जेजुरी मुक्कामानंतर वाल्हे गावी;
उद्या नीरा स्नान, मुक्काम लोणंद
वाल्हे : आपल्या कर्मांबद्दल जर तुम्ही पश्चाताप पावलात, नामस्मरण केले, अभ्यास करून स्वत:ला सिद्ध केलेत, तर तुम्ही वंदनीय होऊ शकता असे वाल्ह्या कोळ्याचे अर्थात वाल्मिक ऋषींचे उदाहरण सर्व संतांनी वारंवार दिले आहे. अशा महर्षी वाल्मिक ऋषींच्या वाल्हे नगरीत आज (दि. २७ जून) कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा स्थिरावला. उद्या ( दि. २७ जून) हा सोहळा नीरा स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
पहाटे माऊलींची महापूजा प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई यांच्या हस्ते झाली. त्यानंतर खंडोबारायांची जेजुरीनगरी सोडून माऊली सकाळी सात वाजता वाल्हेकडे मार्गस्थ झाल्या. माऊलींसह आलेले लाखो भाविक महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या खंडोबाचे दर्शन घेऊन कडेपठारावरून दौंडज खिंडीत सोहळ्यात सहभागी झाले. सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरण निर्माण झाले. अशा ढगाळ वातावरणातच वारकरी विठ्ठल भेटीच्या ओढीने टाळ, मृदुंगाचा गजर आणि हरीनामाच्या जयघोषात मार्गक्रमण करीत होते. आजचा प्रवास १२ किलोमीटरचा होता.
सकाळी साडेनऊ वाजता सोहळा न्याहरीसाठी दौंडज खिंडीत थांबला. तिथे स्थानिकांनी वारकऱ्यांना भाकरी, पिठलं, उसळ, चटणी आदी न्याहारी दिली. सकाळी साडेदहा वाजता हा सोहळा दौंडजकडे मार्गस्थ झाला. दौंडज येथे पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. दौंडज परिसरातील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. विश्रांतीनंतर हा सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला. टाळ, मृदुंगाचा गजर आणि हरीनामाच्या जयघोषात सह्याद्रीच्या पर्वतरांगा दुमदुमून गेल्या होत्या.
सोहळा दुपारी दीड वाजता वाल्हे येथे पोहोचला. येथे सरपंच अमोल खवले, उपसरपंच अंजली कुमठेकर, ग्रामसेवक बाळासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. येथील स्वागत स्वीकारून दुपारी तीन वाजता सोहळा मदनेवस्ती-शुकलवाडी येथे पोहोचला. समाज आरतीनंतर सोहळा येथे विसावला.
नीरा स्नानानंतर पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश
श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा उद्या ( दि. २८ जून) सकाळी साडेसहा वाजता वाल्हे येथून लोणंद मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. सकाळी हा सोहळा साडेअकरापर्यंत नीरा येथे पोहोचेल. दुपारचा नैवेद्य आणि भोजन घेऊन विश्रांतीनंतर दुपारी अडीच वाजता हा सोहळा लोणंदकडे मार्गस्थ होईल. नीरा स्नानानंतर सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल.