सकल मराठा समाजाच्या मागण्या
मान्य केल्याने पंढरपुरात निर्णय
पंढरपूर : अखेर पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा पेच सुटला आहे. परंपरेप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २३ नोव्हेंबर रोजी ही पूजा होणार आहे. सकल मराठा समाजाने या पूजेला विरोध केला होता. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्याने मराठा समाजाने आपला विरोध मागे घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या पाचही मागणी केल्या. त्यामुळे मराठा समाजाने आपले आंदोलन मागे घेतले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा प्रशासन आणि सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी ही माहिती दिली.
मराठा समाजाच्या पाच मागण्या
१. पंढरपूर शहर आणि तालुक्यात अनेक ठिकाणी जुन्या दप्तरातील जन्म आणि जात नोंदी सापत नाहीत. त्यासाठी जुनी दप्तरे उपलब्ध करून मोडी आणि उर्दू लिपीच्या जाणणारांची शासनाने नियुक्त करावी. २. पंढरपूर शहरामध्ये शासकीय अथवा नगरपालिकेच्या जागेत मराठा भवन इमारतीची उभारणी करावी. ३. पंढरपूर येथे मराठा मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारण्यात यावे. ४. सारथी संस्थेचे पंढरपूर येथे उपकेंद्र उभारण्यात यावे. ५. मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या २४ डिसेंबर २०२३ या मुदतीत मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.
यात्रेसाठी पंढरपूर सज्ज
दरम्यान यंदाच्या कार्तिकी सोहळ्यासाठी सुमारे १० लाख भाविक पंढरीत दाखल होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासन सज्ज झाले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दर्शन रांगेतील भाविकांसाठी चार विश्रांती कक्ष उभारण्यात आले आहेत. सारडा भवन ते गोपाळपूर रसस्त्यालगतच्या दर्शनरांगेत बॅरिकेटींग करण्यात आले आहे. त्यावर ताडपत्री शेड, कायमस्वरूपी चार, तर तात्पुरत्या सहा अशा दहा पत्राशेड उभारण्यात आल्या आहेत. पत्रा शेड दर्शन रांगेतील भाविकांसाठी आपत्कालिन गेट, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन या सुविधा देण्यात येत आहेत. तसेच मिनरल वॉटर, चहा, खिचडीचे वाटपही करण्यात येत आहे. दर्शनरांग जलद गतीने पुढे सरकावी यासाठी समितीने दर ५० मीटर अंतरावर पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. दर्शन रांगेतील भाविकांसाठी यंदा प्रथमच चार विश्रांती कक्ष उभारण्यात आले आहेत.
यात्रेदरम्यान भाविकांसाठी २४ तास मुखदर्शन आणि २२ तास पददर्शन सुरू आहे. याशिवाय यात्रा कालावधीमध्ये आपत्कालीन सुरक्षा व्यवस्थेसाठी सोलापूर महानगरपालिकेची रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह, सिझफायर यंत्रणा, चंद्रभागा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बॅग स्कॅनर मशिन, भाविकांना अपघात विमा पॉलिसी आदी व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक मिळून सुमारे दोन हजार लोक भाविकांना सेवा देत आहेत.