विविध जातीधर्मांचे लोक

करतात वारकऱ्यांची सेवा

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक सेवाभावी हात राबतात. त्यात सर्व जाती-धर्माचे लोक असतात. अन्नदान, उपयोगी वस्तूंचे वाटप ते अगदी चपला सांधून देणे, थकलेल्या पायांना मालीश करून देणे, अशी जमेल ती सेवा ही मंडळी मनोभावे करतात. त्यापैकी काही सेवेकऱ्यांची ही उदाहरणं…

मोतीराम पौळ

पुण्यात ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांचे आगमन झाल्यानंतर अनेकांकडून वारकर्‍यांची विविध माध्यमातून सेवा केली जाते. पुण्यात सादलबाबा दर्गा कमिटीकडून वारकऱ्यांचे स्वागत आणि सेवा केली जाते.

नानापेठेत मुस्लिम बांधवांकडून मालीश सेवा

वाटचाल करून थकल्या-भागलेल्या वारकर्‍यांची पुण्यातील नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिराशेजारी मुस्लिम लोक मालीश करतात. मागील १५ वर्षांपासून खास हैदराबादहून येऊन अब्दुल रजाक मालीशचे काम करतात. हैदराबादचे असलेले रज्जाक फिजिओथेरपीचं काम करतात. तसेच सांधेदुखी, पॅरालिसिस असलेल्यांची ते मसाज करतात. वनस्पतीपासून स्वत: तेल बनवतात. हे तेल वापरुन ते वारकर्‍यांची सेवा म्हणून मोफत मसाज करतात. यात त्यांना आनंद मिळतो. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.

पालखीच्या वेळी लोणंदला ईद पुढे ढकलतात!

पालखी लोणंदला पोहोचल्यावर मुस्लिम बांधव माऊलींच्या पालखीला खांदा देतात. पालखी वेशीतून गावात खांदा देऊन आणण्याचा मान येथील मुस्लिम बांधव आणि तारीक बागवान यांच्या कुटुंबियांकडे आहे. बागवान कुटुंबीय बँड लावून वाजतगाजत माऊलींना गोड नैवद्य दाखवतात. ही परंपरा १९८५ पासून अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांनी सुरू केलीय. अगदी दिवाळीप्रमाणं पालखीसाठी माहेरवाशिणी गावात येतात. दुसरं आणि अनोखी बाब म्हणजे माऊलींची पालखी गावात येते त्या दिवशी जर ईद आली, तर ती पुढे ढकलतात. तेव्हा मांसाहार कोणीही करत नाही, पावित्र्य राखलं जातं. पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर ईद साजरी केली जाते. ही प्रथाही अ‍ॅड. बागवान यांनीच २०१५ पासून सुरू केलीय. ”माऊलींच्या पालखीनिमित्त सामाजिक सलोखा जपण्याचं काम लोणंदचा मुस्लिम समाज वर्षानुवर्षे करत आलाय. आम्हाला पालखी कमिटीकडून मान-सन्मान दिला जातो. मी स्वत: पांडुरंग आणि माऊली भक्त असणारा वारकरी आहे. हे सेवाकाम करताना समाधान मिळतं.” असं तारीक बागवान मोठ्या अभिमानानं सांगत होते.

मुस्लिम कुटुंबाकडून अश्वांची सेवा

माळशिरस तालुक्यातील तोंडले-बोंडले गावी माऊलींची पालखी दुपारच्या विसाव्याला पोहोचते. तेथील एका मुस्लिम कुटुंबाकडून माऊलींच्या पालखीतील अश्वांच्या थांबण्याची व्यवस्था केली जाते. त्यांला हिरवा चारा-पाणी दिला जातो. या अश्वांसोबत आलेल्या लोकांनाही अन्नदान केलं जातं. कित्येक वर्षांपासून ही सेवा सुरूय, असं माऊलींच्या पालखीचे घोडेस्वार तुकाराम कोळी यांनी सांगितलं. ते २० वर्षांपासून घोडेस्वार म्हणून पालखीच्या सेवेत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अंकली (कर्नाटक) हे त्यांचं गाव असून सेवेसाठी ते नित्यनेमाने येतात.

परंपरेने ही सेवा करणारे ४५ वर्षीय इकबाल मुजावर सांगतात, “वारी सुरू झाल्यापासून पालखीचे अश्व आमच्या घरी विसाव्याला थांबतात. ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलीय. माझ्या डोळ्यासमोर ही तिसरी पिढी अश्व आणि वारकर्‍यांची सेवा करतेय. गावात आमचं एकमेव मुस्लिम कुटुंब राहतंय. काही वर्षांपूर्वी गावातील काही तरुणांनी ह्या मुस्लिमांना कशाला द्यायचा पालखीचे अश्व थांबवण्याचा मान, असे म्हणत वाद केले, पण आम्ही त्या मानासाठी गावकर्‍यांसोबत वाद केले, पण ही परंपरा सोडली नाही. शेवटी देवाच्या मनात आहे, म्हणूनच तो आपल्या हातून सेवा करून घेतो.”

इंदापूरमध्ये वारकऱ्यांना अन्नदान

इंदापूर तुकोबारायांची पालखी दरवर्षी इंदापूर इथं मुक्कामी थांबते. वारीसाठी आलेल्या अनेक दिंड्यांतील वारकऱ्यांना मुस्लीम समाजाकडून दरवर्षी अन्नदान केलं जातं. अनेक मुस्लिम बांधव प्रेमाने वारकऱ्यांची सेवा करतात. धार्मिक सहिष्णुतेचा हा एक वस्तुपाठच म्हणावा लागेल.

वासकर दिंडीचा मुक्काम
मांडवी ओढा येथे पालखी सोहळ्या आल्यावर नामदेव महाराज वासकर दिंडीला येथील मुस्लिम बांधव त्यांच्या घरात मुक्कामासाठी जागा देतात. वारकर्‍यांसाठी घर स्वच्छ करतात. त्यांच्या घरी ही वारकरी मंडळी स्वत: स्वयंपाक बनवून भोजन करतात. तेथे रात्रभर राहून भजन करतात.

सासवडच्या ख्वाजाभाई बागवानांची सेवा

माऊलींची पालखी सोपानदेवांच्या सासवडला दोन दिवस मुक्कामी असते. येथे वारकरी आणि नागरिकांची प्रचंड गर्दी असते. सासवडचे नगरसेवक ख्वाजाभाई बागवान १९७४ पासून वारीमध्ये नियोजन करतात. चहा, फळे, नाश्ता वाटप, सूचना देणे अशी वारकर्‍यांना जमेल तशी सेवा देतात. जय पुरंदरे हे सासवडचे जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते. त्यावेळी ख्वाजाभाई हे त्यांचे सहकारी नगरसेवक होते. पुरंदरे हे अनेक सामाजिक कामे करायचे. यांच्याकडून सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. तर त्यांचे वडील महमदभाई बागवान हे किराणा दुकानाचे मोठे व्यापारी होते. साठ-सत्तरच्या दशकात सासवडचे सर्व व्यापारी मिळून वर्गणी आणि आवश्यक साहित्य देऊन वारकर्‍यांसाठी मोठी पंगत देत असत. चार-पाच हजार वारकरी प्रसाद घेत. आतासारख्या तेव्हा छोट्या-मोठ्या अनेक पंगत नव्हत्या. वडिलांपासून चालत आलेली वारकर्‍यांची सेवा परंपरा ख्वाजाभाईंनी आतापर्यंत चालू ठेवलीय. सामाजिक सलोख्याचं हे एक ज्वलंत उदाहरण वारीत अनुभवायला मिळतं.

परतीला रोज पंगत देणारे कल्याणचे भोई

कल्याणचे सखाराम भोई हे २००५ पासून वाखरी ते सासवड या परतीच्या प्रवासात माऊलींच्या दिंडीत दररोज सकाळ नी संध्याकाळ वारकर्‍यांना पंगत देतात. एका पंगतीत जवळपास हजार वारकरी पंगतीचा लाभ घेतात. वाखरी, तोंडले-बोंडले, वेळापूर, नातेपुते, माळशीरस, बरड, पडेगाव, नीरा, वाल्हे, सासवड ही भोई त्यांच्या पंगतीची ठिकाणं आहेत.
सखाराम भोई यांचा कल्याणमध्ये ‘संत गजानन डेव्हलपर्स’ हा कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे. २००४ साली भोईर पालखी सोहळ्यासोबत वारीला पायी चालत गेले होते. तेव्हा येताना वारकर्‍यांचे आणि स्वत: भोई यांचे प्रचंड हाल झाले. येताना सर्व वारकऱ्यांना व्यवस्थित जेवण वगैरे मिळत नाही. एका ठिकाणी तर त्यांना पंगतीवरून उठवले आणि त्यांच्या डोळ्यात प्रचंड अश्रू आले होते. त्यावेळी त्यांनी ठरवलं की, ‘वारकर्‍यांसाठी येताना पंगत देऊन सेवा करायची. त्यानंतर काही मित्रमंडळी आणि नातेवाईकांना घेऊन त्यांनी पंधरा वर्षांपासून परतीच्या प्रवासात पंगत देण्याची सेवा सुरू केलीय. या विषयी भोई भरभरून बोलत होते.

ट्रकसेवा देणारे आळंदीचे वडगावकर

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्‍यांची किंवा पालखी सोहळ्यातील कोणतीही सेवा करण्यासाठी हजारो हात पुढे येतात. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी मागील ७५ वर्षांपासून ट्रक देऊन सेवा करणारे वडगावकर कुटुंबीय आळंदीचे आहेत. त्यांच्या तीन पिढ्यांपासून ही ट्रक सेवा पुरविली जाते. आजोबा, वडील यांच्यानंतर जितेंद्र व प्रशांत वडगावकर यांनी ही सेवा सुरू ठेवलीय. या विषयी ५२ वर्षीय जितेंद्र वडगावकर म्हणाले, “आमच्या तीन पिढ्यांपासून ही सेवा सुरूच आहे. सुरूवातीला पालखीबरोबर १ ट्रक होता. तर मागील ३० वर्षांपासून दोन ट्रकची सेवा देत आहेत. दोन ट्रकसोबत दोन ड्रायव्हर असतात. फक्त डिझेलचा तेवढा खर्च संस्थांकडून घेतो. बाकी माऊलींच्या सेवेचा आनंद मिळतो.”

दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडून वाल्हे येथे अन्नदान
वाल्हे हा ग्रामीण भाग असल्यामुळे येथे वारकर्‍यांची म्हणावी तशी व्यवस्था होत नाही. त्यामुळे मागील २० वर्षांपासून दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून सर्व वारकर्‍यांसाठी पंगत असते. येथे २५ ते ३० हजार वारकरी प्रसादाचा लाभ घेतात, असे ट्रस्टचे पदाधिकारी महेश सूर्यवंशी यांनी सांगितलं. ट्रस्टची १९८७ पासून ज्ञानोबा, तुकोबा आणि सोपानदेव अशा तीन पालखी मार्गावर वारकर्‍यांसाठी मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा पुणे ते वाखरीदरम्यान अखंडपणे सुरू आहे. तीन अ‍ॅम्ब्युलन्ससोबत ९ डॉक्टरांची टीम सज्ज असते. वारकर्‍यांची मोफत आरोग्य तपासणी करून मोफत औषधे दिली जातात.

हरित वारी आणि निर्मळ वारीच्या माध्यमातून दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने पालखी तळावर १० हजार झाडे लावून जगवली आहेत. पालखी मार्गावरही ५० हजार झाडे लावली आहेत. त्याचबरोबर वाल्हे जवळील पिंगोरी गावाच्या तलावाचे पुनरुज्जीवन केलं. त्यातला गाळ काढून शेतकर्‍यांना मोफत दिला. त्यामुळे ५१ कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण होऊन परिसर हिरवा झाला. जवळील डोंगरावर झाडे लावून जगवली आहेत. तसेच वारी गेल्यानंतर पडलेला कचरा उचलण्याचे काम चोपदार फाउंडेशनच्या सहकार्याने केले जाते. अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ट्रस्ट वारीमध्ये सेवा देत आहे.

रिंगणासाठी जागा मिळवून देणारे सालगुडे
पुरंदावडे या गावातील सदाशिव नगर कारखान्यामार्फत वारकऱ्यांना अन्नदान केलं जातं. ही प्रथा १९४२ साली पहिलं रिंगण याठिकाणी झालं होतं, तेव्हापासून सुरूच आहे. १९३२ साली सुरू झालेल्या चितळे ऍग्रीकल्चर लिमिटेडने १९४२ या पहिल्या वर्षीपासून गूळ शेंगदाणे दिले होते. त्यानंतर बुंदी, मटकी आणि भात हे पदार्थ १९४८ पासून देण्यास सुरुवात केली. आजपर्यंत हेच पदार्थ देण्याची ही प्रथा सुरू आहे. नंतर सदाशिव नगर कारखाना झाला. तर १९८८ सदाशिव नगर ही स्वतंत्र ग्रामपंचायत झाली.

पुढे माऊलींच्या रिंगणासाठी कारखान्याची जागा अपुरी पडू लागली. त्यामुळेच दुसरी जागा देण्याची देवस्थानची मागणी होती. अशातच जागेअभावी एक वर्षे रिंगण झालं नाही. वारकऱ्यांची गर्दी, जागेचा अभाव आणि मॅनेजमेंट चुकलं अन् रिंगण झालं नाही. त्याची दखल शासनाने घेतली. रिंगणासाठी नवी जागा मिळाली. याविषयी पांडुरंग सालगुडे यांनी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आणि पत्नीने सरपंच म्हणून खूप प्रयत्न केले.

सालगुडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना म्हणतात, “पत्नी सरपंच असताना आम्ही कलेक्टरला विनंती करून १५-१६ एकर जागा मिळवून दिली. ती महाराष्ट्र राज्य शेती मंडळाची जागा होती. यासाठी अनेकांनी त्रास दिला. राजकीय मंडळींकडूनही सहकार्याऐवजी आडकाठी अन् त्रासाला सामोरं जावं लागलं. अधिकारी वर्ग उघड बोलत नसले तरी त्यांचं सहकार्य नव्हतं. या प्रक्रियेत स्वतः सात-आठ लाख खर्च केले. शेवटी संस्थानच्या नावानं जागा झाली अन् पुरंदावडेच्या या नव्या जागेत २०१६ साली पहिलं रिंगण पार पडलं. दोन वर्षे वारी झाली नसल्याने रिंगण जागेची यावर्षी म्हात्रे कंपनीनं स्वच्छता केली. एक वारकरी आणि माऊलीची सेवा म्हणून नव्या जागेसाठी प्रयत्न करता आले याचा आनंदच आहे.”

दौंडज खिंडीत पिठलं-भाकरीची सेवा

वर्षानुवर्षे दिंड्या उतरतात अशी घरं आहेत. त्याच घरी उतरायचं अशी परंपरा निर्माण झालीय. शिवाय त्यांचं आणि वारकऱ्यांचं वेगळंच नातं तयार झालेलं आहे. पूर्वी दौंडज खिंड इथे वारकऱ्यांची खाण्यापिण्याची काही व्यवस्था नव्हती. काही वर्षांपूर्वी ज्ञानोबा (तात्या) चोपदार यांनी दर्शनाला आलेल्या बायकांना भाकरी पिठलं आणायला सांगितलं. आता ती परंपराच सुरू झाली आहे. आता प्रत्येक वर्षी गावातील बायका वारकर्‍यांसाठी पिठलं भाकर आणतात. हा प्रेमाचा घास खाऊनच वारकरी पुढे प्रस्थान ठेवतात.

जेजुरी येथील निर्गुडे कुटुंब वारकर्‍यांना सुरुवातीला भाकरी पिठल्याचे जेवण देत. आता वारकऱ्यांना शिधा देतात आणि आपली सेवा बाजवतात. वारी काळात होणारा सेवाभाव सर्वत्र पाहायला मिळतो. आळंदीत राजाभाऊ चोपदार यांच्या घरी बहुळ येथील दिंडी येते. ते प्रस्थानाच्या वेळी पिठलं भाकरी आणतात. वारकऱ्यांना वाटतात. नातेपुते मुक्कामी काही गावकरी मंडळी वारकऱ्यांना पुरणाची पोळी जेऊ घालतात. तर भंडी शेगावला वारकर्‍यांना गावकरी जेवण घालतात.

पाडेगावकरांकडून बैलांना विसावा

परतीच्या प्रवासात पालख्यांचा पाडेगावला मुक्काम असतो. इथे पालखीला स्थानिकांचे बैल जोडतात. वारीच्या वाटेवर हे असे एकमेव ठिकाण आहे. पालखीचे बैल किमान एक किलोमीटर रिकामे चालतात. शिवाय गावातील प्रत्येक घरी वारकरी मुक्कामाला राहतात. गावकर्‍यांकडून त्यांची सेवा केली जाते.

वाटेवर असा सेवाभाव लोकांच्या मनामनात रुजलाय. जमेल तशी वारकऱ्यांची सेवा करायची. लाखो वारकरी ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीसोबत पायी चालतात. पंढरपूरला जातात. त्या माऊलींच्या सेवेसाठी शेकडो वर्षांपासून कित्येक हात पुढे येतात, राबतात. अनेकजण मनोभावे सेवा करतात. त्यातून मिळणारा आनंदच मात्र वर्णन न करता येणारा शब्दांच्या पलीकडचाच. त्यापुढे जाऊन सामाजिक सलोखा, धार्मिक सहिष्णुता याचा वस्तुपाठ म्हणून वारीकडे पाहता येत. हे असं उदाहरण जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही.

मोतीराम पौळ
मुक्त पत्रकार, पुणे
संपर्क: ९६३७९९३३१९
motirampoulpatil@gamil.com

(छायाचित्रे : हलीमा कुरेशी, माऊली वैद्य)

 

2 thoughts on “पंढरीच्या वाटेवरचे सेवेकरी

  1. किती सुंदर माहिती दिली आहे..खूप छान संकलन..भेदाभेद भ्रम अमंगळ हेच तत्व वारीने जपले आहे..नाही ओवळे सोवळे ऐसें केले या गोपाळे हे या परंपरेचे अनुकरणार आधारित किती मोठे मानव्याचे मूल्य आहे..एकाच लेखात इतकी माहिती व त्याचे फोटो पण…👍👌💐खूप सुंदर लेखक,फोटो संकलक व आदरणीय गायकवाड सर..राम कृष्ण हरि

  2. किती सुंदर माहिती दिली आहे..खूप छान संकलन..भेदाभेद भ्रम अमंगळ हेच तत्व वारीने जपले आहे..नाही ओवळे सोवळे ऐसें केले या गोपाळे हे या परंपरेचे अनुकरणार आधारित किती मोठे मानव्याचे मूल्य आहे..एकाच लेखात इतकी माहिती व त्याचे फोटो पण…👍👌💐खूप सुंदर लेखक,फोटो संकलक व आदरणीय गायकवाड सर..राम कृष्ण हरि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *