे मनपरिवर्तन होईल
‘शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीचे स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच मनपरिवर्तन होईल आणि ते भविष्यात योग्य मार्गाने वाटचाल करतील असा विश्वास आहे. बंदिजनांच्या आध्यात्मिक वाटचालीकडे नेण्यासाठी बीज रोवले गेले आहे, त्याचा नक्कीच वटवृक्ष होईल, असे येरवडा कारागृहाच्या अधिक्षक राणी भोसले म्हणाल्या. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेली स्पर्धा बंदिजनांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. बंदिजनांची मन:स्थिती सर्वसामान्य व्यक्तींसारखी नसते. या स्पर्धेमुळे आमच्या आयुष्यात काही काळासाठी का होईना विरंगुळ्याचे क्षण आले असून, आम्हाला दु:खाचा विसर पडला आहे, असे मनोगत एका स्पर्धक तबलाविशारद बंदिजनाने व्यक्त केले.
आयुष्यात नवी पहाट येईल
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा हा उपक्रम ‘न भुतो’ असा आहे. स्पर्धेमुळे आराध्य देवतेचे स्मरण करण्याची संधी मिळाली आहे. स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे आम्ही कारागृहात आहोत असे आम्हाला वाटत नाही. स्पर्धा बंदिजानांच्या आयुष्यात नवी पहाट आणेल, अशी आशा स्पर्धेत सहभागी झालेल्या एका गायक, हार्मोनियम वादकाने व्यक्त केली.