संत चांगा वटेश्वर पालखी
सोहळ्याचेही पंढरीकडे प्रस्थान
सासवड :
चला रे वैष्णवहो जाऊ पंढरीयेसी।
प्रेमामृत खुण मागों त्या विठ्ठलासी।।
या संत सोपान काकांनी आपल्या अभंगातून केलेल्या प्रेमळ आवाहनाला प्रतिसाद देत आलेल्या हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आज (दि. २६) सोपानकाका आणि संत चांगा वटेश्वर यांच्या पालख्यांनी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान ठेवले.
आषाढी वारीसाठी पंढरीला निघालेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा सासवड येथे मुक्काम आहे. सकाळी ११ वाजता संत सोपानदेव संस्थानकडून ज्ञानेश्वर माऊलींसाठी नैवेद्य पाठविण्यात आला. त्यानंतर प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ झाला.
प्रस्थान प्रसंगी मंदिरात आमदार संजय जगताप, सासवडच्या तहसीलदार रुपाली सरनौबत यांच्यासह पंढरपूर, आळंदी, देहू, मुक्ताईनगर, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणच्या देवस्थानांचे प्रतिनिधी, दिंडी प्रमुख आणि हजारो भाविक उपस्थित होते. सोपानकाका सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांनी मानकरी आणि दिंडी प्रमुख यांना मानाचे श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला.
माझ्या वडिलांची मिरासिगा देवा। तुझी चरणसेवा पांडुरंगा।। हा अभंग होऊन दुपारी ठीक १२.४५ वाजता पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन दुपारी १ वाजता उत्तरेकडील दरवाजाच्या देऊळ वाड्यातून संत सोपानदेवांचा पालखी बाहेर पडला. यावेळी उपस्थित असंख्य भाविकांनी माउली आणि सोपानकाकांचा जयघोष केला.
भाविकांनी पालखी खांद्यावर घेऊन सासवड गावातून मिरवत जेजुरी नाक्यापर्यंत आणली. दुपारी २.३०च्या दरम्यान जेजुरी नाक्यावर हजारो भाविकांनी पालखीला भावपूर्ण निरोप दिला आणि सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. संत सोपानकाकांच्या पालखी समवेत १०० दिंड्या असून रथापुढे २२ आणि रथामागे ७८ दिंड्या मार्गक्रमण करणार आहेत. पालखीचा आज (दि. २५) पांगारे या गावी पहिला मुक्काम आहे.
संत चांगावटेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान
संत सोपानकाकांच्या पालखी पाठोपाठच चांगा वटेश्वर महाराजांच्या पालखीचेही काही वेळातच प्रस्थान झाले. चांगावटेश्वर महाराजांच्या पालखी समवेत २५ दिंड्या सहभागी झाल्याचे सोहळा प्रमुख जनार्दन वाबळे यांनी सांगितले. दोन्ही पालख्यांना निरोप देण्यासाठी जेजुरी नाक्यावर सासवडकर उपस्थित होते.
माऊलींची पालखी उद्या जेजुरीकडे
दुसरीकडे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर पहाटे प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई यांच्या हस्ते पूजा, अभिषेक आणि आरती करण्यात आली. दिवसभर पुरंदर तालुक्यासह परिसरातील हजारो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. रात्रीची कीर्तन सेवा वालुरकर दिंडी तर्फे करण्यात आली. उद्या (दि.२६ जून) श्री संत ज्ञानदेवांचा पालखी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी सकाळी ७ वाजता जेजुरीकडे मार्गस्थ होणार आहे.